नितीन आगेला न्याय मिळेल का ?

अहमदनगर लाईव्ह 24 :संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील आरोपींना नुकतेच निर्दोष सोडण्यात आल्यामुळे आगेची हत्या कोणी केली? हा प्रश्‍न आगे परिवाराला पडणे जसे स्वाभाविक आहे, तसाच तो सर्वसामान्य माणसाला व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला तसेच पुरोगामी विचाराच्या जिल्ह्याला देखील पडणे स्वाभाविकच असून, या निकालामुळे नितीनला खरच भविष्यात तरी न्याय मिळेल का? हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
संतांची भूमी म्हणून अवघ्या राज्याला परिचित असलेल्या जिल्ह्याची अलीकडच्या 5 ते 6 वर्षांपासून अत्याचाराचा जिल्हा म्हणून ओळख होत आहे. या पाच ते सहा वर्षात जिल्ह्यात घडलेली अत्याचाराची प्रकरणे राज्यातच नव्हे देशात गाजतात ही जिह्याच्या दृष्टीने शोकांतिका म्हणावी लागेल. 

पारनेर तालुक्‍यातील लोणी मावळा, सोनई हत्याकांड, शिर्डी येथील शेजवळ प्रकरण, जामखेड तालुक्‍यातील खर्डा हत्याकांड, कर्जत तालुक्‍यातील कोपर्डी अत्याचार, पाथर्डी तालुक्‍यातील मांडवा अत्याचार या प्रकरणांमुळे पाच वर्षात नगर जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर गाजलेले आहे.

28 एप्रिल 2014 रोजी नितीन आगे या 12 वीत शिकणाऱ्या तरूणाची खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूलपासून मारहाण करत ओढत नेत क्रूरपणे हत्या करण्यात आली. परंतु, आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले. हे प्रकरण झाल्यानंतर त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर.पाटील यांच्यासह सर्व मंत्री, त्याचप्रमाणे रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह सर्वच पुरोगामी संघटनांनी आगे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करत न्याय मिळवून देण्याच्या भूमिका घेतल्या. 

परंतु, या खटल्याच्या निकालामुळे नितीनला न्याय मिळाला का? भविष्यात मिळेल का? हा प्रश्‍न आगे कुटुंबासमोरच नव्हे तर पुरोगामी जिल्ह्यासमोर उभा आहे. या खटल्यात जिल्हा न्यायालयाने 10 जणांविरूध्द 24 जुलै 2014 रोजी दोषारोप दाखल करण्यात आले. या खटल्याची 26 नोव्हेंबर 2016 रोजी सुनावणी सुरू करण्यात आली. या खटल्यात 26 साक्षीदार तपासण्यात आले.

या साक्षीदारांपैकी 14 साक्षीदार फितूर झाल्यामुळे या खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्यामुळे आंबेडकरी चळवळीबरोबरच पुरोगामी संघटनामध्ये एकंदरीतच अस्वस्थता निर्माण होऊन नितीनला नेमके कोणी मारले? या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक का केली नाही ? 


जलद गती न्यायालयाची स्थापना करण्याची भूमिका त्यावेळच्या सरकारने घेऊनही जलदगती न्यायालय का स्थापन करण्यात आले नाही? असे अनेक प्रश्‍न आज निर्माण झाले आहेत. या निकालामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत असून, गुन्हेगाराला कोणताही धर्म, जात, पंथ नसतो. तो फक्त गुन्हेगारच असतो त्याला कठोर शिक्षा होणे गरजेचे असून, 

क्रूरपणे केलेल्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, तसेच गुन्ह्याचा तपास असणाऱ्या त्यावेळच्या तपासी अधिकाऱ्यांनी निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, त्याचप्रमाणे जे साक्षीदार फितूर झाले आहेत. त्यांच्या बॅंक खात्याचीही चौकशी व्हावी, अशा चर्चा आंबेडकरी जनतेतून तीव्रपणे उमटत आहेत. 

तीन वर्ष चाललेल्या या खटल्याच्या निकालामुळे नितीनच्या आई-वडिलांना न्याय मिळाला का? हा तपास सीबीआयकडे सोपविला गेला तर किंवा सर्वोच्च न्यायालयात तरी नितीनच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेल का? अशा क्रूरकर्म्यांना फाशी झाली, तर अशा प्रकारचे दृष्यकृत्य करणाऱ्यांना जरब बसून, अशा घटनांचे प्रमाण कमी होईल, अशाच भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. 

याबाबत फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची नुकतीच पंचशील मंदिर येथे बैठक घेऊन या खटल्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.