राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते कृषी पदवीधरांना पदवी प्रदान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्याच्या कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता कृषी पदवीधर तरुणांमध्ये आहे. या पदवीधरांनी कृषी उत्पादन वाढ, वापरकर्त्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणे, शेती क्षेत्रातील धोक्यांचे प्रमाण कमी करणे आणि शेती क्षेत्राकडे करियर म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) अध्यक्ष ए.एस. किरणकुमार यांनी केले. या पुढील काळात जैव तंत्रज्ञान, कृषि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ विज्ञान यांच्या योग्य समन्वयातून भारतीय शेतीचा विकास साधला जाईल, असे त्यांनी नमूद केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 32 वा पदवीप्रदान समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना श्री. किरणकुमार बोलत होते. या प्रसंगी राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुडकर, राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव डॉ. दिलिप पवार, याचबरोबर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार प्रकाश गजभिये, आ. श्री.भाऊसाहेब कांबळे, डॉ. भास्कर पाटील, डॉ. के.व्ही. प्रसाद, संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, विद्यापीठ नियंत्रक श्री. विजय कोते उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 73 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 346 विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व 3365 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 3784 पदव्या प्रदान करण्यात आल्या. श्री. राव यांचे हस्ते सन 2016-17 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. बोरस्ते आरती आनंदराव, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. औटी पुजा बालु, कृषि अभियांत्रिकी मध्ये प्रथम आलेला श्री. गिरगुणे अशोक दिगंबर यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. 

यावेळी बोलताना श्री. किरणकुमार म्हणाले की, भारताची गेल्या दोन दशकातील कृषि प्रगती, अन्नधान्य बाबतीत देशाची स्वयंपूर्तता, भारतीय शेती क्षेत्रासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय आणि यासाठी स्वताचे काय योगदान राहिल या दृष्टीकोनातून कृषी पदवीधरांनी कार्य करावे. कृषि शिक्षणाचे मोठे ज्ञानदानाचे कार्य महात्मा फुले कृषि विद्यापीठ करत आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते यांच्या समन्वयातून आज देशाचे अन्नधान्य उत्पादन 270 दशलक्ष टनावर पोहचले आहे, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या समन्वयातून व भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रहाच्या माध्यमातून कृषि हवामान, अंतराळ आणि जमीन यावर आधारीत निरीक्षणातून कृषि उत्पादनाचा अंदाज घेण्यात येईल. यामध्ये गहू, भात, ज्वारी, कपाशी, भुईमुग, मोहरी या पिकांच्या उत्पादनाचा समावेश आहे. 

त्याचबरोबर ‘चमन‘ या प्रकल्पातंर्गत उपग्रहाच्या मदतीने आंबा, लिंबूवर्गीय पीके, केळी, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि मिरची या पिकांच्या क्षेत्राचा आणि उत्पादनाचा अंदाज घेण्यात येणार आहे. याशिवाय, कोरडवाहू क्षेत्रासाठी पाणलोट क्षेत्र विकास हा महत्वाकांक्षी उपक्रम असून याद्वारे नैसर्गिकसाधन संपत्तीचे जतन होते. इस्त्रो ही संस्था मोबाईल आधारित मृद आरोग्य पत्रिकेच्या निर्मितीसाठी सहाय्य करत असून राज्य पातळीवरील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. 

एकप्रकारे कृषी संशोधन क्षेत्रात साह्यभूत ठरण्याचे काम इस्त्रो करत असल्याचे श्री. किरणकुमार यांनी आवर्जून नमूद केले. देशाने अंतराळ विभागात क्रांती केली असून लवकरच आदित्य-एल 1 हा उपग्रह सौर अभ्यासासाठी अंतराळात पाठविण्यात येणार आहे.

 21 व्या शतकात आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत, जगात प्रचंड वेगाने बदल होत आहेत, यासाठी कृषि पदवीधरांनी योग्य करीयरची निवड करावी. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपल्याकडे ज्ञानाचा खजीना उपलब्ध आहे, याचा आपण सुयोग्य वापर करुन जीवनात यशस्वी व्हावे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. समारंभाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, विद्यापीठाचे विद्या परिषदेचे सदस्य, संशोधन व विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य, माजी कुलगुरू डॉ. वाय.एस. नेरकर, डॉ. किसनराव लवांडे, डॉ. एस.एस. मगर, डॉ. टी.ए. मोरे, डॉ. पवार, डॉ. मायंदे, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष श्री. पोपटराव पवार, श्री साई संस्थानचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर कदम, जिल्हा परिषद कृषि सभापती अजय फटांगरे, यांच्यासह विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी केले. दरम्यान सकाळी 11.15 वाजता राज्यपाल श्री. राव यांचे हेलीपॅडवर कृषीमंत्री श्री. फुंडकर आणि पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्यासह आगमन झाले. जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, कुलगुरू श्री. विश्वनाथा यांनी त्यांचे स्वागत केले. 

राज्यपाल राव यांनी त्यानंतर कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील शास्त्रज्ञांशी आवर्जून संवाद साधला. यानंतर विद्यापीठाने श्री. अडसुरे बंधु यांच्या शेतावर तयार केलेले एकात्मिक शेती पध्दती मॉडेलची पाहणीही त्यांनी केली. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास मॉडेलचे यावेळी श्री. राव यांच्या हस्ते करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.