चुकीच्या धोरणामुळे साखरेची अवस्था कांद्यासारखी - माजी आ.शंकरराव गडाख.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साखर कारखाने बाजारातील परिस्थिती पाहून कोणत्या महिन्यात किती साखर विकायची हे ठरवतात. नफा-नुकसानीचा विचार करतात. मात्र ग्राहकांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने यावर मर्यादा आणून सक्तीने साखर विकण्याचे बंधन घातल्यामुळे साखरेची अवस्थाही कांद्यासारखीच झाली असल्याची टिका माजी आ.शंकरराव गडाख यांनी केली. मुळा कारखान्याच्या ४७ व्या वार्षिक साधारण सभेप्रसंगी प्रमुख भाषणात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन नानासाहेब तुवर हे होते. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

गडाख पुढे म्हणाले मागील वर्षी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी २४ टक्के आणि चालू वर्षी तर ८ टक्के साठ्याची मर्यादा घातली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांवर सक्तीने साखर विकण्याची वेळ आली असून त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांनाही सहन करावा लागणार आहे.

मागच्या हंगामात केवळ ८.९४ टक्के इतका कमी उतारा मिळाला. मुळा धरणात पाणी असूनही केवळ योग्य नियोजन न झाल्याने उसाच्या वाढीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील अगस्ती, संगमनेर व प्रवरा कारखान्यांना वेळेवर व पुरेसे पाणी मिळाले. त्यामुळे मुळेपेक्षा जवळपास पावने दोन टक्के साखर उतारा त्यांना जास्त मिळाला. नेवाशाच्या लोकप्रतिनिधींनी सुध्दा पाण्याचे चांगले नियोजन केले असते तर साखरेचा उतारा वाढून शेतकऱ्यांना आणखी किमान ३५० रु. जादा दर देता आला असता. 

मागील हंगामात उसाची उपलब्धता वाढावी म्हणून शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर खते देण्यात आली. त्यासाठी प्रतिटन १९५ रु. खर्च केला. ७०:३० च्या सुत्रानुसार शासनाने मुळाचा ऊस भाव २४०१ रु. निश्चित केला. इतर कारखान्यांपेक्षा रिकव्हरी कमी असतानाही मुळेचा हा दर निघत असून खत अनुदानासाठी खर्च केला नसता तर उसाचा दर आणखी १९५ रु. वाढला असता. 

शेतकऱ्यांच्या करोडो रुपयांची गुंतवणूक करून वीज प्रकल्प उभारले, मात्र त्यांनी तयार केलेल्या विजेची विक्री करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्य सरकार त्यांची वीज घेण्यास तयार नाही. त्यासाठी त्यांनी एक समिती नेमली असून वीज विक्री व दराबाबत भविष्यात प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगून कारखाने वापरत असलेल्या विजेवरही कर बसवल्यामुळे विजेचा दर युनिटला सव्वा रुपये कमी होणार असल्याचे ते म्हणाले. 

चालू वर्षी मुळा धरणाची परिस्थिती चांगली राहणार असून जायकवाडीच्या पट्ट्यातही पोषक वातावरण आहे. मात्र पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे होण्याची गरज असून त्यासाठी पुन: आंदोलने करण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिवाळीपूर्वी १२ कोटींचे वाटप.
गत हंगामातील उसाचे फायनल पेमेंट, परतीच्या ठेवी व ठेवीवरील व्याजाचे १२ कोटी रुपये दिवाळी पूर्वी ऊस उत्पादकांच्या बॅँक खात्यावर वर्ग केले जाईल अशी घोषणा शंकरराव गडाख यांनी या वार्षिक सभेत केली. उपस्थितांनी टाळ्यांचे गजरात या निर्णयाचे स्वागत केले. .

सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्यांचा सन्मान.
मागच्या गळीत हंगामात आडसाली, सुरु, खोडवा उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या ४ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सपत्निक सत्कार गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. पुढील गळीतातही उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.