भगवानबाबांच्या जन्मस्थळाचा कायापालट करनार - पंकजा मुंडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भगवानबाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे शनिवारी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला. याप्रसंगी मंत्री महादेव जानकर, प्रा. राम शिंदे, भगवानबाबा मंदिर ट्रस्टचे गहिनीनाथ सानप, माजी आ. केशव आंधळे, राधा सानप, बुवासाहेब खाडे, आ. आर. टी. देशमुख, आ. ॲड. लक्ष्मण पवार, आ. प्रा. संगीता ठोंबरे, गयाबाई कऱ्हाड , जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, प्रवीण घुगे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भक्त आणि समर्थकांची उपस्थिती होती. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

मेळाव्यातील अध्र्या तासाच्या भाषणात पंकजा यांनी महंत व त्यांच्यातील वाद व त्यानंतर झालेल्या टीका-टिप्पणींना उत्तर दिले. संपूर्ण भाषणात त्यांचा रोख महंतांच्या दिशेने होता; परंतु गडाचा अन् गादीचा अवमान कधी आपल्याकडून होणार नाही, असे स्पष्ट करायलाही त्या विसरल्या नाहीत.

त्या म्हणाल्या, सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला झालेल्या विराट गर्दीने मला संघर्ष करण्याची ताकद दिली आहे. या गर्दीने मेळावा जगमान्य झाला आहे. 'जनता किसके साथ है...' असेही उद्गारल्या. जनता पंकजासोबत आहे असे नाही, तर पंकजा जनतेसोबत आहे हे यातून सिद्ध होते. 

राज्यातील प्रत्येक धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाला मला बोलाविण्यात येते, भाषण करण्याचा आग्रह होतो. परंतु आपल्याच श्रद्धास्थानावर बोलण्यास बंदी घालण्यात येते, यामागील कारण अद्याप समजलेले नाही. गडावर मेळाव्यास विरोध केल्यानंतर गतवर्षी पायथ्याला मेळावा घेतला. 

मात्र, माझं काय चुकलं ? हा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. या प्रश्नाने मी व्यथित झाले. मेळावा घ्यावा यासाठी मला भेटायला राज्यभरातून लोक आले. येथे येणाऱ्या गरीब लोकांचा स्वाभिमान हिरावून घ्यावयाचा नव्हता म्हणून नमते घेतले. परंतु महंतांनी परवानगी दिली नाही. गादीचा आदेश मानायचा की जनतेचा आग्रह, त्यामुळे मी भगवानबाबांच्या जन्मभूमीवर मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. उपस्थितांना उद्देशून पंकजा यांनी 'खरं सांगा हा मेळावा पंकजाचा आहे की तुमचा?' असा सवाल केला. त्यावेळी 'जनतेचा...' असा एकच आवाज आला..

कानाला कोण लागले याचे उत्तर काळच देईल.
गोपीनाथगडाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देशभरातून लोक आले होते. यावेळी महंतांनी आपल्या भाषणात 'आता भगवानगडाचा श्वास मोकळा झाला' असे विधान केले. आम्ही गडाचा श्वास गुदमरून ठेवला होता का? असा सवाल करून गडावर यापुढे मेळावा नाही या फतव्याने व्यथित झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. महंत असे बोलू शकत नाहीत असे वाटले. 

मात्र, त्यांचा आदेश शिरसावंद्य मानला. त्यांच्या कानाला कोण लागले ? याचे उत्तर काळच देईल असे त्या म्हणाल्या. आज गडावर काय चित्र आहे याची एक क्लिप माझ्या मोबाइलवर आली. त्यात भक्तांपेक्षा पोलीस अधिक दिसताहेत. अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा दिमतीला आहे. हे पाहून मनाला वेदना झाल्या. लेकीचं सरकार आहे. त्यामुळे महंतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. महंत शंभर वर्षे जगावेत, पण भगवानबाबांच्या आचार अन् विचारांना धक्का लागू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंकजा गहिवरल्या, जनसमुदाय स्तब्ध.
पंकजा यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्यांच्या प्रत्येक वाक्याला दाद देत होते. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावेळी झालेल्या दगडफेकीनंतर अनेकजण भीतीपोटी पळाले. मी दगड लागेल याची फिकीर केली नाही. माईक हातात घेऊन 'भगवानबाबांची शपथ... शांत राहा' असे बजावले. 

मला माझ्यापेक्षा तुमची काळजी आहे. मी मुंबईला असेन, दिल्लीत असेन पण तुमच्या हाकेला धावून येते, असे त्या भावुक होऊन म्हणाल्या. सोबतच गडावर दर्शनासाठी जाता आले नाही याच्या वेदना होतात असे सांगताना देखील त्या गहिवरल्या. त्यानंतर समोर बसलेला विराट जनसमुदाय देखील स्तब्ध झाला. पंकजांना गहिवरलेले पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या

भगवानबाबांच्या जन्मस्थळाचा कायापालट
पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या शेवटी भगवानबाबांच्या जन्मस्थळाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. भगवानबाबांची पाण्यावर तरंगणारी ज्ञानेश्वरी वाचतानाची भव्य मूर्ती उभारणार आहे. ही मूर्ती पंचक्रोशीत कोणालाही दिसू शकेल, अशी असणार आहे.

कर्मभूमीने नाकारले असले तरी जन्मभूमीने स्वीकारले 
श्रीक्षेत्र भगवानगडावर मेळावा घेऊ नये, हा गादीचा आदेश होता तर मेळावा व्हावा हा जनतेचा आग्रह. यात भगवानबाबांच्या जन्मभूमीचा मध्यबिंदू साधला. भगवानबाबांच्या कर्मभूमीने नाकारले असले तरी जन्मभूमीने स्वीकारले आहे. समाधी दर्शनासाठी आज गडावर जाता आले नाही याच्या मनाला प्रचंड वेदना होतात. 

महंतांसोबत आपले वाद नाहीत
हा मेळावा पंकजाचा नसून गोरगरीब, वंचित, उपेक्षित व सामान्य बहुजनांचा आहे, असे प्रतिपादन महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. महंतांसोबत आपले वाद नाहीत हे स्पष्ट करतानाच त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. मात्र, भगवानबाबांच्या विचार-आचारांना नख लावण्याचे काम त्यांच्याकडून होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.