लोकप्रतिनिधींना नेवाशातील जनतेच्या प्रश्नापेक्षा ठेकेदार महत्त्वाचा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा शहराला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जो सुमारे अडीच कोटीचा निधी आला. त्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी नेवासकर उपोषणाला बसले. परंतु, ठेकेदाराला राजाश्रय मिळत असल्याने या प्रकरणाची साधी चौकशीही झाली नाही. यावरून हे सिद्ध होत आहे की, लोकप्रतिनिधींना नेवाशातील जनतेच्या प्रश्नापेक्षा ठेकेदार महत्त्वाचा वाटतो असा आरोप माजी आ. गडाख यांनी केला.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शहरातील विकास कामांना क्रांतिकारीच्या नगरसेवकांचा पाठिंबा राहिल, पण जेथे गैरव्यवहार होईल तेथे आवाज उठविला जाईल, ही भूमिका आम्ही आधीच जाहीर केली होती. त्यानुसार शहराच्या पाणीप्रश्नी आमची लढाई सुरू आहे. जनतेला स्वच्छ पाणी मिळेपर्यंत या प्रश्नी एक पाऊलही मागे हटणार नाही, असा विश्वास माजी आ. शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. नेवासा येथे झालेल्या भाजप, शिवसेना, मनसेतील कार्यकर्त्यांचा क्रांतिकारी पक्ष प्रवेशाप्रसंगी ते बोलत होते.

नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे शिवसेना, मनसेचे उमेदवार वर्षा पवार, आशाताई पवार, मारुती पवार, भाऊसाहेब पवार यांच्यासह अनेकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात नेवासा येथे गडाख यांच्या उपस्थिती प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील होते. प्रास्ताविक नगरसेवक बापूसाहेब गायके यांनी केले.

गडाख म्हणाले, पावसामुळे गढूळ पाणी येत आहे, असे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिले. यासारखे केविलवाणे काही नाही. गढूळ पाणी येऊ नये याकरिता दोन कोटी ६७ लाखांचा देखभाल दुरूस्तीचा निधी आला आहे, एवढी साधी गोष्ट यांना कळत नाही का ? अधिकारी कुणाच्या तालावर नाचतात हे उघड सत्य आहे. अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणे आवश्यक असते याचा त्यांना विसर पडला आहे.

जनावरांनाही हे पाणी पिण्याजोगे नाही, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे. तरीही असे गढूळ पाणी जनतेला प्यावे लागत आहे. पाहुण्या ठेकेदाराने अधिकारी लोकप्रतिनिधींना असे काय दिले म्हणून त्यांची बोलती बंद झाली. अधिकाऱ्यांना कसे वठणीवर अणायचे याचा आम्हाला चांगला अभ्यास झाला आहे.

नगरपंचायतीच्या निवडणूक काळात गल्ली गल्लीत फिरणारे आमदार आता कुठे गेले ? नेवासा शहर स्मार्ट सिटीची घोषणा केली. ज्यांना पाणी स्वच्छ देता येत नाही, ते काय स्मार्ट सिटी करणार ? काम न करता श्रेय घेण्याचीच सवय यांना लागली आहे.

जेथे नगरपंचायत मंजूर होते, त्याठिकाणी लगेच पाच कोटींचा निधी द्यावा, असा शासकीय जीआर आहे. पण त्यांनी त्यातही स्वत:चे हसू करून घेतले. यापुढे आपल्या सर्व नगरसेवकांनी जागरूक राहावे व जनतेच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य द्यावे, असे गडाख यांनी सांगितले. यावेळी दत्तू अहिरे, अब्दुल पठाण, तुकाराम पवार, खंडू बर्डे, परशराम माळी, राजू पवार, तान्हाजी बर्डे, अमोल काळे, कारभारी खुसे, हरिभाऊ वाघाडकर, रमेश बर्डे, अंकुश बर्डे यांच्यासह अनेकांनी क्रांतिकारी पक्षात प्रवेश केला. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.