निंबोडी घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गाचे छत कोसळून ३ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला व १८ जण जखमी झाले. याप्रकरणी गुरूवारी (दि.३१) शाळेचे केंद्रप्रमुख, गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी व मुख्याध्यापिका अशा चौघा जणांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी तत्कालिन ठेकेदार व अधिकाऱ्यांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रकाश मोहन पोटे (वय ३२, धंदा मजुरी, रा. निंबोडी, ता. जि. अ. नगर) यांनी भिंगार कॅंप पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी वैष्णवी प्रकाश पोटे (इ. ५ वी, वय ११) ही जि.प. प्राथमिक शाळा निंबोडी येथे शाळेमध्ये शिकत होती. दि. २८/८/२०१७ रोजी सदर शाळेची भिंत व स्लॅप कोसळून माझी मुलगी कु. वैष्णवीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच इतर १८ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. सदर शाळेची इमारत ही नुकतीच काही वर्षांपूर्वी बांधलेली होती.

सदर शाळेच्या भिंतींना तडे गेलेले होते व बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होते. भिंत व बांधकाम पडण्याच्या स्थितीत होते. म्हणूनच त्या ठिकाणी वर्ग भरण्यात येत नव्हता. तो वर्ग गोडाऊन म्हणून वापरत होते. परंतू असे असतानाही सदर स्टोअर रूम केव्हाही पडेल अशी होती. म्हणून वर्ग भितीपोटी बंद होता. असे असताना १५ ऑगस्ट २०१७ नंतर सदर स्टोअर रूम म्हणजे वर्ग निष्काळजीपणा दाखवून पुन्हा मुलांना तेथे बसवणे चालू केले. 

सोमवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी गावात पाऊस येत होता. निकृष्ट दर्जाचे बांधकाम व पडण्याचे स्थितीत असलेला वर्ग अशा परिस्थितीत तेथे मुलांना बसवणे अत्यंत चुकीचे, गंभीर व मुलांचा जिव धोक्यात घालण्यासारखे होते. सदर वर्ग खोल्या बाबतची परिस्थिती तेथे वेळोवेळी भेट देणारे व जबाबदारी असणारे त्या शाळेचे केंद्रप्रमुख श्री. भोर, गटशिक्षण अधिकारी रामदास हराळ, गटविकास अधिकारी वसंत गारूडकर, मुख्याध्यापिका दातीर अशा अधिकाऱ्यांना होती. या सर्वांनी वर्गाच्या स्थितीबाबत गांभीर्य दाखवले नाही व कर्तव्य पार पडले नाही.

इमारत पडून त्याखाली मुले दबून त्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व अधिकारी या घटनेत जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच जेव्हा भिंत व स्लॅब कोसळला तेव्हा स्लॅबसाठी आवश्यक आर. सी. सी. कॉलम व पिलर कोठेही आढळून आले नाही.

सदर बांधकामाचे त्या काळातील ठेकेदार व संबंधित तत्कालीन सर्व अधिकारी दुर्घटनेस जबाबदार आहेत. शाळा बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून या सर्व दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करावी. अन्यथा मुलीचा दशक्रिया विधी रस्त्यावर करून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.