खासदार दिलीप गांधींविरुद्ध ‘शिस्तभंग’?

महाराष्ट्र टाईम्स :- नगर शहर भाजपमधील खासदार दिलीप गांधी व अॅड. अभय आगरकर गटातील सुंदोपसुंदी वेगवान होऊ पाहत आहे. खासदार गांधी यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आगरकर गटाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवेदन पाठवून केली आहे. मात्र, या मागणीची खासदार गांधी समर्थकांनी खिल्ली उडवली असून, प्रत्यक्ष खासदार गांधी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी नगर शहराध्यक्ष अॅड. अभय आगरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदा देवगावकर, आगरकर गटाचे केडगाव मंडल अध्यक्ष साहेबराव विधाते, संघटन सरचिटणीस राजेंद्र सातपुते, भिंगार मंडल अध्यक्ष महेश नामदे, संघटन सरचिटणीस नीलेश साठे, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सावेडीचे संघटन सरचिटणीस मुकुल गंधे, तसेच माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे, माजी नगरसेवक सचिन पारखी, शिवाजी लोंढे व माजी संघटन सरचिटणीस विनोद बोथरा यांनी दानवे यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन पाठवून खासदार गांधी यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. पक्ष संघटनेला बदनाम करणाऱ्या कारवाया गांधी यांच्या सुरू असून, यामुळे जनतेमध्ये पक्षाची प्रतिमा खालावत आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाला हादरा बसणार असल्याने त्यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी या सर्वांनी केली आहे.

खासदार गांधी यांनी भिंगार व केडगाव मंडलांतील आगरकर समर्थक अध्यक्ष हटवून तेथे स्वसमर्थकांची नियुक्ती केली आहे. तिला आक्षेप घेताना आगरकरांनी दानवेंची भेट घेऊन त्यांच्याकडून या बदलाला स्थगिती मिळवली होती. त्यानंतर गुजरात निवडणूक निकालानंतर गांधी व आगरकर समर्थकांनी स्वतंत्रपणे जल्लोष कार्यक्रम केले होते. या पार्श्वभूमीवर आगरकरांसह बाराजणांनी दानवेंना निवेदन पाठवून खा. गांधींवर पक्षशिस्तभंगाची कारवाईची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

आहे तीच मंडले कायम राहतील, असे दानवेंनी सांगितले असताना खासदार गांधींकडून या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. दानवेंनी दिलेला निर्णय अंमलात न आणता, उलट पक्षाचे पदाधिकारी म्हणून न शोभणारे वर्तन त्यांच्याकडून सुरू आहे. ते पक्षामध्ये मनमानी पद्धतीने वागत असल्याने पक्ष संघटनेत असंतोष पसरला आहे. भिंगार व केडगाव मंडलात अधिकृत नसताना नवीन मंडल अध्यक्षांचे फ्लेक्स लावणे, प्रसिद्धी माध्यमांतून जाहिराती देणे व अन्य हरकती जाणूनबुजून शहर जिल्हाध्यक्ष करीत असल्याने पक्षाच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचा दावाही या निवेदनात करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्षांनी मंडल पदाधिकारी बदलाला स्थगितीचा निर्णय एकदा दिल्यावरदेखील असे प्रकार करीत पक्षात वाद निर्माण करून पक्षविरोधी कार्यवाही खासदार गांधी करीत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे.

प्रदेश' संवाद साधणार
नगर शहर भाजपमध्ये दोन-दोन मंडलाध्यक्ष तसेच पक्षांतर्गत शिगेला पोचलेल्या गटबाजीवर प्रदेश भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे. प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर यासंदर्भात नगरला येऊन सर्वांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात होते. पण त्यालाही अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. अशात आता आगरकर गटाने खासदार गांधींवरच पक्ष शिस्तभंग कारवाईची मागणी केल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आता या दोन्हींपैकी कोणत्याही गटाची बाजू घेतली तरी ती दुसऱ्या गटाला अवमानजनक ठरणार असल्याने प्रदेश भाजपचीही गोची झाल्याचे सांगितले जात आहे.

भूमिकेकडे लक्ष
खासदार दिलीप गांधी हे दिल्ली येथील बैठकीत असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र, सरचिटणीस गौतम दीक्षित यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'नव्या मंडलाध्यक्ष बदलाला प्रदेशाध्यक्षांनी स्थगिती दिल्याचे लेखी त्यांच्याकडे (आगरक गट) काही नाही. आम्ही नाशिकच्या पक्ष बैठकीत ठरल्यानुसार बदल केला आहे व या बदलाची नोंद प्रदेश भाजप कार्यालयात केली आहे. आम्ही केलेल्या नव्या बदलाचीच नोंद प्रदेश कार्यालयात आहे', असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.