जिल्हा विकासाला गती देण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक- पालकमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. या कामांना अधिक गती देण्यासाठी सक्रीय लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्य शासन नागरिकांसाठी करीत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर स्मार्ट ग्राम पुरस्कार, क्रीडा पुरस्कार आणि अहमदनगर पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, मागील तीन वर्षात जिल्ह्यात जलयुक्‍त शि‍वार अभि‍यानांतर्गत जलसंधारण व मृदसंधारण कामांची लोकसहभागातून परि‍णामकारक अंमलबजावणी करण्‍यात आली. पहिल्या वर्षी 279 गावांमध्ये या कामांमुळे साधारणपणे 59 हजार 333 टीसीएम इतका पाणीसाठा वि‍केंद्रीत स्‍वरुपात नि‍र्माण झाला. त्यामुळे 1 लाख 18 हजार 667 हेक्टर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली. सन 2016-17 मध्ये 268 गावामध्ये 8 हजार 314 कामे पूर्ण करण्यात आली.

यातून 54 हजार टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण होऊन 1 लाख 8 हजार 14 हेक्टर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली. यावर्षी 241 गावांची निवड करण्यात येऊन त्यासाठी 185 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यास जलयुक्त शिवार अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल राज्य पातळीवर गौरविण्यात आले. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात जिल्हा टॅंकरमुक्त आणि टंचाईमुक्त करण्यासाठी सर्वांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 84 हजार 39 शेतकऱ्यांना 523 कोटी 80 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना, शाश्वत सिंचनासाठी प्रयत्न, मागेल त्याला शेततळे, बी-बियाणे खतांचा पुरेसा पुरवठा, तंत्रज्ञानाचा वापर, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीत धान्य विकास कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि जमीन आरोग्य पत्रिका अशा कृषी विस्तार योजनांच्या अंमलबजावणीत आपला जिल्हा आघाडीवर असल्याचे सांगून मागेल त्याला शेततळे ही योजनाही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात 6 हजार 667 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. या माध्यमातून मत्स्यबीजे शेतकऱ्यांना देऊन मत्स्यव्यवसायास चालना देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहेत. कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवरटिलर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, कल्टीवेटर, रोटावेटर अशी यंत्र आणि अवजारे अनुदानावर मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मजुरांना वेळेत मिळणाऱ्या मजूरीचे प्रमाण आता जवळपास 75 टक्क्यांवर आले असून मजूरी शंभर टक्के वेळेत होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी अपघात विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 69 अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना आपण 1 कोटी 35 लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला असल्याचे ते म्हणाले.

शैक्षणिक क्षेत्रात आपला जिल्हा अग्रेसर आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत मदत करण्यात येत आहे. नुकतेच तीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना 605 हून अधिक अभ्यासक्रमांत सवलती, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, ईबीसीसाठी गुणांची मर्यादा 50 टक्के असे निर्णय आपण घेतले. याशिवाय, समाजातील अनाथ घटकांना खुल्या गटातून 1 टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने नुकताच घेतला आहे. सर्वांना सोबत घेऊन सर्व समाजघटकांना न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे प्रा. शिंदे यांनी नमूद केले.

राज्यात शासनमान्य खासगी शैक्षणिक संस्थेमार्फत विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळा चालविण्यात येतात. या शाळांसाठी आता आश्रमशाळा संहिता लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील भटक्या जमाती आणि विमुक्त जाती प्रवर्गातील समाजघटक मुख्य प्रवाहात यावा, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

मार्च 2018 अखेर संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले आहे. नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातही स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन प्रा. शिंदे यांनी केले.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बॅंक प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गाचे काम सुरु आहे. अहमदनगर बाह्यवळण रस्त्यासह विविध महामार्गांच्या कामांचा यात समावेश आहे. ती कामे पूर्ण झाल्यानंतर जलद दळणवळणाची सुविधा निर्माण होऊन खऱ्या अर्थाने जिल्हा विकासाचा वेग वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी दाखविलेली सामंजस्याची आणि सौहार्दाची भूमिका आगामी काळातही कायम राहील असा विश्वास व्यक्त करुन कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस दल सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.आजपासून राज्यभर लोकशाही पंधरवडा आपण साजरा करीत आहोत. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून या लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपवनसंरक्षक श्रीमती ए. श्रीलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामनराव कदम, ज्योती कावरे, तहसीलदार गणेश मरकड, सुधीर पाटील, आप्पासाहेब शिंदे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध विभागांची माहिती देणारे चित्ररथ लक्षवेधी ठरले. त्याचबरोबर विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संग्राम जाधव, उपनिरीक्षक संदीप कहाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, दिलीप पवार, सुनील पवार, विलास पाटील, एस. आर. जांभळे, सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, सहायक फौजदार रत्नाकर मकासरे, पोलीस निरीक्षक एस. आर. जांभळ (निवृत्त) यांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.