देशात लोकशाही नाही हुकूमशाही ! माजीमंत्री पिचड यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या देशातील मोदी सरकार त्यांना वाटेल ते निर्णय घेत असून त्यांची ही मनमानी देशाला घातक आहे. सगळेच अधिकार ते स्वत:कडे ठेवत असून मंत्रिमंडळातील मंत्री फक्त नामधारी आहेत. लोकशाहीने सर्वसामान्य माणसाला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा येत असल्याने आपल्या देशात लोकशाही नाही, तर हुकूमशाही असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ.वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तहसील कार्यालयावर 'धिक्कार मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते.

माजी मंत्री पिचड पुढे म्हणाले, 'अच्छे दिन'चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने जी आश्वासने दिली होती, ती हवेतच विरली. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा तर निव्वळ फार्सच आहे. संपूर्ण जगात ४० ते ५० रुपये लिटर पेट्रोल असताना भारतात मात्र ते ८० रुपये लिटर आहे, हा कुठला न्याय ? 

राज्यात मुलभूत सुविधांची गरज असताना गुजरातच्या बुलेट ट्रेनला राज्य सरकारने तीस हजार कोटी रुपये कशासाठी दिले? राज्यात गरिबांच्या शिक्षणासाठी यांच्याकडे पैसे नाहीत म्हणता, मग मोठ्यांच्या शिक्षणासाठी कोठून पैसा येतो? राज्यासह अकोले तालुक्यातले सर्वच विकास प्रकल्प रखडले आहेत. 

देशाच्या विकासाचा दर साडेतीन टक्क्यांवर आला आहे. भ्रष्ट मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतला गेला, ते बहुजन नेते आहेत म्हणून काय? मग प्रकाश मेहता यांना अभय का दिले जाते? राज्यातले फडणवीस सरकार ग्रामविकासाबद्दल उदासीन आहे. 

राज्य सरकारने निळवंडे धरण प्रकल्पाला २० टक्के निधी दिला नाही. त्याच्या अडचणी सोडविल्या नाहीत म्हणून केंद्राने निळवंड्यास निधी देता येत नसल्याचे म्हटले आहे. अढळा धरणाला संजीवनी देणारा बिताका प्रकल्प रखडला आहे. त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी असूनही हे काम सुरू होत नाही. 

पिंपळगाव खांड धरणाची दोन मीटरने उंची वाढवायची आहे. पाण्यात गेलेले कोतुळेश्वर मंदिर बांधायचे आहे; पण सरकार निधी देत नाही. राज्यातल्या सहकारी दूध संस्था बंद करून हे दूध महासंघाला नाही तर गुजरातच्या आनंद डेअरीला पाठविण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे चौदा हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवून ते बेकार होणार आहेत. 

एकूणच राज्यातला शेतकरी अडचणीत आणून त्याला संपविण्याचा कट या भाजपा सरकारचा आहे. जे लोक आपल्या विचारांना साथ देतील त्यांनाही आपल्या बरोबर घ्या. आपल्याला बनवाबनवी व चुकीच्या विचारांच्या विरुद्ध लढायचे आहे. तेव्हा सर्वांनी एकत्र आले पाहिजे. 

पाण्याची लढाई आपण यापूर्वी केली. आपल्या हक्काचे पाणी आपण मिळवू शकलो; पण आता त्या हक्काच्या पाण्यावरही कोणी हक्क सांगायला लागले आहे. त्यांनाही आपल्याला दाखवून द्यायचे आहे की, अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा व चळवळींचा आहे, असेही पिचड यावेळी शेवटी म्हणाले.

आ.वैभवराव पिचड म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा लाखांचा कोट अन् महात्मा गांधीजींचा पंचा या विचारात किती मोठा फरक आहे. एकीकडे मुलभूत सुविधांसाठी देशातील सर्वसामान्य माणूस याचना करतोय, अन् दुसरीकडे मात्र श्रीमंतासाठी हजारो कोटींची बुलेट ट्रेन असा सगळा हा विचारांचा फरक आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकार मात्र ढिम्म आहे. मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी प्रत्येकाच्या बॅँक खात्यात पंधरा लाख रुपये टाकू, असे करू, तसे करू असे सांगुन जनतेला भुलविले. कुठे गेले ते 'अच्छे दिन'? तालुक्यासह राज्यातले रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याला निधी नाही. महागाईने जनता होरपळत आहे. मोदींच्या राजवटीत सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा डाव आखला जात आहे, असेही आ.पिचड म्हणाले.

जिल्हा बॅँकचे चेअरमन सिताराम गायकर म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचा पुरता बोजवारा उडालेला असून पेट्रोल-डिझेलचे दर तर गगनाला भिडले आहेत. महागाईने माणसे हैराण झाले आहेत. शहरातल्या लोकांचे लांगुलचालन सुरू आहे. ग्रामीण भाग उद्धवस्त करण्याच्या या सरकारचा डाव आहे. जिल्हा बॅँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या बॅँकांचे राज्य बॅँकेत विलीकरण करून ग्रामीण अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्याचा या सरकारने घाट घातला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल राहिले नाही. काबाडकष्ट करून पिकविलेला माल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. तेव्हा असे हे कर्मकरंटे सरकार बुडवा, असे आवाहनही गायकर यांनी केले..

मधुकरराव नवले म्हणाले, शरद पवारांसारखा देवदूत या देशाला भेटला अन् शेतकऱ्यांचे कल्याण झाले; पण सध्याचे सरकार तर शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. एक चुक संपुर्ण देश भोगतोय. यापुढे अशी चुक कराल तर पुन्हा हेच दिवस येतील. या सरकारच स्थान रयतेमध्ये नाही. हे सरकार लोकांचे नाही. शिक्षण क्षेत्राची पुरता वाट लागली आहे. नोटाबंदीत अनेक उद्योग बंद पडले. जीएसटीने व्यापारी, उद्योजक हैराण आहेत. मोठ मोठे उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. जीएसटी म्हणजे हा झिजीया कर आहे. तो बंदच झाला पाहिजे, असेही नवले म्हणाले..

युवा नेते विकास शेटे म्हणाले, संपुर्ण देश आज रांगेत उभा आहे. नोटाबंदीपासून या सरकारने सर्वांना रांगेत उभे केले आहे. तालुक्याची लोकसंख्या,क्षेत्रफळ मोठे तरी आधार कार्डासाठी तीनच केंद्रे. तहसीलदारांना याबाबत विचारले तर त्यांनी हात वर केले. सर्वसामान्य माणूस आज मेटाकुटीला आला आहे. देशात व राज्यात नादान सरकार आहे. लोकांची त्यांना परवाच नाही. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन सरकार चालवतात पण त्यांचा विचार मात्र त्यांच्यापासून कोसो दूर आहे. असले हे सरकार घालविलेच पाहिजे, असे शेटे म्हणाले.

यावेळी जिल्हा बॅँकेचे चेअरमन सिताराम गायकर, जि.प.अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, अेटीएसचे अध्यक्ष जे.डी.आंबरे, सेक्रेटरी यशवंत आभाळे, जि.प.सदस्य रमेश देशमुख, असाकाचे संचालक सुरेश गडाख, अशोक देशमुख, कचरू शेटे, राजेंद्र डावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, महिला अध्यक्षा चंद्रकला धुमाळ, शहर अध्यक्षा कल्पना सुरपुरिया, नगराध्यक्ष ॲड.के.डी.धुमाळ, माजी सरपंच विकास शेटे, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड, बाळासाहेब वडजे, युवा नेते राहुल देशमुख, जनलक्ष्मीचे चेअरमन भाऊ पाटील नवले, अगस्तीचे चेअरमन बाळासाहेब भोर आदी उपस्थित होते.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार भांगरे यांना देण्यात आले

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.