एसटी कर्मचारी संपाला काळी किनार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले आगाराच्या संपकरी मंडपाला आज स्मशानकळा निर्माण करणारी घटना घडली. संपकरी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याची काळी किनार या मंडपाला जोडली गेली. त्यामुळे अकोलेत आज तणावपूर्ण वातावरण पसरले होते. दुसऱ्या दिवशी सुरू असणाऱ्या संपात सहभागी 52 वर्षे वयाच्या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याने संपकरी सैरभैर झाले. या घटनेने सुन्न झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
आज दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपात एकनाथ विठ्ठल वाकचौरे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) हे सहभागी झाले होते. ते मनाने हळवे, सज्जन, निर्व्यसनी होते. 22 वर्षे वाहक म्हणून सेवा करणाऱ्या वाकचौरे यांना महसूलमंत्री यांच्या नावाने पसरल्या गेलेल्या व्हॉटस्‌ ऍपच्या मेसेजने व परिवहनमंत्र्यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या भाषेने अस्वस्थ केले. मात्र, ते काहीच बोलले नाहीत.

यादरम्यान सकाळी 11.30 वाजता आ. वैभवराव पिचड हे संपकऱ्यांना भेटण्यास आले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सचिव यशवंत आभाळे व अन्य कार्यकर्ते होते. आ. पिचड यांचे यावेळी भाषण झाले. ते म्हणाले की, या संपाला आपला संपूर्ण पाठिंबा आहे. विधिमंडळात याविषयी आपण आवाज उठवू, असे त्यांनी जाहीर केले. 

ते गेल्यानंतर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी संपकऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. तर, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना भेट देऊन दिलासा दिला. शिवाय, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वांना चहा दिला. त्यामुळे वातावरण निवळले होते.

यादरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नावाने व्हॉटस्‌ ऍपला मेसेज व्हायरल झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि तसे घडले नाही तर त्यांच्या संप सुरू असणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी तंगड्या साळाव्यात, असा त्याचा आशय होता. तर, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी, कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे अन्यथा त्यांचे निलंबन केले जाईल, असे वक्तव्य टीव्हीवर दाखवले जात होते. (आज सायंकाळी अशा कारवाईची भूमिका त्यांनी बदलली ही बाब वेगळी.) 

अशा चर्चेने हळव्या मनाचे वाकचौरे हादरले आणि त्याने त्यांच्या मनावर ताण आला. त्यात त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. सुमारे दोन वाजेच्या दरम्यान त्यांना डॉ. एम. जी. भांडकोळी यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉ. भांडकोळी यांनी रुग्णाला कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. बहुदा तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला असावा. फक्त ही घोषणा सरकारी दवाखान्यात केली गेली. 

हे वृत्त संपकऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर सर्वांची धावपळ उडाली. एकीकडे सरकारविरुद्ध चीड, तर दुसरीकडे सहकारी निवर्तल्याचे दुःख यामुळे ते व्यथित झाले. सर्व हवालदिल संपकऱ्यांनी रडत-रडत कॉटेज हॉस्पिटल गाठले आणि सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांनी परिवहनमंत्री व महसूलमंत्र्यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला.

मेजर शिवाजी गायकवाड म्हणाले की, आमच्या संपाने सरकारला जाग येणार नसेल तर असे हजारो कर्मचारी या संपात शहीद होतील. पण, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहील. मुख्यमंत्री जोपर्यंत आमच्या मागण्यांच्या संदर्भात लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत संप माघार नाही.

आनंद भालेराव, डी. जी. देठे, शशिकांत केदार, दिलीप भांगरे, आनंद उगले, एस. डी. भोईर व वेतन आयोग कृती समितीच्या सर्व सदस्यांनी वाकचौरे यांच्या निधनाला परिवहनमंत्र्यांना जबाबदार धरले. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची त्यांनी मागणी केली. शिवाय, परिवहनमंत्री अकोलेत येत नाहीत तोपर्यंत वाकचौरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी घोषणा केली.
या नेत्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. शिवाय, सरकारने वाकचौरे यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून “काळी दिवाळी’ साजरी केली जाईल, असे जाहीर केले. 

आगर समन्वयक बुरगुडे व आगारप्रमुख ज्ञानेश्‍वर आव्हाड यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या सर्व घटनेने ऐन दिवाळीत अकोले आगाराला स्मशानकळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपकरी ठिकाण ओस पडल्याने सारेच वातावरण उदास बनले. आता आमचे सर्व लक्ष सरकारी घोषणेकडे आहे, असे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले.

                                                  -------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.