मतदारांना पैसे देणारा पाथर्डी भाजप तालुकाध्यक्ष खेडकर पोलिसांच्या जाळ्यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्‍यातील भालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशांचा वापर करून मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व तक्रारदार बापूराव कासुळे यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईत लाखों रुपये सापडले असल्याची चर्चा असून पोलिसांनी मात्र केवळ साडेसात हजार रुपये गुन्ह्यात दाखवले असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.

तालुक्‍यातील भालगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या (शनिवारी) मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मतदारांना भाजपचे तालुकाध्यक्ष व सहकारी पैसे वाटप करत असल्याची तक्रार बापूराव कासुळे यांनी स्थानिक पोलिसांना टाळत थेट नगरच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करून दिली. गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना तक्रारीची माहिती देत संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचा आदेश दिला होता.

यावेळी महसूलच्या भरारी पथकालाही माहिती देण्यात आली व संयुक्त कारवाई करण्याचे सांगितले. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, बिट अंमलदार रेवणनाथ रांजणे, पो.कॉ. अमोल कर्डिले, भगवान सानप व भरारी पथकाचे देवानंद गायकवाड व सहकारी यांनी रात्री आठच्या सुमारास भालगावजवळील उकांडा फाट्यानजीक भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर व राजू सुपेकर यांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांना समोर पाहताच माणिक खेडकर यांनी हातातले पैसे खाली जमिनीवर टाकून दिले. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी माणिक खेडकर व राजू सुपेकर यांना ताब्यात घेऊन पडलेले पैसे ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी माणिक खेडकर व राजू सुपेकर यांना पोलिसांच्या वाहनात बसवून पाथर्डी पोलीस ठाण्यात आणून बसवले होते. 

यावेळी तक्रारदार बापूसाहेब कासुळे व त्यांचे सहकारी पोलीस ठाण्यात आले असता यावेळी राजू सुपेकर व आजिनाथ खेडकर यांनी बापूराव कासुळे यांना “तुम्ही तक्रार मागे घ्या, नाही तर गावात आल्यावर तुमच्याकडे पाहून घेईन’ अशी धमकी दिली. याबाबत बापूराव कासुळे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर, भरारी पथकाचे देवानंद गायकवाड यांच्या तक्रारीवरून भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर व राजू सुपेकर यांच्या विरोधात भालगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना पैसे वाटताना मिळून आल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कायदा कलम 171 बी व ई प्रमाणे अदखलपात्र गुन्हा गुरुवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास बिट हवालदार रेवणनाथ रांजणे हे करत आहेत. दरम्यान, पोलिसांची व भरारी पथकाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून कारवाईवेळी लाखों रुपये पोलिसांनी जप्त केले असल्याची चर्चा भालगावात असून, पोलिसांनी मात्र केवळ साडेसात हजार रुपये जमा केल्याचे कारवाईत दाखवले आहे. 

पोलीस कारवाईवेळी खाली पडलेले पैसे उचलतानाचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात असून याची चौकशी करण्याची मागणी तालुक्‍यातून केली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.