निवडणुकीतील पराभवामुळे काळे कुटुंब अस्वस्थ झाले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुकीतील पराभवामुळे काळे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. आजही त्यांना पराजयच दिसत असल्याने माजी आमदार अशोक काळे, पुष्पा काळे व आशुतोष काळे हे आपल्यावर खालच्या पातळीवरील टीका करतात. विकासकामांबाबत त्यांनी जरूर टीका करावी. मात्र, व्यक्तिगत टीका केली, तर त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कोपरगावात झालेल्या हल्लाबोल आंदोलनानंतर शहरासह तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपल्यावर केलेल्या व्यक्तिगत टीकेचा आमदार कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, या अगोदरही विरोधकांनी विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका केली होती. त्यांच्या टीकेला आपण कधीच भीक घातली नाही. 

गेल्या साडेतीन वर्षांपासून कोपरगाव मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणून विकासकामांचा झपाटा लावल्याने विरोधक हतबल झाले आहेत. माजी आमदार अशोक काळे यांना तालुक्यातील सोडाच, पण स्वतःच्या गावातील रस्तेदेखील करता आलेले नाहीत. आपण कधीही विकासकामात राजकारण केले नाही. उलट त्यांच्या गावातील रस्त्यांचे मी भूमिपूजन केल्याने ते संतापले आहेत. 

शहराच्या विकासासाठी नगरपालिका इमारत, वाचनालय, नाट्यगृह, निळवंड्यातून पाइपलाइनद्वारे पाणी, शेतकऱ्यांसाठी चालू हंगामात पाण्याचे एक रोटेशन, घरकुल योजना आदी स्वरूपाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. या विकासकामांमुळे जनता राजकारणात आपल्याला थारा देणार नाही, असे वाटून व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करण्याची वेळ काळे यांच्यावर आली आहे, असे आमदार कोल्हे यांनी सांगितले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, पराग संधान, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.