ज्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यांचीच राजकारणात चलती - यशवंतराव गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजकीय लोक स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण करून समाजाचं विघटन करतात, तर साहित्य आणि साहित्यिक माणसं आणि माणसांची मने जोडण्याचे काम करतात. त्याच बरोबर समाज एकसंघ ठेवण्याचे काम करतात. असे परखड मत जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केले.मसाप पुणे व सावेडी उपनगर शाखेच्या वतीने आयोजित पहिल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
राजकारण आणि समाजकारणात यशस्वी होण्यासाठी मला वाचन उपयोगी पडले. ही गोष्ट त्यांनी कबुल केली. राजकारण हे रुक्ष क्षेत्र आहे तर साहित्य हे मनाला आनंद देणारे क्षेत्र आहे. गावातील जत्रा, यात्रा, कथा, पारायणं अनुभवल्यामुळे आपलं मन समृद्ध होतं. राजकीय व्यक्तीपेक्षा साहित्यिकांशी माझे जास्त जवळचे नाते जुळले. 

शांता शेळके, ग.दि.माडगुळकर, पु.ल.देशपांडे,गुलजार यांच्या सारख्या मोठ्या साहित्यिकांना भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं त्याबद्दल मी समाधानी आहे. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत, प्रतिभावंत साहित्यिकांना निमंत्रित केलं. त्याचबरोबर शरद पवारांना ही निमंत्रित केलं होतं. त्यांना नेवाशावरून एस.टी.ने सोनईला आणलं होतं, ही आठवणही त्यांनी सांगितली.

साखर कारखान्याच्या उभारणीसाठी वसंतदादा पाटील आणि अण्णासाहेब शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. कारखान्याचे शेअर्स घ्यावेत म्हणून एका पाटलाकडे ३७ चकरा मारल्या पण त्याने शेअर्स घेतले नाही. कारखान्यातून जेव्हा साखर बाहेर पडली तेव्हा त्याने आपल्या मुलाला शेअर घ्यायला पाठवले, तेव्हा त्याला मी पाच-सात चकरा मारायला लावल्या ही आठवण त्यांनी सांगितली. 

राजकारण्यांचे दुटप्पी वागणे आणि बेगडी रूप पाहून काय वाटतं ? या प्रश्नावर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असे ते म्हणाले. राजकारण्यांचे बेगडी रूप मी जवळून पाहिले. त्याचा खूप त्रास झाला कित्येकदा रात्रभर झोपही आली नाही. तेव्हा असं वाटतं की ,ही माणसं एवढी क्षुद्र का होतात, विचाराने एवढी संकुचित का होतात असे प्रश्न पडतात. 

मात्र मी राजकीय विरोधकांकडे कधी शत्रुत्वाच्या भूमिकेतून पाहिलं नाही. राजकीय आणि साहित्यिकांशी संवाद साधनं अवघड असतं, मात्र दत्ता देशमुख, मोती भाऊ फिरोदिया, आबासाहेब निंबाळकर यांच्या संपर्कात मी आलो त्यामुळे माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष, मत्सर ही भावना ठेवली नाही.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सरकारच्या उदासीन भूमिके बद्दल गडाख म्हणाले, अनेक सरकारे आले आणि गेले मात्र त्यांनी शेतकरी कधी केंद्रबिंदू मानला नाही. त्याच्या काबाड कष्टाला मोल नाही, शेतीमालाला भाव नाही. निसर्गाच्या दृष्टचक्रात दुष्काळात शेतकऱ्यांच्या डोळयांसमोर आपली पिके जळतांना पाहून प्रचंड दु:ख होते. आणि त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. 

शेती आणि शेतकऱ्यांची दुरवस्था होत आहे. नवी पिढी आता शेती करायला तयार नाही त्यामुळे भविष्यकाळात १०० कोटी लोकांना धान्य दूध, भाजीपाला, कसा मिळणार? याचे उत्तर सरकारला शोधावेच लागेल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

समाजात आणि कुटुंबात वावरतांना काही वेळा परीक्षेचे क्षण वाट्याला आले. मोठ्या मुलाचे नोंदणी पद्धतीने लग्न केले तेव्हा मला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आणि ही गोष्ट समाजाच्या पचनी पाडावी लागली. पत्नी, मुलं,सुना, नातवंडे याना घेऊन स्कँटलँड, आयर्लंडला गेलो. सेक्सपिअरचे गाव त्यांना दाखवले.

भामरागड, हेमलकसा येथे प्रकाश आमटे, बाबा आमटे यांच्याकडे घेऊन गेलो. भटकंती हा यशवंतराव गडाखांचा आणखी एक आवडता छंद. या छंदाविषयी बोलतांना ते म्हणतात. मला निसर्ग, पाऊस खूप आवडतो, मेळघाट आणि अंबोलीचा निसर्ग मला खुप आवडतो. असे ते म्हणाले. मला भेटलेल्या माणसांनी मला निर्मळपणा दिला. त्यामुळे राजकारणापेक्षा मी समाजकारणाला अधिक महत्व देतो अस ते म्हणाले.

गिरीश कुबेरांचे 'पुतीन' हे माझे आवडते पुस्तक, जुन्या कलावंतांच्या संचातील 'नटसम्राट' हे आवडते नाटक. बॉबी हा तरुणपणी आवडलेला चित्रपट तर यशवंतराव चव्हाण आणि राजीव गांधी हे माझे आवडते राजकीय व्यक्ती आहेत. सध्याचे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. राजकारणाची प्रतिमा डागाळली. चांगली कामं दृष्टीआड होतात, समाजाला पुढे नेणाऱ्या विचारी कार्यकर्त्यांची फळी स्वयंकेंद्रीत होत आहे. 

ज्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे त्यांचीच आज राजकारणात चलती आहे. हे चित्र बदलण्याची जबाबदारीही राजकारण्यांचीच आहे असे ते म्हणाले.संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील, पहिल्याच या प्रकट मुलाखतीसाठी साहित्य रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया उपस्थित होते. शेवटी संयोजक जयंत येलूलकर यांनी आभार मानले व शुभेच्छा दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.