महाराष्ट्राच्या या ढोंगाला काय म्हणावे.?


नितिन आगे खून प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष या अस्वस्थ करणार्‍या घटनेवर हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेले अनावृत्त पत्र


महाराष्ट्राच्या या ढोंगाला काय म्हणावे.?

प्रिय नितिन आगे,

मित्रा आज तुझ्या खुनाचा निकाल लागला आणि सारे आरोपी निर्दोष सुटले. याचा अर्थ तुझी हत्या गावातील पकडलेल्या आरोपींनी केली नाही म्हणजे तू आत्महत्या केलीस असेच आता म्हणावे लागेल. बरे झाले तू जिवंत नाहीस अन्यथा तुझ्यावर आज आम्ही आत्महत्येचा गुन्हा नोंदवला असता.

कोपर्डी आणि खर्डा अगदी शेजारच्या तालुक्यातली गावे. कोपर्डी बाबत सरकारने खटल्याच्या यशस्वीतेसाठी पुरेशी काळजी घेवून चांगला वकील देवून कौतुकास्पद भूमिका निभावली. तुझा खून झाल्यावर तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी फास्ट ट्रक कोर्ट आणि विशेष सरकारी वकील दिला जाईल अशी घोषणा करूनही ना स्वतंत्र्य कोर्ट दिले ना विशेष वकील. सरकारसाठी अत्याचारा अत्याचारात ही फरक असतो का ?

आरोपी निर्दोष सुटायला सरकारने केलेले दुर्लक्ष हे महत्वाचे कारण आहे. माध्यमाचेही दडपण तुझ्या खटल्याकडे नंतर राहिले नाही. आताचे पालकमंत्री तर तुझ्या तालुक्याचे पण डोळ्यासमोर सारे साक्षीदार फुटत असताना त्यांनी काहीही केले नाही आणि हा असा निकाल लागला. नव्या सरकारने या खटल्याची अशी वाट लागत असताना काहीच दखल घेतली नाही

तुझा मृत्यू विसरताच येत नाही बघ.. खैरलांजी तिकडे दूर भंडारा जिल्ह्यात घडलं.. माणसं इतकं अमानुष पाशवी होऊ  शकतात हे सारं खरं असूनही विश्वा स बसायचा नाही; पण आज माझ्याच जिल्ह्यात इतक्या जवळ हे घडल्यावर या  पिसाटपणाची माणसातल्या जनावराची ओळख पटली आहे.. अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी असलेला तुझा तालुका..
 
सहकार पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारा आपला नगर जिल्हा काल सोनई आणि आज खडर्य़ामुळे, कोपर्डीमुळे कलंकित झाला आहे.  संतांची भूमी म्हणून मिरवणारा आमचा खरा चेहरा धनदांडग्याचा, उन्मादाचा व जातवर्चस्ववादाच्या घमेंडीचा आणि स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून बघण्याचा आहे, हेच  या घटनांनी सांगितलं. ऑनर किलिंगच्या या सोबई खर्डा या आणि पारनेर कोपर्डी या भीषण घटनांनंतर नगर जिल्हा इथून पुढे हरियानाच्या नकाशात दाखवावा का, असचं वाटू लागलयं बघ..

तुझा तो टिळा लावलेला निरागस फोटो.. तुझं घर.. घर तरी कसं म्हणावं? ती पत्र्याची शेड. गोठय़ासारख्या
खोप्यासमोर बसलेले तुझे हताश आई-वडील.. हे सारं गलबलून टाकतं.. डोळ्यासमोरूनच जात नाही गड्या.. 

इतक्या  निरागस पापभीरू कुटुंबाची ही दैना अजूनच अस्वस्थ करते.. तुला न्याय मिळाला पाहिजे.. असा आवाज पुन्हा आता उठतोय. आरोपी निर्दोष सुटल्यावर काय न्याय देणार आहोत आम्ही नितीन. तुझ्या आई-
वडिलांनी आपल्या रक्तानं विटांचा रंग लाल करून तुला शिकवलं.. तू शिकशील. 

तुझ्या नोकरीनं वीटभट्टीवर भाजून  निघणारं त्यांचं आयुष्याचं म्हातारपण तरी बिनकष्टाचं जाईल. आम्ही हा न्याय कसा देणार आहोत.? मदतीतल्या  लाखांच्या नोटा.. तुझ्या मरणयातना.. ७ तासांची मरणप्राय छळवणूक विसरायला लावतील का.? 

शिक्षणाने तू त्यांचं  जगणं बदलशील, असं त्यांना वाटलं होतं; पण त्यापेक्षा शाळा सोडून वीटभट्टीवर काम करत राहिला असतास तर  किमान जगला तरी असतास, असं ते आता म्हणत असतील.. 'भारताचे भवितव्य वर्गखोल्यात घडत आहे' हे कोठारी आयोगाचं वाक्य तुला शाळेतून ओढून नेताना सर्वांत केविलवाणं वाटलं. 

ही झुंडशाही हेच भारताचं भवितव्य आहे ?. विद्यार्थ्याला मारहाण होताना मध्ये न पडता स्वत:ला वाचवणारे आम्ही
शिक्षक, आम्ही गावकरी, आम्ही बघे हेच भारताचं भवितव्य आहे. मला काय त्याचं, म्हणत बघणारी ही समूहाची
षंढवृत्ती तुला मारण्याइतकीच क्रूर आहे. तुझ्या वडिलांनासुद्धा कळवावंसं वाटत नाही. 

हातोहाती मोबाईल असताना पोलीस  ठाण्याला कळवावंसं वाटत नाही. मारणारे काही जण शाळेचेच माजी विद्यार्थी असताना त्यांना अधिकारवाणीनं शिक्षकांना रोखावंसं वाटत नाही.. 

हा आपल्या सामाजिक जीवनाचा अध:पात घाबरवणारा आहे. जगण्याचीच भीती वाटायला लावणारा आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा वारसा जपणारी कर्मवीरांचा वारसा सांगणार्या संस्थेची ही शाळा. या शाळेतील शिक्षक शिपाई साक्षीदार असून ते साक्ष बदलतात. 

आपल्या विद्यार्थ्याच्या खुनाला न्याय मिळवून देण्यात सहकार्य करीत नाहीत. त्या संस्थेचे पुरोगामी ‘जाणता राजा’ असलेले अध्यक्ष आणि पदाधिकारी या कर्मचार्यांना जाब विचारतील का ? पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालतील का ?

खैरलांजी ते खर्डा हा आमच्या पुरोगामित्वाच्या, संवेदनशीलतेच्या, सुसंस्कृततेच्या, फुले-आंबेडकरांच्या
आमच्या दांभिक प्रेमाच्या अधोगतीचा घसरता आलेख आहे. काही शरम शिल्लक असेल, तर सार्वजनिक व्यासपीठावरून  इथून पुढे तरी आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही बकबक करू नये.. 

१९४७पासून खडर्य़ापर्यंत दर ५ ते १0 वर्षांनी पुन्हा दलितांचं, कधी पारध्यांचं रक्त सांडतंच आहे. याच समाजाच्या महिलांच्या अब्रूच्या बांगड्या फुटतच आहेत. प्रतिक्रियासुद्धा पाठ झाल्यायत.. पहिले काही दिवस घटनाच दाबली जाते. नंतर मीडियाचं दडपण, मग अटक, मग भेटी  इतक्या वाढतात, की उबग यावा.. नक्राश्रू.. आंदोलनं.. रेंगाळणारा खटला.. पुन्हा शांतता पुढच्या प्रकरणापर्यंत. 

'एक  गाव-एक पाणवठा' होऊनही २५ वर्षं होऊन गेली. आम्ही पाणवठे एक केले. महाडचे चवदार पाणी प्यायलो.. पण पाणी एकत्र पिऊनही आम्ही आमचे पाणी दाखवायला विसरत नाही. आमचे देखावे वाढत गेले; पण मानसिकता तीच राहिली.

ढोंगाचे नोबेल पारितोषिक जर कोणी देत असेल, तर ते महाराष्ट्राला दिले पाहिजे, कारण राजस्थान, हरियाना, बिहारला  जातीयवादी, मागास म्हणून शिवी तरी हासडता येते; पण या फुले, शाहू, आंबेडकरांचा मुखवटा लावलेल्या महाराष्ट्राच्या ढोंगाला काय म्हणावे.? 

१५0 वर्षं हे ढोंग चालले आहे. आम्ही फुलेवाड्यात फुलेंच्या विहिरीवर दलितांसोबत पाणी प्यायलो. आम्ही बाबासाहेबांबरोबर महाडला गेलो. आम्ही शाहूमहाराजांसोबत बोर्डिंगमध्ये गेलो.. आम्ही सानेगुरुजींबरोबर विठ्ठलाच्या मंदिरात गेलो. नाशिकला काळाराम मंदिरात गेलो. आम्ही सावरकरांबरोबर रत्नागिरीला दलितांसोबत जेवलो.. 

गांधीजींबरोबर हरिजन वगैरे म्हणत राहिलो. दादासाहेब गायकवाडांच्या लढाईत गेलो. आम्ही बाबा आढावांबरोबर 'एक गाव-एक पानवठय़ा'त गावोगावी फिरलो.. पण आमचं मन दलित वस्तीत कधी गेलच नाही. ते वाड्यावरच राहिलं....गढीवरच राहिलं.. आमच्या घराण्याची इज्जत आमची जात यातून आम्ही बाहेर आलोच नाही नितिन...

आम्ही संविधान दिनाच्या कार्यक्रमाला आणि आमच्या जातीच्या मेळाव्यांना सारख्याच उत्साहाने जात राहिलो ..तुझ्यासारख्या कोवळ्या लेकराचा या आमच्या दांभिकतेने बळी घेतला..  गावातील तरुण की जे त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असतील. आपल्याच शाळेत जाऊन ज्यांना गुंडगिरी करायची भीती वाटत नाही की गावातील हमरस्त्यावरून बडवत न्यायची भीती वाटत नाही.. 

एखाद्याला जीवे मारून विजयाचा झेंडा टांगायची भीती वाटत नाही ... तुझ्या मृत्युइतकीच ही वाढत चाललेली झुंडीची मानसिकता क्लेशदायक आहे.आणि सामाजिक कार्यकर्त्यानी दडपण आणून कसेतरी आरोपी अटक केले तर सर्व साक्षीदार फुटतात... सर्व साक्षीदार जबाब फिरवतात आणि आरोपी निर्दोष. 

आता पुन्हा आंदोलने करायची.. हे सारे थकविणारे आणि निराश करणारे आहे.. तुझ्या त्या वृद्ध आईबापाचे चेहरे डोळ्यासमोर आले की त्यांनी आता दु :ख आता तुझ्या जाण्याचे करायचे की या कोडग्या उलट्या काळजाच्या जगात जगावे लागते ?या आगतिकतेचे करावे ? हाच प्रश्न पडतो नितीन

साभार फेसबुक पोस्ट  
हेरंब कुलकर्णी
फोन ९२७०९४७९७१

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.