भरकटलेल्या राजकारणात व्यावसायिक पुढाऱ्यांची दिवाळी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर शहराच्या सत्तापालटाला वर्षभराचा अवधी लोटल्यानंतर एकीकडे “विकासाची वर्षपूर्ती” तर दुसरीकडे “विकासाचे वर्षश्राद्ध” असा सोशल वॉरचा सामना नुकताच बघायला मिळाला. ज्यांची राजकीय दुकानदारी पालिकेवर अवलंबून होती त्यांच्या जीवाची शांती पराभवानंतर अजूनही झालेली नसल्याने अशांची विविध चौकांमध्ये आगपाखड अधूनमधून सुरूच असते. तर सत्ता येऊनही वर्षभरात मान-सन्मान, राजकीयसह व्यक्तिगत फायदा न झाल्याने दुखावलेले आत्मेही सध्या बैचेन आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
एकूणच सगळेच दु:ख सागरात असल्याचा फायदा उचलण्यात सत्तापिपासू, राजकारणाचा व्यवसाय म्हणून वापर करणारे पुढारी यशस्वी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. शहराच्या वर्षभराच्या राजकारणात पुलाखालून भरपूर पाणी गेल्याने जनतेची संभ्रमावस्था दूर होऊ लागली आहे. ज्यांच्या ओंजळीने पाणी पित मोठे झाले त्यांनाच कात्रज घाट दाखवत सत्तेची उब घेण्यासाठी आलेल्या म्होरक्यांना सर्वच शहर आपल्या मालकीचे असल्याचा भास होत नसेल तर नवलच. म्हणूनच कि काय, जुन्या सत्ताधारींच्या काळातील कोणताही ठेकेदार असो कि कार्यकर्ता आजही एकदा चौकात येऊन गेला कि नव्या धुराणींच्या सेवेत पर्मनंट होऊन जातो. 

याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्विकृत नगरसेवक निवडीवेळी झालेली चांदी.असो. सत्तेच्या वर्षभरात महाआघाडीच्या चिंधड्या तर कॉंग्रेसच्या फाकळ्या उडाल्या आहेत. एकीकडे शहराच्या राजकारणातून २२ ते १० असा उतरती कळा लागलेला माजी आ. ससाणे यांचा गट नामशेषतेकडे झुकला आहे. तर माजी आ.मुरकुटे यांच्याकडे केल्या जाणाऱ्या सोपस्कार दुर्लक्षामुळे बोटावर मोजली जाणारी संघटनाही शहरात आता शिल्लक उरलेली नाही. भाजपचा अस्तित्वहीन संघर्ष तर सेनेचे नावापुरते उरलेले नेते फक्त ठेके घेण्यात मश्गुल असल्याचे जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. 

राहिला प्रश्न तो सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा व बंडखोर काँग्रेस गटाचा, कॉंग्रेसच्या बंडखोर गटाच्या काही पुढा-यांमुळे राष्ट्रवादी सत्तेत असून नसल्यासारखी झाली आहे. नगराध्यक्षा असलेल्या आदिकांचा रिमोट काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांनी ताब्यात ठेवल्याने वजाबाकीचे राजकारण सुरु झाल्यास आश्चर्य वाटू नये. उरलेली बंडखोर काँग्रेस तर गुंडाळण्यात इतकी मश्गुल आहे कि, कामापुरते वापरा आणि सोडून द्या वाऱ्यावर या एका नीतीवर एकत्र आलेले संसार सुखाचा करतील तरी कसा ? 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
तिकडेही चार एकीकडे तर आठ दुसरीकडे असे चित्र आहे. आ.कांबळे यांनी तर हाताने आगीतून फुफाट्यात उडी घेतल्याने विधानसभेला शहरातून मताधिक्य मिळवताना त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. वर्षभराचा एकूणच आढावा घेतल्यास ससाणे यांच्या अनेक ठेकेदार, कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक तडजोडीत बंडखोर काँग्रेसने जोडून घेत राष्ट्रवादीसह महाआघाडीचे नेतृत्व उदयास येऊ नये म्हणून यशस्वी खेळी खेळली. 

एकीकडे उपनगराध्यक्षपद ससाणे पुत्राकडून ताब्यात घेणे सहज शक्य असतानाही ब्र शब्दही न काढणे. तर दुसरीकडे सत्तेच्या वाहत्या गंगेचे अख्खे पाणी स्वतःकडे वळवून घेणे बंडखोर गटाच्या नेत्यांना सहज जमल्याने स्व.आदिकांना जसा चुना लावला तसा या बहिण-भावालाही लावता येत असल्याने शहराचे कारभारीच झाल्याचा भास काहींना होत नसेल तर विशेषच. अर्थात यास कारणीभूत स्वतः बहिण-भाऊ व महाआघाडीचे काही नगरसेवकही आहेत. 

महाआघाडी गटनेते व नगरसेवकांमध्ये कोणताच ताळमेळ नाही. प्रारंभीच्या काळात गटनेत्यांनी दिलेली दुजाभावाची वागणूक त्यांच्याच अंगलट आल्याने त्यांचे महत्व एव्हाना कालबाह्य झाले. तर बाकीचे सर्व माहित असूनही हतबल आहेत. एकूणच काय तर जनतेने विश्वासाने सत्ता हाती दिलेल्या महाआघाडी नगराध्यक्षा व नगरसेवकांना एकत्र येत जनतेने झिडकारलेल्या बंडखोरांवर अंकुश ठेवावा लागेल अन्यथा गेली २५ वर्षे विरोधात राहून प्रचंड मेहनतीने इथवर पोहचलेले सत्तेत असून पुढील ५ वर्ष सत्तेबाहेर राहतील आणि “आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय” असंच काहीसं पुढेही चालू राहील.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.