लोकसभेसाठी नगरमधून प्रशांत गडाख रिंगणात ?

महाराष्ट्र टाईम्स अहमदनगर :- माजी खासदार आणि लेखक यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख हे अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गडाख यांच्या अमृत महोत्सवाला जिल्ह्यातील जुन्या-नव्या पिढीतील गडाख समर्थक कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय नेते यांना खास निमंत्रणे धाडून बोलावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गडाख यांचे फोटो असलेली अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची खास जाहिरात वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करणे आणि शरद पवार यांनी नेमका हाच टायमिंग साधत गडाख यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन फोन केल्याने गडाख लोकसभा निवडणूक लढविणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माजी खासदार आणि लेखक यशवंतराव गडाख यांचा पाच दिवसांचा अमृत महोत्सव सोनई येथे साजरा करण्यात आला. नगर शहरातही कार्यक्रम घेण्यात आले. कृषी, औद्योगिक, ग्रंथ यांचे प्रदर्शन, हिंदी कवी संमेलन, साहित्य-सांस्कृतिक असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रशांत गडाख यांनी वडिलांच्या कार्याची उतराई होण्यासाठी कोणतीच कमतरता राहू नये यासाठी खूप कष्ट घेतले.

यशवंतराव गडाख यांचे जिल्ह्यातील जुन्या-नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना, मित्र परिवाराला, राजकीय नेत्यांना, साहित्यिकांना, प्रमुख पत्रकारांना खास निमंत्रणे धाडून बोलविले होते. दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. या निमित्ताने प्रशांत गडाख यांनी प्रत्येक तालुक्यात, शहरात, मोठ्या गावातून कार्यक्रमाचे मोठे होर्डिंग्ज लावले होते. गडाखांचा हा कार्यक्रम म्हणजे स्नेहजनांचा एक राजकीय मेळावाच होता. 

नगर लोकसभेच्या रिंगणात प्रशांत गडाख यांना उतरविले जाईल, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. शनिवारी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा शेतकरी मेळावा झाला. त्याला यशवंतराव गडाख आवर्जुन उपस्थित होतेच पण त्यांना शरद पवारांच्या शेजारीच बसण्यास खास स्थान दिले होते. यावरून गडाखांचे पाऊल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने पडू लागल्याचे द्योतक मानले जात आहे.


शरद पवारांच्या खास शुभेच्छा 
गडाख यांच्या अमृतमहोत्सवाचे नजरेत भरेल असे वैशिष्ट्य असे की आयोजकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व यशवंतराव गडाख यांचे फोटो असलेली जाहिरात वर्तमानपत्रातून झळकविली. 'मध्यंतरी, जिल्ह्यातील स्थानिक गटबाजीला कंटाळून आम्ही दूर झालो पण राष्ट्रवादी काँग्रेसला कायमचे सोडलेले नाही', असा लाखमोलाचा संदेश लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांनी दिला. 

शरद पवार यांनी नेमका हाच टायमिंग साधत यशवंतराव गडाख यांना फोन केला. जुन्या सहकारी मित्राला शुभेच्छा देताना शरद पवार यांनी गडाखांच्या 'कवडसे' या पुस्तकातील 'मेंटली अनफिट' ही कविताच गडाख यांनाच फोनवरून ऐकविली. माझ्या आणि तुमच्या वेदना या सारख्याच आहेत, असे पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. या सुखद घटनेने गडाख व त्यांचा संपूर्ण परिवार खूपच सुखावला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.