राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छोटी शहरे मोठ्या शहरांशी विमानसेवेने जोडल्यामुळे नागरिकांना प्रवासाच्या सुविधा उपलब्ध होणार असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज शिर्डी येथे केले. श्री साईबाबा समाधी शताब्दी व शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक पी. गजपती राजू, जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते.

यावेळी बोलतांना राष्ट्रपती म्हणाले, भौतिक आणि सांस्‍कृतिकदृष्‍ट्या दोन प्रदेश जोडले गेल्‍याने विकासाला चालना मिळते. भारतीय संस्‍कृतीत धर्मासोबत अर्थलादेखील महत्‍व आहे. आर्थिक विकासामुळे रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होतात. त्‍यादृष्‍टीने लहान शहरातील विमानसेवा महत्‍वाची आहे.

शिर्डी येथील आंतराष्ट्रीय विमानतळामुळे जगातील साई बाबांच्या भक्तांना कमी वेळात शिर्डीत येण्याची सोय निर्माण झाली आहे. यामुळे जगाचा कानाकोपऱ्यातून भाविक शिर्डी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात येतील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. मी अनेक वर्षांपासून भाविक या नात्याने शिर्डीस येतो. परंतु आज श्री साई बाबांच्या समाधी शताब्दी उद्धाटनासाठी या भुमीत आल्याने मी स्वत:ला भाग्यशाली समजतो.

साईबाबांच्‍या वास्‍तव्‍यामुळे ही भूमीपावन झाली आहे. शिर्डीची भुमी ही महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवात भर घालणारी आहे. जगातील अनेक देशात साईबाबांचे भावीक आहेत. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. श्री साईबाबा विश्वस्त व्‍यवस्‍थेने मंदिर परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे,असे त्‍यांनी सांगितले.

राष्‍ट्रपती महोदयांच्‍या हस्‍ते श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले. शिर्डी विमानतळाचा विस्‍तार करणार - मुख्‍यमंत्री शिर्डी विमानतळ राज्‍य शासनाने विकसीत केलेले आणि चालविण्‍यास घेतलेले देशातील पहिले विमानतळ आहे. या विमानतळाचा विस्‍तार करण्‍यात येऊन धावपट्टीची लांबी २५०० मीटरवरून ३२०० मीटरपर्यंत वाढविण्‍यात येईल, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी केले.

ते म्‍हणाले, वाहनतळाचे क्षेत्र वाढविण्‍यात येऊन नवी टर्मिनल इमारत उभारण्‍यात येईल. जगातील मोठे विमान उतरू शकेल अशा पद्धतीने दुस-या टप्‍प्‍याचे काम लवकरच सुरू करण्‍यात येईल. डिसेंबरपर्यंत नाईटलॅंडींगची सुविधा करण्‍यात येईल. विमानतळ केवळ वाहतूकीसाठी महत्‍वाचे नसून विमानसेवेच्‍या माध्‍यमातून परिसरातील अर्थव्‍यवस्‍थेला चालना मिळते. विस्‍तारीकरणानंतर शिर्डी विमानतळाच्‍या माध्‍यमातून २५ ते ५० हजार लोकांना रोजगाराच्‍या संधी उपलब्ध होतील. आदरातिथ्‍य व्‍यवसायालादेखील चालना मिळेल.

दहा कंपन्‍यांनी येथून हवाई सेवा सुरू करण्‍यात रस दाखविला असल्याचेही त्‍यांनी सांगितले. शिर्डी विकास आराखड्यातील पहिल्‍या टप्‍प्‍यावर ८०० कोटींचा खर्च करण्‍यात आला असून एकूण आराखडा ३२०० कोटींचा आहे. लवकरच दुस-या टप्‍प्‍यातील विकासकामांना सुरवात करण्‍यात येईल, अशी माहिती त्‍यांनी दिली. मुख्‍यमंत्री म्‍हणाले, श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे भावीक जगभरात असल्‍याने शिर्डी जगाच्‍या आकर्षणाचे केंद्र आहे.

येथे येणारे भावीक जात, धर्म, पंथ असा भेदभाव करीत नाही. महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून सामाजिक एकात्‍मतेचा हा संदेश दिला जावा. साईबाबांनी श्रद्धा आणि सबूरीची शिकवणूक दिली आहे. या विचारांमुळे जीवनात दुःख होत नाही. महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने हा विचार जगभरात पोहोचविण्‍यात यावा, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

मंदिर हे सामाजिक सुधारणेचे केंद्र आहे. या माध्‍यमातून सामान्‍य व्‍यक्‍तींच्‍या जीवनातील दुःख आणि समस्‍या दूर करण्‍याचे प्रयत्‍न होणे गरजचे आहे. श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून गरीबांची सेवा करण्‍याचे कार्य विश्‍वस्त व्‍यवस्‍थेने करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

यावेळी बोलतांना केंद्रीय विमानवाहतूक मंत्री राजू म्हणाले की, देशात विमान वाहतूक क्षेत्र वेगाने विस्‍तारते आहे. त्‍यात शिर्डी विमानतळाच्‍या माध्‍यमातून आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विमानसेवेचा आणखी विस्‍तार करण्‍यासाठी केंद्र सरकार राज्‍यांना सहकार्य करेल. शिर्डी येथील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सतत पाठपुरावा केला.

त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या विमानतळाचे काम वेळेत पूर्ण झाले. विमानतळामुळे शिर्डी हे शहर देशातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, विमानतळाच्‍या माध्‍यमातून शिर्डी जगभराशी जोडले गेले आहे. विमानतळाच्‍या माध्‍यमातून संकल्‍पाची सिद्धीत रुपांतर होत आहे.

साईबाबांचे विचार प्रत्‍येक क्षेत्रासाठी उपयुक्‍त असून महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून ते भावीकांपर्यंत पोहोचवावेत. श्री. विखे-पाटील यांनीदेखील आपले मनोगत व्‍यक्‍त केले. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केल्‍याने विमानतळाचे काम कमी वेळेत पुर्ण झाले, असेही ते म्‍हणाले. यावेळी श्री. हावरे यांनी प्रास्‍ताविकात शताब्‍दी महोत्‍सवाविषयी माहिती दिली.

महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक, प्रबोधन आणि श्री साई पादुका दर्शन अशा पंचसूत्रीच्या आधारे कार्यक्रमांचे आयेाजन होईल, असे ते म्‍हणाले. राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला. मुख्‍यमंत्री फडणीस यांनी राष्‍ट्रपती महोदयांच्‍या वाढदिवसाबद्दल त्‍यांचे अभिष्‍टचिंतन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.