शंकरराव गडाखांनी जपले राजकारणापलीकडे माणुसकीचे दायित्व !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आपला विरोधक म्हटलं, की कुणाच्याही कपाळावर आठ्या उमटणार. त्यात राजकीय विरोधक असेल, तर अनेकजण जिवंतपणीच एकमेकाला पाण्यात पाहतात. अशा परिस्थितीत एखाद्याचे आयुष्य संपले, तरी विरोध मात्र संपत नसतो. हे आजचे सामाजिक आणि राजकीय वास्तव. परंतु, या वास्तवाला बदलण्याचे काम माजी आमदार शंकरराव गडाख यांनी कृतीतून करून दाखविले. 


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
रा.स.प.चे पदाधिकारी व आ.बाळासाहेब मुरकुटेंचे कट्टर कार्यकर्ते बाळासाहेब साबरे हे गडाखांचे कट्टर विरोधक. आजारपणामुळे साबरे यांचे अकाली निधन झाले. साबरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत राजकारण, विरोध हे बाजूला ठेवून गडाखांनी साबरे यांची मोठी कन्या स्नेहलचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आणि राजकारणापलिकडेही माणुसकीचे दायित्व जपले.

पाच वर्षांपूर्वी बाळासाहेब साबरे गडाखांचेच कार्यकर्ते म्हणून तालुक्‍याला परिचित होते; परंतु राजकारणातील वैचारिक मतभेदातून ते गडाखांपासून दुरावले. शिवसेना, रा.स.प. असा राजकीय प्रवास करीत सध्या ते तालुक्‍याचे आ.बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करत होते. 

सोनई, खरवंडी, चांदा गटात त्यांनी गडाखांच्या विरोधात जोरदार काम केले. गेल्या काही दिवसांपासून साबरे आजारी होते. किरकोळ आजार गंभीर आजारात रुपांतरित झाला. संघर्ष साबरेंच्या रक्‍तात होता. आजाराशीही त्यांनी दोन हात केले. वैद्यकीय उपचारासाठी कुटुंबियांनीही जंग जंग पछाडले; परंतु शेवटी नियती जिंकली. दीर्घ आजाराने बाळासाहेब गेले. त्यांच्या अकाली जाण्याने साबरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

राजकारणात केलेल्या सक्रीय कामामुळे साबरेंच्या घरी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी झाली. अनेकांनी शब्दरुपी सांत्वन केले. या सांत्वनामुळे साबरे कुटुंबियांना दु:खावर मात करण्याचे थोडे बळ मिळालेही; परंतु घरचा कर्ता माणूस गेल्यानंतर त्याच्या पाल्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचे काय ? हा प्रश्‍न साहजीकच साबरे कुटुंबियांसमोर उभा ठाकला. 

साबरे यांच्या मागे पत्नी, दोन मुली असं कुटुंब. मोठ्या मुलीला उच्चशिक्षित होऊन वडिलांनी पाहिलेले तिच्या विषयीचे स्वप्न पूर्ण करायचे होते; पण ते कसे ? या विवंचनेत साबरे कुटुंबीय असताना माजी आमदार शंकरराव गडाख मदतीला धावून आले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गडाख साबरे यांच्या दशक्रियाविधीला प्रवरा संगम येथे गेले. तेथे शंकररावांनी साबरे कुटुंबियांची भेट घेतली असता बाळासाहेबांची मोठी कन्या स्नेहल हिने उच्च शिक्षण घेण्याचे वडिलांचे स्वप्न बोलून दाखविले. 

याचवेळी गडाखांनी स्नेहलचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. सध्या स्नेहल 11 वीत शिकते आहे. येथून पुढच्या उच्च शिक्षणासाठी गडाख तिला आर्थिक मदत करणार आहेत. राजकारण जरूर करावं; परंतु ते एका मर्यादेपर्यंत. राजकीय विरोधक असला, तरी तो माणूसच. एखादी व्यक्‍ती जाते, तेव्हा विरोधही जातो. शेवटी शिल्लक राहतात माणूसपणाच्या आठवणी. याच आठवणी राजकीय जोडे बाजूला ठेवून जपण्यासाठी, गडाखांनी साबरे कुटुंबियांना मदतीचा हात दिला. हा फक्‍त मदतीचा हात नसून आजच्या राजकारण्यांतही “माणूसपण’ शिल्लक असल्याची साक्ष आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.