पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्याकडून जिल्हा परिषदेला भरीव निधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा वार्षिक योजनेत राज्य शासनाने सुरुवातीला ७० टक्के निधी खर्च करण्याची मर्यादा दिली होती. मात्र, नुकतीच राज्य शासनाने उर्वरित ३० टक्के निधीही सर्वसाधारण योजनेत उपलब्ध करुन दिला आहे. राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या निधीचे समायोजन करताना उपलब्ध झालेल्या ७४. ५९ कोटी रुपयांपैकी जिल्हा परिषदेला ३२ कोटी ६३ लाख इतका भरीव निधी नियमित योजनांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. यांत, प्राथमिक शाळा खोली बांधकाम, अंगणवाड्यांची दुरुस्ती आणि अंगणवाड्यांसाठी शौचालयांची उभारणी आणि जिल्हा परिषद शाळांच्या आवारातील धोकादायक असलेल्या विद्युतवाहिन्यांचे स्थलांतरण आदी कामांसाठी हा निधी देण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्ह्याचे पालकमंत्री हेच जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी जिल्हयातील या अतिशय महत्वाच्या विषयांसाठी समायोजन करण्यात येणाऱ्या निधीतून विशेषत्वाने अधिक निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या कामाला निधी उपलब्ध करुन देण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१७-१८ अंतर्गत जिल्ह्याला ३५१.३५ कोटी एवढी अर्थसंकल्पीत तरतूद आहे. मात्र, अर्थ मंत्रालयाने ३० जून २०१७ च्या परिपत्रकान्वये महसुली खर्चाच्या ७० टक्के मर्यादेत तर भांडवली योजनेसाठी ८० टक्के खर्च करण्यास अनुमती देण्यात आली होती. त्यामुळे योजनेच्या ७० टक्के म्हणजेच २७६.७६ कोटी एवढीच सुधारित तरतूद जिल्ह्याला मिळणार होती. मात्र, आता अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पीत तरतूद १०० टक्के खर्च करण्यास नुकतीच मंजूरी दिली. त्यामुळे जिल्ह्याला ७४.५९ कोटींची तरतूद उपलब्ध झाली.

पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी सर्व विभागांच्या मागण्या आणि कामांचे स्वरुप लक्षात घेत सर्वोच्च प्राथमिकता ही प्राथमिक शाळा खोली बांधकाम कामासाठी दिली. निंबोडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वर्ग खोल्यांची तपासणी करण्यात आली होती. जिल्ह्यात तेराशे नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. सन २०१७-१८ साठी शाळा खोली बांधकामासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद मंजूर असून जिल्हा नियोजन समितीने पुनर्विनियोजनाद्वारे ७५ लाख रुपये जास्त दिलेले आहेत. आता नावीन्यपूर्ण योजनेत विशेष बाब म्हणून ३ कोटी रुपये पुर्ननियोजनाद्वारे शाळा खोली बांधकामासाठी जादा उपलब्ध होणार आहेत. यामुळे धोकादायक असलेल्या शाळा खोल्यांची दुरुस्ती शक्य होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.