सरपंचपदाच्या लालसेने राजकारणी कुटुंबे फुटीच्या उंबरठ्यावर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरपंचपदाच्या लालसेपोटी 11 पैकी 10 गावांतील ग्रामपंचायत सरपंचपद निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण पेटले आहे. सोमलवाडी येथे सरपंच व सदस्य निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या गावातील प्रचाराची राळ एकीकडे उडाली असताना दुसरीकडे या पदाच्या मोहाने कुटुंबेच्या कुटुंबे फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. त्याची पहिली झळ ही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांना बसताना दिसत आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अकोले तालुक्‍यात पहिल्यांदा जनतेतून सरपंचपद निवडीसाठी ऐतिहासिक निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सोमलवाडी येथे सरपंच व सदस्यपदांची निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याने हे गाव शांततेच्या लाटेवर विसावले आहे. मात्र, इतर ठिकाणी सरपंचपद हे आपल्याला आमदारकीचे अधिकार मिळवून देणार आहे अशा थाटात सरपंचपदाचे दावेदार आपला प्रचार करीत आहेत.

या पदाच्या लालसेपायी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या कुटुंबात आज तरी उभी फूट पडली असल्याचे चित्र आहे. तर, लहित खुर्द गावात एकेकाळचे मित्र व सोयरे हे या पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असूनही त्यांची दोन गटात विभागणी झाली आहे. डोंगरगाव गावात 10 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. मात्र, सरपंचपदासाठी 6 जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

बिगर आदिवासी भागात मोठी ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या चास या गावचे वातावरण तापले आहे. तेथे माजी प्राचार्य निवडणूक रिंगणात असून त्यांना 2 जणांनी आव्हान दिले आहे. विशेष बाब अशी की, त्यातील माजी प्राचार्यांविरुद्ध त्यांच्या चुलत भाच्यानेच त्यांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. तर, आंभोळ येथे सरपंचपद आरक्षणाच्या भोवऱ्यात अडकले असले तरीही निवडणूक रंगतदार बनली आहे. 

शेंडी हे गाव माजी दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे यांचे गाव. या गावाला त्यांचे चुलते दिवंगत श्रावणा भांगरे यांच्या रूपाने पहिले आमदार मिळाले होते. त्यानंतर यशवंतराव हे आमदार राहिले, तर त्यांचे दिवंगत बंधू राजाराम भांगरे हे सैन्यात होते. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनीही भाऊ यशवंतराव यांना राजकीय भक्कम साथ दिली. त्यांच्या निधनानंतर त्यांनीच माजी मंत्री मधुकर पिचड यांना विधानसभा निवडणूक फडात उतरून आव्हान दिले होते. त्यानंतर त्यांची जागा अशोकराव यांनी घेतली आहे. त्यांच्या निधनानंतर पिचड विरुद्ध भांगरे हा राजकीय संघर्ष सुरूच आहे.

मात्र, या निवडणुकीने या घरात एकीला मूठमाती देऊन बेकीचे वारे वाहू लागले आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी 7 सदस्य बिनविरोध निवडले गेले. मात्र, सरपंचपदाला अनेक वर्षे न्याय देणारे व पंचायत समितीचे माजी सदस्य आणि अशोकराव यांचे बंधू दिलीप यशवंतराव भांगरे यांना त्यांचेच सख्खे चुलत बंधू विजय राजाराम भांगरे यांनी आपला सरपंच पदासाठीचा अर्ज कायम ठेवून कुटुंबातील रक्ताची नाती दुभंगतील अशी कृती केलेली आहे. यामागे माजी मंत्री मधुकर पिचड यांचाच हात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

यासंदर्भात अशोक भांगरे यांनी गावपातळीवर बैठक घेतली. विजय भांगरे यांनी अर्ज मागे घ्यावा, असा उपस्थित 200 कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. मात्र, विजय यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम भांगरे विरुद्ध भांगरे म्हणजेच भाऊ विरुद्ध भाऊ असा सामना रंगतदार बनणार काय हे मतपेटी स्पष्ट करणार आहे. दखलपात्र बाब म्हणजे एरव्ही अशोक भांगरे यांच्या पाठीशी सावलीसारखे वावरणारे विजय हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी संपर्क साधून असल्याचे व या पक्षाच्या कार्यालयात वावरत असल्याचे बोलले जात आहे.

लहित खुर्द येथे एकेकाळी एकमेकांचे नाते व मैत्री जपणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन कार्यकर्ते सरपंचपदासाठी एकमेकांचे राजकीय वैरी बनले आहेत. सुभाष नानासाहेब गोडसे हे या व अन्य गावात डॉक्‍टर या नावाने प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांनी अनेक वर्षे सरपंचपद उपभोगले आहे. आता मला संधी द्या, असा अजेंडा घेऊन त्यांच्याविरुद्ध अर्जुन दत्तू गावडे यांनी पक्षातच बंडखोरी केली आहे. यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. विशेष बाब अशी की सदस्य मात्र बिनविरोध निवडले गेले आहेत.

या गावापासून जवळच असणाऱ्या चास गावातही ही निवडणूक तिरंगी बनल्याने चर्चेत आली आहे. माजी प्राचार्य भागवत सखाराम वाडेकर हे या निवडणुकीत उतरल्याने व त्यांचा चुलत भाचाच त्यांच्याविरुद्ध उभा राहिल्याने येथेही ही निवडणूक गाजणार, असे चित्र आहे. त्यांना बाळासाहेब रामभाऊ शेळके व सचिन मारुती शेळके यांनी आव्हान दिले आहे. डोंगरगाव येथे 6 जण या पदासाठी इच्छुक आहेत. येथे 10 सदस्य बिनविरोध मात्र गावपातळीवर सरपंचपद निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. माजी सरपंच नामदेव ऊर्फ बाबासाहेब बाळासाहेब उगले यांना अमोल रंगनाथ उगले, आनंद सुभाष उगले, गणपत पांडुरंग उगले, शंकर माधव उगले, सुरेश नामदेव हांडे यांनी आव्हान दिले आहे.

तर, दुसरीकडे आंभोळ या बिगर आदिवासी गावात आरक्षणाचे सरपंचपद असल्याने या गावात पंकज देवराम भोजने, कोंडिबा भागाजी वाजे, रोहिदास कुंडलिक सावळे अशी तिरंगी लढत आहे. मुरशेत, वाकी, भंडारदरा, गुहिरे, शिळवंडी या बिगर आदिवासी गावात सरपंच व सदस्यपदाची निवडणूक होत आहे. या व वरील सर्व गावांमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असल्याने काही ठिकाणी आरोपांचे फटाके, ऍटमबॉम्ब फुटत आहेत. दिवाळीपूर्वी ही निवडणूक होत असल्याने सर्व वरील 10 गावांमध्ये प्रचाराने अंतिम टप्प्यात वेग घेतला आहे. दबाव तंत्र, नातेवाईक मध्यस्थी व फोनाफोनी या सर्व बाबींनी या गावांचे राजकीय वारे उष्ण स्वरूपाचे आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.