इतरांसारखे संस्‍था बंद पाडण्‍याचे पाप आमच्‍याकडून नाही : ना.विखे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांसाठी या परिसरावर अनेकवेळा संघर्ष करण्‍याची वेळ आली. खासदार साहेबांच्‍या मार्गदर्शनाखाली वैचारिक भूमिका घेऊन विकासाचे मार्ग साध्‍य केले. अनेक आव्‍हाने उभी राहिली, तरी इतरांसारखे संस्‍था बंद पाडण्‍याचे पाप आमच्‍याकडून झाले नाही. संस्‍थांच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांच्‍या पाठिशी खंबरीपणे उभे राहण्‍याचे काम सुरू आहे; मात्र शेजारच्‍यांच्‍या आशिर्वादाने या कामांना गालबोट लावण्‍याचे काम सुरू झाले आहे; पण इथल्‍या कामावर विश्‍वास दाखवून सुज्ञ शेतकरी, सभासद ही वावटळ परतवून लावतील, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची ६८वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झाली. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, कारखान्‍याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, नंदू राठी, बाजार समितीचे सभापती बापुसाहेब आहेर, तुकाराम बेंद्रे, प्रवरा बॅँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, डॉ. भास्‍करराव खर्डे, शांतीनाथ आहेर यांच्‍यासह कारखान्‍याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आधिकारी, शेतकरी, सभासद याप्रसंगी उपस्थित होते.

ना.विखे पाटील म्हणाले, संकटांवर मात करत आपल्‍या कारखान्‍याने आजपयंर्त सभासदांना उच्‍चांकी भाव देण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. आव्‍हाने उभी राहिली, तरी संस्‍था बंद पाडण्‍याचा धंदा केला नाही. शेतकरी, कामगारांना ज्‍यांनी वाऱ्यावर सोडले, ते आज विविध प्रश्‍न उपस्थित करून, कामांना गालबोट लावण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. काही स्‍वकीयही या कामाला आता मदत करू लागले आहेत; याचे दु:ख वाटते. त्‍यांच्‍या पत्रकबाजीला सुज्ञ शेतकरी, सभासद थारा देणार नाहीत, असा विश्‍वास व्‍यक्‍त करून ते म्‍हणाले की, सहकारी साखर कारखानदारीपुढे विविध समस्‍या उभ्‍या आहेत.

समन्‍यायी पाणीवाटप कायद्यापासून ते उसाच्‍या कमी झालेल्‍या क्षेत्राचा मोठा परिणाम सहकारी कारखानदारीवर होत आहे. हे आपण सर्वजण पाहात आहोत. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या बदलत्‍या धोरणांचा विपरीत परिणाम होत आहे. एफआरपीप्रमाणे भाव देण्‍याचे बंधन यापूर्वी होते. आता ७०-३० हा नवा फॉम्‍र्युला पुढे आला आहे. सरकारच्‍या निर्णयाप्रमाणे ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना कालही जास्‍त भाव दिला, उद्याही निश्चित देऊ. 

सहकारी साखर कारखानदारी सक्रमण अवस्‍थेतून मार्गक्रमण करीत आहे. बंद पडलेले साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेण्‍याचा धंदा या राज्‍यात सुरू झाला होता. राज्‍यात मंत्री म्‍हणून काम करीत असताना याला जाहीरपणे विरोध करण्‍याची भूमिका आपण घेतली. सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, या उद्देशाने धाकटा भाऊ म्‍हणून गणेश सहकारी साखर कारखाना चालविण्‍यास घेतला. 

आज आर्थिक असंतुलन असले, गणेश कारखाना यशस्‍वीपणे चालविण्‍याची हमी आम्‍ही घेतलेली आहे. गणेशच्‍या सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्‍यांनी सांगितले. गोदावरी आणि प्रवरा खोऱ्यात नवीन पाणी निर्माण केल्‍याशिवाय पर्याय नाही, ही भूमिका घेऊन पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्‍याबाबतचा प्रस्‍ताव खासदार साहेबांनी सातत्‍याने मांडला. अनेक वर्षे केवळ खासदार साहेबांना पाण्‍याच्‍या मुद्यावर वादग्रस्‍त ठरविण्‍याचा प्रयत्‍न या परिसरातील काही मंडळींनी केला; पण हक्‍काच्‍या पाण्‍याचा संघर्ष त्‍यांनी सोडला नाही. 

पाणी परिषदेच्‍या प्रस्‍तावाच्‍या कार्यवाहीचे आदेश केंद्र सरकारने राज्‍य सरकारला आता दिले आहेत. या कामाची कार्यवाही सुरू झाली, हे या कामाचे फलित आहे. गोदावरी खोऱ्यात दमणगंगा, नारपार खोऱ्याच्‍या माध्‍यमातून ५४ टीमएसी पाणी वळविण्‍याची कार्यवाही केलेल्‍या पाठपुराव्‍यामुळे सुरू झाली आहे. निळवंडे धरण कालव्‍यांसाठी निधी मिळविण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. या भागातील दुष्‍काळी पट्ट्याला दिलासा मिळवून देऊ, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.