संघर्ष पचवून साखर पेरणारे झुंजार नेतृत्व स्व.कुंडलिकराव (तात्या) जगताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य जनतेच्या आशा आकांक्षाचे केंद्र बनलेल्या कुंडलिकराव (तात्या) जगताप पाटील यांच्या जीवनाचा पुर्वार्ध शुन्यातुन आकारास आला . पिंपळगांव पिसा च्या ग्रामीण परिसरात लहानाचा मोठा झालेला हा सामान्य माणूस, कुकडी सहकारी साखर कारखान्याचा संस्थापक- चेअरमन झाला. हे सत्य भल्या भल्यांना न पचणारे आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कुंडलिकराव जगताप पाटलांना पंचक्रोषितील जनता प्रेमाच्या हक्काने आणि आदरानेही ‘‘तात्या’’ हया नावांने संबोधत असत. कुंडलिक जगताप त्यांच्या स्वकतृत्वाने ‘‘ कुंडलिकराव तात्या’’ झाले. हया कतृत्वाचा इतिहास अनेक वादळांनी भरलेला आहे. म्हणूनच त्यांच्या आयुष्याचे मुल्य सामान्य माणसाच्या मनात वाढले आहे. प्रस्तापित व्यक्ती आणि शक्ती यांच्याशी सातत्याने संघर्ष करून कुंडलिकराव तात्यांनी आपले नाव नगर च्या राजकीय इतिहासात नोंदवून ठेवले.

सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून अनेक शेतक-यांना कर्जवाटपासाठी त्यांनी मदत केली. त्यामुळे नगर जिल्हयातील कानाकोप-यातील शेतकरी, कुंडलिक तात्यांना मनापासून आशिर्वाद देतात. तात्यांचा लोकसंपर्क दांडगा होंता. सकाळ झाली की गरीब गरजू शेतकरी, मजूर तात्यांच्या घराकडे वळायचे. तात्या प्रत्येकांचे समाधान करून त्या माणसांची पाठ राखन करत असत.


कुंडलिकराव जगताप, शेतकरी कुंटुबांत जन्मलेला रांगडा माणूस सात भावंड आणि एक बहीण असे हे कुटूंब वडील रामराव जगताप आणि आई सावित्रीबाई जगताप यांच्या कष्टाळू आणि मायाळु सावलीत लहानाचे मोठे झाले होते.

कोरडवाहू जमीन ! फाटका गरिबीचा संसार . लहान वयातला कुंडलिक 2 पायल्या उसन्या ज्वारीसाठी दुस-याच्या दारात दोन -दोन तास मागणीसाठी थांबायचा, ठिगळाची चड्डी घालून 5 किलोमिटर दुरच्या विसापूरच्या शाळेत चालत जायचा. श्रीमंताची पोरं जेवणाचे डबे खाताना कुंडलिक मात्र चटणीचे बोट तोंडाला चाटुन भाकर तुकडा खायचा, कुंडलिकचे बालपण हुलग्याची भाकर व पाणी पिवून कसेबसे तरले. पण अशाही स्थितीमध्ये कुंडलिकने जिद्द सोडली नाही. नववीच्या वर्गात असताना त्यांनी जनरल सेक्रेटरीची निवडणूक लढवीली आणि विरोधी असलेल्या श्रीमंत उमेद्वारास पराभूत केले.

नगरच्या कॉलेजमध्ये बी.कॉम. चे शिक्षण घेताना कम्युनिष्ट पुढारी कॉ.भापकर आणि त्यांच्या पत्नी हिराबाई यांचा प्रभाव पडला. गरिबांचे प्रश्न, गरिबांविषयीची तळमळ त्या काळात कुंडलिक तात्यांच्या मनात पेरली गेली. माळीवाडयात राहून लाल निषान पक्षाच्या ऑफिसमध्ये गरिबांच्या चळवळीचा अभ्यास तात्यांना घडला.

71-72 च्या दुष्काळामध्ये विद्यार्थी आंदोलन पेटले. होस्टेल व विद्यापिठाची फी माफ करणे, जेवणाच्या डब्याची सोय, पास फी माफ करणे, अशा प्रश्नासाठी कुंडलिक जगताप आणि त्यांच्या मित्रांनी विद्यार्थांचे आंदोलन पेटवले. कॉम्रेड सुरेष गवळी, नंदकुमार झावरे, अर्जुन जाधव, पांडोळे अशा विद्यार्थी नेत्यांची कृती समिती आंदोलनामध्ये कार्यरत होती. 

कुंडलिक जगताप हया कृती समितीत नेतृत्व करत होते. मोर्चे, घोषणा, आंदोलने यामध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि देशाचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण नगरला आले असता, 7 ते 8 हजार विद्यार्थ्यांनी उग्र निदर्षने केली. तेव्हा लाठीचार्ज झाला होता. कुंडलिक आणि त्यांच्या मित्रांचे शिष्टमंडळ नामदार चव्हाण आणि नामदार नाईक यांना नगर कॉलेजच्या रिसर्च सेंटर मध्ये भेटले. तेव्हा या उभय नेत्यांनी विद्यार्थांच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या. कुंडलिक जगताप यांच्या राजकीय इतिहासाचा हा प्रारंभ होता.

विद्यार्थांची फी माफ झाली. आणि साडे तीन हजार विद्यार्थांच्या जेवणाची शासना मार्फत सोयही करण्यात आली. न्याय प्रश्नासाठी संघर्ष करून विजय मिळवण्याची परंपरा, कुंडलिकरावाच्या जीवनात आता सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा तालुका मित्र मंडळ स्थापन केले. 


गुंडगिरीचा विरोध, गरजू लोकांना मदत करणे अशी कामे करताना जनतेशी संपर्क वाढत गेला. त्यावेळी चंद्रकांत सोमवंशी या नेत्याला ‘कामराज’ म्हणत असत. त्यांच्या आणि यशवंतराव गडाखांच्या व डी.एम.कांबळे, डी.डी.घोरपडे यांच्या सहवासात कुंडलिक जगताप, राजकीय आणि सामाजिक कामाचे धडे घेत होते. 

कॉंग्रेस पार्टीमध्ये मुलांना ओढण्यासाठी सोमवंशी प्रयत्न करीत, परंतू कम्युनिष्ट नेते भापकर यांच्या प्रभावामुळे कुंडलिक जगताप प्रारंभी कॉंग्रेसमध्ये जायला तयार नव्हते. परंतू आण्णासाहेब शिंदे सारख्या डाव्या जाणीवेचे नेते, कॉंग्रेसमध्ये राहून जनतेची सेवा करताना सर्वांना दिसत होते. 

परिणामतः युवक कॉंग्रेसची ऑफर स्विकारून कुंडलिक जगताप, जिल्हा युवक कॉंग्रेसचे, उपाध्यक्ष झाले. कम्युनिष्टांचे गरिबांचा कैवार घेणारे तत्वज्ञान आणि कॉ. भापकरांची तपश्चर्या कुंडलिक जगताप यांना सोडवत नव्हती. परंतू सत्येच्या माध्यमातुन गरिबांची सेवा करण्याची संधी, कॉंग्रेस मार्फत उपलब्ध होती. 

शंकरराव काळे, लक्ष्मणराव पालवे, आण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर अशा अनेक नेत्यांचा प्रभाव स्विकारून, कुंडलिक जगताप कॉंग्रेसच्या युवक आघाडीमध्ये सामिल झाले. नेत्यांच्या जिल्हा दौ-यात भाषणाला हजर राहणे. रोजगार हमीच्या कामावर लक्ष ठेवणे, भ्रष्टाचारावर चेक ठेवणे अशी अनेक कामे या कालखंडात केली गेली. उघडया डोळयांना कुंडलिक तात्यांनी गरिबांचे दुःख आणि प्रश्न पाहिले आणि समजून घेतले. 
          

स्वतःच गरीबी भोगल्यामुळे गरीब जनतेच्या आश्रूंची नाळ लगेच जुळून गेली. आणि त्यामुळेच कुंडलिक तात्यांमधला कार्यकर्ता, मातीमध्ये पाय रोवून जनतेच्या मनात रूजत गेला. कॉलेजचे शिक्षण चालू असताना नाशिकला दिलेल्या बहीणीच्या ननंदबाई आमदार लिलाताई पाटील यांनी कुंडलिक जगताप यांना ‘फौजदार व्हायच का ?’ अस विचारल. त्यावेळी फौजदार होणं आजच्या इतक अवघड नव्हत पण अंगात चळवळ असल्याने कुंडलिकराव जगताप यांनी संधी मिळूनही फौजदारकी नाकारली.

युवक कॉंग्रेसचे नेतृत्व करताना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय शिबिरांचे आयोजन करून मान्यवर वक्त्यांमार्फत त्यांनी समाज प्रबोधन घडविले. बाळासाहेब भारदे, भाईसावंत, शरद पवार साहेब, पी.बी. पाटील यांच्या भाषणांचा परिणाम कुंडलिकरावांच्या व्यक्तितत्वावर झालेला आढळतो. 

ऑक इंडीया युथ कॉंग्रेंसच्या गुवाहाटी येथील शिबीरामध्ये आणि दिल्लीच्या कॉंग्रेस मेळाव्यामध्ये कुंडलिक जगताप यांचा तरूण कार्यकर्ता म्हणून सहभाग होता. त्यामुळे गावपातळी पासून राज्य आणि राष्ट्राचे प्रश्न त्यांच्या चिंतनाचा विषय बनले. नेहरू कोण? शास्त्रीजी ची कारर्कीद कामराज योजना, विकेंद्रीकरण कॉंग्रेससच्या दोन गटातील सत्तासंघर्ष, इंदिरा कॉंग्रेस आणि स्वर्णसिंग कॉंग्रेसमधील मतभेद, जयप्रकाशजीचे आंदोलन या सर्व घटनांचा प्रभाव तरूण कुंडलिक जगताप यांच्या मनावर पडला होता. 

त्यातुनच त्यांची राजकीय दृष्टी आणि राष्ट्रीय भूमिका विकसित झाल्याचे दिसते. इंदिरा गांधीचा प्रभाव असल्यामुळे आणिबाणीचे समर्थन त्यावेळी कुंडलिकरावांनी केले होते. त्यानंतर इंदिरा गांधीना तुरूगात टाकल्यावर मोरारजीभाईंचा पुतळा जाळण्यात व धरणे, मोर्चे काढण्यात कुंडलिक जगतापांच्या सहभागाचा राजकीय इतिहास नगर जिल्हयाने अनुभवीला आहे.

कुंडलिकराव जगताप यांनी आय.टी.आय कॉलेजच्या निवड समितीच्या संचालकांच्या माध्यमातुन अनेक ग्रामीण विद्यार्थांना न्याय दिला. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कुंडलिक जगताप यांनी आक्रमक शैलीमध्ये कामे केले. कुंडलिकराव म्हणजे तरूण, तडफदार आणि ओबडधोबड रांगडा कार्यकर्ता सामान्य माणसाची कामे त्यांनी इमानदारीने केली. फार मोठे पद किंवा संधी कॉंग्रेसकडून कुंडलिक तात्यांना मिळाल्याचा इतिहास नाही. म्हणून कॉंग्रेसवर त्यांची नाराजी कायम राहीली. सत्य व स्पष्ट बोलणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून तात्यांचा बोलबाला वाढत गेला.
                       

कुंडलिकराव तात्यांनी कुकडी सहकारी साखर कारखाना काढला. 15 कि.मी.परिसरात शिवाजीराव नागवडे आणि बबनराव पाचपुते यांचे दोन साखर कारखाने चालू असतानां तात्यांनी तिस-या कारखान्याची उभारणी केली. तालुक्यामध्ये तिसरी शक्ती उभी राहु नये म्हणून, शिखरावर चढलेल्या पुढा-यांनी कुंडलिकराव जगताप यांना ठाई-ठाई विरोध केला. अडथळे आणले. कारखान्याला जागा मिळू दिली नाही. 

‘‘कुंडलिक जगताप वेडा माणूस आहे. तो कारखाना काय काढणार’’ अशा वावड्या उठवल्या. लोकांच्या मनात संशय पेरला. परंतू कुंडलिकराव तात्या म्हणजे चिवट माणूस ! मुंबईच्या आणि दिल्लीच्या रस्त्या-रस्त्यावर गावच्या शिळया भाकरी खाउन, या जिद्दी माणसाने पुढा-यांची दारे झिजवली आणि माळरानावर पन्नास कोटीच्या साखर कारखान्याची उभारणी केली. कारखान्याच्या स्थापनेच्या वेळीच दोन मेगावॅट वीज निर्मीतीचा प्रकल्प सुरू करून नगर जिल्हयात या माणसाने नवा इतिहास घडविला.

तेरा हजारच्यावर सभासद संख्या असणा-या या कारखान्याच्या संचालक मंडळात, सर्व जातीच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. क्षमतेपेक्षा अधिक गाळप करून हजारो शेतक-यांना जास्तीचा भाव देण्याचा पराक्रम या कारखान्याने नोंदवला आहे.

परिसरातील शेतक-यांच्या मुलांना कारखान्यात नोक-या मिळाल्यामुळे आणि उसाला चांगला भाव मिळाल्यामुळे बहुसंख्य जनता कुंडलिकराव तात्यांच्या जयजयकारात समाधान मानत. कोणत्याही हंगामाच्या सुरूवातीला आणि समाप्तीला कुंडलिकराव तात्या, साधु संत महाराजांना बोलावून त्यांच्या हस्ते पुजाविधी करतात. कारण तात्यांचे मन ईश्वर भक्तीने परिपुर्ण होते.

कुंडलिकराव तात्यानी ग्रामीण मुलांमुलींची शिक्षणाची अडचण लक्षात घेवून सावित्रीबाई कॉलेज आणि रेणूकादेवी हायस्कुल काढले. त्यामुळे हजारो विद्यार्थांची सोय झाली. ग्रामीण भागातील मुली त्यामुळे शिक्षित झाल्या. त्यांच्या शिक्षणाची सोय इथे नसती तर त्या अनपढ राहील्या असत्या ! म्हणूनच कुंडलिक तात्यांना विरोध करणा-या घराघरातील आया - बहीणीसुद्धा शिक्षणाच्या पवित्र कार्याबद्दल तात्यांना दुवा देतात.

कुंडलिकराव तात्यांनी कुकडीचे पाणी शेतक-यांच्या बांधावर नेण्यासाठी संघर्ष केला. रेल्वेचे गेट ओपन करण्यासाठी आंदोलन केले, कालव्याच्या पाण्यासाठी मोर्चे काढले. जनतेसाठी जिव्हाळयाच्या प्रश्नावर हा माणूस आयुष्यभर भांडत राहीला. म्हणूनच जनतेनेही तात्यांना साथ दिली. साद दिली आणि निष्ठाही वाहीली.

साखर कारखान्याचे संस्थापक- चेअरमन राहुनही हा माणूस कणभर साखर खाऊ शकत नव्हता कारण त्यांना डायबेटीस आजार होता. उपाशी- तापाशी राहुन लोकांसाठी झटणा-या या माणसाला विरोधकांनी दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची जिद्द आणि उत्साह आजही कायम होता. 

रोज कारखान्यावर जाउन साखरेच्या उत्पादनापसून ते भंगाराच्या तुकडया पर्यंत हे लक्ष द्यायचे. अगदी किचकट प्रश्न सुद्धा त्या-त्या खात्यामधील तज्ञांच्या चर्चेतुन सहज सोडवायचे. कामगारांच्या भावना जपायचे. कर्मचा-यांचे दुःख जाणतात. जोडप्या-जोडप्यांना स्नेह भोजन देवून शेकडो बहीणींना साडी- चोळीचा आहेर कामगार कुटुंबियांना तात्यांनी दिला आहे. कुंडलिक तात्यांना एकच सख्खी बहीण असली तरी मानलेल्या बहीणींची संख्या हजारच्यावर वाढत गेली होती.

कुंडलिकराव तात्यांचा स्वभाव मुलतहाः मायाळु होता पण आयुष्यभर आगीत सोसल्यामुळे तात्या बरचसे रागीटसुध्दा होते. दोन दे - दोन घे अशा हाणामा-या त्यांच्या आयुष्यात ब-याच झाल्यात. तात्यांचे भाषण त्यांच्या अनुभवातुन व निरीक्षणातुन दाखले देत पुढे सरकले. भाषणामध्ये ते सहजपणे विनोद पेरायचे.


बैठकीमध्ये रंगात येउन तात्या गप्पा मारायचे, लोकव्यवहारातील संदर्भ देत. हसतांना ढग गडगडल्यासारखे सात मजली हसायचे आणि रागावतांना वीजेसारखे कोसळायचे. सभ्य आणि विद्वान माणसाचा तात्या सन्मान करत कलावंत खेळाडू पैलवान या सर्वांच्यां गुणांची ते कदर करत. गरजूंना मदत करत. तात्यांनी लोक कल्याणाचे प्रकल्प राबवतांना पक्ष बदलला, भूमिका बदलली, परंतू सर्व पक्षातील पुढा-यांचे व कार्यकर्तेचे मैत्री संबंध जपले. साधु-संत महाराज यांचे पाय पुजले. 

उंच व कणखर बांधा, राकट उग्र चेहरा, पहाडी आवाज, बोलण्या-वागण्यात जरब, सत्य व स्पष्ट बोलणे, मनात माया, अकृत्रिम प्रेमळपणा, रांगडी जीवनशैली, माणूस पारखण्याची कला, सुक्ष्म निरिक्षणाची सवय, चिकीत्सापुर्वक तिढा सोडवण्याची हातोटी, प्रंचड बुध्दीमत्ता व अफाट स्मरणशक्ती, बुलंद निर्णयक्षमता आशा अनेक गुणांनी कुंडलिकराव तात्यांचे व्यक्तीत्व भारलेले होते. 

कनवाळुपणा आणि कठोर वृत्ती यांचा संगम या ग्रामीण नेत्यात झालेला दिसतो. बेगडी नाटकी हासणे, द्वेशबुध्दी, खंजिरे खुपसण्याची वृत्ती असे दोष या माणसात मुळीच नव्हता. सामान्य माणसाची फसवणूक कधीही व कुठेही होणार नाही, याची शाश्वती देता येते. प्रतिस्पर्धी पुढारी बेरकी, बेईमान, बदमाश असल्याने त्यांना समजून घेताना व त्यांची जिरवताना जेवढा बेरकीपणा आवश्यक असतो तेवढा पोलिटिकल बात कुंडलिकराव तात्यांच्या भूमिकेत होता. पण त्यांची बाधा जनतेच्या जिव्हाळयाशी केव्हाही झाली नाही.

रडकेपणा, उदासिनता, नाकर्तेपणा या दोषापासून हे नेतृत्व कोसो दुर होते. सतत खळखळणारी उर्जा या माणसात नांदायची, म्हणूनच भक्ती परमार्थपासून ते राजकारणासह लोककलेपर्यंत या माणसांची रसिकता थेट भिडताना सर्वांना दिसली आहे.

राजकारण , समाजकारणात डोंगराएवढी उंची प्राप्त करूनही भक्तीच्या अस्सल रंगात कुंडलिक तात्या रमून जायचे. परमार्थाच ढोंग न करता भोळा भक्तीभाव रूजवत. साधु महाराजाच्या पायावर लोळण घेतात. भक्तीचे नाटक तात्या करीत नसायचे. परमार्थाशी गद्दारी करीत नसायचे. त्यांची विठ्ठल भक्ती अस्सल होती. म्हणूनच त्यांचा सेवाभाव जनतेच्या आदरांचा विषय होता.

श्रीगोंदा तालुक्याला या माणसाच्या रूपाने एक सच्चा व दुरदर्षी असा कार्यक्षम नेता मिळाला होता. विधायक कृतीची साक्ष त्यांच्या कुकडी सहकारी साखर कारखान्याने सिध्द केली. प्रामाणिक कार्यकर्ता, अस्सल माणूस, सरळमार्गी भगवंत भक्त आणि जनहितवादी लोकनेता म्हणून कर्मयोगी कुंडलिकराव तात्यांचा लौकीक सर्वदुर पसरला…

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.