राष्ट्रवादी कॉंगेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता अहमदनगर जिल्हा 'टार्गेट’

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पक्षांतर्गत गटबाजीमुळे संघटना वाढीस बसलेला लगाम काढून पुन्हा एकदा संघटना मजबूत करण्याबरोबर भाजपप्रणित सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंगेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आता जिल्हा “लक्ष्य’ केला आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होत आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जिल्ह्यात वाटचाल सुरू आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे तालुकानिहाय दौरे करून कार्यकर्त्यांना निवडणूक कामाला लागण्याची सूचना करीत आहेत. नगर जिल्ह्याकडे पक्षाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात असून, त्याचाच एक भाग म्हणजे आठच दिवसात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यात नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून म्हणावे तितके प्रयत्न होत नसल्याचे दिसते. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनांना ठरावीक उपस्थिती दिसते. त्याचबरोबर दरमहा पक्षाची बैठकही होत नाही. त्यामुळे संघटना बांधणीचे काम होत नाही. त्यात पक्षांतर्गत कुरघोडी चालू आहेत. त्यामुळे संघटना बांधणीला खो बसत आहे. 

दिलीप वळसे यांनी जिल्ह्यातील नेत्यांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात पक्षाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे दिसते. त्याच पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नगर जिल्ह्यातील दौरे वाढू लागले आहेत. निमित्त कोणतेही असो, त्यातून संघटना बळकट करण्याचा प्रयत्न होत आहे. 

गेल्या 19 जानेवारी रोजी पवार राहुरी तालुक्‍यातील सात्रळ येथे कॉ. पी. बी. कडू यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाला आले होते. त्यानंतर आठ दिवसांत ते येत्या 27 जानेवारी रोजी पारनेरला येत आहेत. स्व. वसंतराव झावरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त पारनेर तालुक्‍यातील वासुंदे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या मेळाव्याला पवार उपस्थित राहणार आहेत. अर्थात, मध्यंतरी पारनेर तालुक्‍यात पक्षांतर्गत वाढलेला संघर्ष थेट अजित पवार यांच्या कोर्टात गेला होता. तो क्षमविण्याचा प्रयत्न झाला असला तरी अजूनही त्याची धग आहे. त्यामुळे पक्षाचे तालुक्‍यातील नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे एकाकी पडले आहेत. त्यांना पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न पवार यांच्याकडून या दौऱ्याच्या निमित्ताने होणार आहे.

विदर्भातून निघालेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा लवकरच म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नगर जिल्ह्यात येणार आहे. दोन दिवस जिल्ह्यात ही यात्रा थांबून सरकारने घेतलेल्या धोरणांच्या विरोधात जनजागृती करणार आहे. 

या यात्रेच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आदी नेते येणार असून ते यात्रेसह पक्षवाढीबरोबर आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीबाबतही चाचपणी करणार आहेत. 

अर्थात, वळसे यांनी गेल्या 12 जानेवारीपासून जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे सुरू केले आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हे दौरे केले आहेत. त्यात श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या तीन तालुक्‍यांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षांतर्गत गटबाजी आता बस्स करा आणि निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना त्यांनी नेते, कार्यकर्त्यांना केल्या. आता पुन्हा त्यांचा तालुकानिहाय दौरा सुरू होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.