पठारवाडीच्या गायरानातून- उध्वस्त होऊन शून्यात गेलेली माणसे अगदी लाईव्ह ...

लेखक - प्राजक्त झावरे पाटील.

मागच्या रविवारी पारनेरकर युवा विकास मंचचा कार्यक्रम आटोपून आम्ही 'यशवंत'मध्ये मस्त फक्कड चहा पीत बसलो होतो.. कार्यक्रमाला उपस्थित असणारी अनेक मान्यवर मंडळी सोबत होती.. कार्यक्रमाची यशस्विता व पुढची दिशा यावर सर्वजण आपली मते मांडत होती.. बोलता बोलता चर्चेची गाडी मंचच्या रुळावरून इतर सामाजिक घटनांवर उतरू लागली..पावसाने भरलेली मुंबई,झपाट्याने बदलणारी शहरे, पाणी प्रश्न असे करत करत ६-७ दिवसापूर्वी घडलेल्या निघोज परिसरातील अनधिकृत बांधकाम इथपर्यंत चर्चेचा ओघ पोहचला...

" मी ग्वाल्हेरला बाहेरगावी असताना मला हे समजलं.. सगळेच भयानक होते.." कातरलेल्या आवाजात विश्वास बोलला...

विश्वास चेडे ... तरुण उद्योजक.. या पारनेरकर मंचच्या कार्यक्रमात ओळख झाली.. आमचा दानशूर देणगीदार होता गडी.. तसंच त्याची अजून एक ओळख झाली ती म्हणजे त्याने स्वीकारलेला वसा- अनवाणी दिसणाऱ्या प्रत्येक पावलाला चप्पल-शूज यातून आधार देण्याचा.. त्याच्या गाडीच्या डिक्कीत आपल्याला हमखास 10-15 जोड नक्कीच मिळणार..

"खुपच अवघड झाले ते.." सर्वजण एकसुरात बोलले..

"सर, मला त्यांना आजच काही मदत करता येईल का?" पारनेर पत्रकारसंघाचे संस्थापक-अध्यक्ष व समाजशील व्यक्ती संजयजी वाघमारे यांच्याकडे पाहत विश्वास बोलला.. संजयजी म्हणजे समाजसेवेच ATMच.. सदैव तत्पर..

" आजच...?" त्यांनी खिशातला फोन काढत विचारलं..

"हो,आज झाले तरच होईल ,पुढे ढकलले की ते बारगळतच.." विश्वास ठाम विश्वासाने बोलला...

"हॅलो रामदास , पठारवाडीतील अतिशय गरजू कुटुंब शोध ,त्या कुटुंबाला मदत करावयाची आहे.. आम्ही येतो तासाभरात" संजयजींचा तोपर्यंत फोन ही झाला..

"चला प्राजक्त, प्रवीण, बाबुराव आपण पठारवाडीला जाऊन येऊ.." सर माझ्याकडे पाहत बोलले..

"सदैव तयार!! सर" मी नि प्रवीण (प्रवीण गायकवाड, पानोली) लागलीच मान हलवून तयार झालो...

विश्वासच्या गाडीतून आम्ही निघोज-पठारवाडीच्या रस्त्याला लागलो.. पठारवाडी व सुलाखेवाडी या निघोज गावातील वाड्या आहेत.. मागील ६-७ दिवसापूर्वी या दोनाही वाड्या मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अक्षरशः सपाट करण्यात आल्या होत्या.

निघोज येथील कवाद यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून निघोज येथील ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी काही वर्षापूर्वी केली होती.. या याचिकेवर सुनावणी होऊन हे सर्व अतिक्रमणे महसूल विभागाने काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.. त्यावरून ही कारवाई करण्यात आली..

गाडीतील गप्पामधून वरील मुद्दे कानावर आदळत होते.. मी मुंबईत राहत असल्याने हे रस्त्याकाठचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त होताना बऱ्याचदा पाहिले होते..तसेच हे काहीतरी असेल..

पी पी आवाज करत गाडी एका नर्सरीजवळ थांबली.. संजयजींचे मित्र रामदास घावटे (दारूबंदी कृतीसमितीचे सदस्य आणि एक यशस्वी Tissue Culture द्वारे नर्सरी उभी करणारे उद्योजक) यांचीच ती नर्सरी होती.. " नमस्कार" म्हणत रामदासजी आमचे स्वागत करून त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले.. "मी गरजवंत कुटुंबाचा अंदाज घेऊन एक कुटुंब फायनल केले आहे.." रामदासजी आमच्याकडे पाहत बोलले.."गुड" संजयजीनी समाधानाने मान डोलवली... तिथेच साधक-बाधक चर्चा करत चहा-पाणी आटोपून थोड्या वेळाने आम्ही खऱ्या पीडितक्षेत्राकडे निघालो...

धुराळा उधळत गाड्या वाडीत घुसल्या.. मी आपला रस्त्याच्या आजूबाजूला बघत होतो.. नक्की कुठे घरे पाडली आहेत ते.. पण कुठेच काही नव्हते... "म्हणजे रस्त्यालगतचे काहीच पाडले नाही तर..." मी आपला पुटपुटलो..." तेच तर" प्रविण पण न राहून बोललाच..

गाडी वाडीच्या मुख्य रस्त्यातून अडवळणीच्या रस्त्याला वळली.. रस्ता कसला नुसता फुफाटाच.. "हे पहा इथून पाडलय सगळेच.." संजयजी बोट दाखवत बोलले.. फक्त रस्ता वाढवायचा म्हणून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त होताना मी पहिली होती पण इथे तर उजाड माळरानावरचा संसार आडवा केला होता... गाडी मध्यभागी जाऊन थांबली.. भराभर आजूबाजूचे सगळे बाधित इवलस तोंड करून आमच्यापाशी गोळा झाले.. अगदी आशाळभूत नजरेने न्याहाळत... रामदासजी तिथलेच असल्याने त्यांनी आम्हा सर्वांची ओळख करून दिली..

"आमच्या चार पिढ्या याच घरात गेल्या; ही पाचवी" तोंडात एक उरलेला दात दाखवत तो म्हतारा खाकरत बोलला नि तसाच हातातली काठी थरथरत बाजूला झाला.. त्याचे पाणावलेले डोळे अजूनही जीवाची कालवाकालव करतात.. मग एक एक जण बोलू लागला..

जवळपास ४० ते ५० वर्षापासून या ३२ घरांमध्ये ही माणसे आपला संसार गुण्यागोविंदाने करत होती.. जुन्या काळातली दगडाची, मातीची अश्या साध्या घरांसोबतच गाई गुरांच्या गोठ्यासाहित अगदी बंगल्यापर्यंतची घर या सरकारी भूकंपात जमिनीला बिलगली होती.. टुमदार शिळ वाजवत सुरू होणारी इथली सकाळ त्या भयाण दिवशी भग्न वाळवंटात हृदयद्रावक शिळ वाजवत घेऊन गेली होती...

आजूबाजूला घराचं कब्रस्तान अतिशय भयानक दिसत होतं... दिवसभर त्या घरांमधून हुंदडणारी छोटी पिल्ले टाहो फोडून आपलं घर शोधत होती.. निसर्गाच्या अवकृपेने आधीच खचलेल्या धन्याला धीर देणारी घरातली लक्ष्मी पदर पसरून आक्रंदत होती.. आणि पहाडासारखा खंबीर धनी आतून पार उन्मळून पडला होता... हे होणारच होते .. हक्काचा निवारा असा गेल्याने हे होणारच होत...चार भिंतीतला संसार असा उघडव्यार आल्याने हे होणारच होत...

" साहेब , हे गायरान त्यावर आम्ही अनधिकृत आलो म्हणून हाकले आम्हाला.." एका तरुण पोराच्या आवाजाने आमचं लक्ष वेधले..

गावातील जनावरांना चरायला मोकळे असणारे हे सामाजिक रान म्हणचे गायरान, गावकीच्या मालकीचं... त्यावर यांनी आपली घरे बांधली .. तीही ३०-४० वर्षांपूर्वी .. त्यात त्यांनी मालमत्ता कर सुद्धा भरला असे ते आवर्जून सांगतात देखल.. फक्त त्यांनी ते नियमित करण्यासंबंधी करावयाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले हेच काय ते त्यांचं चुकलं..

मुंबईत वोट बँक टिकावी म्हणून २००५ पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या नियमित होतात... परंतु इकडेे ४० वर्षांपूर्वीची जिवंत घरे पत्यांचा कागदासारखी विखरून टाकली जातात... या संबंधी दोष कुणाचा हा प्रश्न उरतोच.. आपल्या संस्थेचा ,आपल्या राजकारण्यांच्या धोरणांचा की वाडीतील लोकांचा ?

मालमत्ता कर वसूल करणारी -इलेक्ट्रिसिटी इ.सहज देणारी आपली शासकीय संस्था नाही का याला जबाबदार ? आपल्या राजकीय क्षेत्रात काय घडतंय याचा दूरदृष्टीने विचार न करणारा इथला प्रत्येक राजकारणी नाही का जबाबदार ? की या वरील दोघांवर विश्वास ठेवणारा पीडितग्रस्त जबाबदार ..?कोण?

आम्ही सगळ्याच घरांचा फेरफटका मारला.. ऐन पावसाळ्यात या लोकांना चिंब करणारा हा प्रसंग खुपच थरारक व अंगावर काटे आणणारच होता.. जणू काही आयुष्यातील सर्वच अडचणींची ढगफुटीच त्यांच्या वाडीवर झाली होती.. नवीन जमिनीचा तुकडा घेऊन त्यावर परत घर उभारायची आर्थिक हिम्मत या लोकांमध्ये नसणारच होती. म्हणून तर त्याच ठिकाणी कोसळणाऱ्या पावसात हे पाल ठोकून उभे होते..

"कोण कोण आले होते पाहायला?कोणी काही मदत केली का?"

"कसली मदत .. तोंडी आश्वासने देऊन गेलेत फक्त.. परत विषयच नाही.." सगळेच बोलले..

तालुक्यासहित जिल्ह्यातील बडे नेते इथे येऊन गेले ,मीडियात चमकले पण अजून या पीडितांना काहीच मदत ना शासनाकडून मिळाली ना वयक्तिक त्यांच्याकडून ...पोकळ आश्वासने देऊन फक्त मिरवणे कितपत योग्य?आपण इतके संवेदनशून्य झाले आहोत का? आपला संसार असा उघडयावर आला असता तर? कुणाची चुकी आहे की नाही हा मुद्दा घर क्षितिजसमांतर झाल्यावर करणे अयोग्यच आहे.. त्याऐवजी आपला हात या पीडितांना बळ कसा देईल हे पाहणं महत्वाचं आहे.. तेच होताना दिसत नाही.. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी घर ना घर धुंडाळणारी राजकारणी नावाची जात तर शोधून ही सापडत नाही.. तब्बल एक आठवडा उलटून एकही प्रत्यक्ष मदत पोहचलीच नाही हे हिरमुसल्या चेहऱ्याने ते सांगतात.. उघड्यावर उधानलेल्या त्यांच्या चुली नि त्यावर उडणारी कावळ्यांची टोळी किती विचित्र देखावा ना तो...

"साहेब , हे ते पठारे कुटुंब" रामदासजींचे मित्र आमच्या शेजारी उभ्या असणाऱ्या एका महिलेकडे व तिच्या दोन तरुण मुलांकडे बोट दाखवत बोलले.. " आणि हे त्यांचं घर..." मातीचा ढीग पडलेल्या जागेकडे बोट दाखवत ते बोलले..

पोरे तरणी होती आणि आई मध्यमवयीन...

"हे साहेब आपल्याला मदत द्यायला आले आहेत" त्या बाईला रामदासजी बोलले..

त्यांची थोडीशी कौटुंबिक माहीती मोठ्या मुलाने सांगितली.. गहिवरलेल्या विश्वासाने लागलीच मदतीच पाकीट त्या माऊलीच्या हातात दिले.. पटापट कॅमेरे चमकले नि हा क्षण कैद झाला..

टचकन माऊलीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.. कापरे भरलेल्या हाताने ती पाया पडायला खाली वळली.. संजयजी ,विश्वास नि आम्ही लागलीच मागे सरकलो.. त्या माउलीला उठवत विश्वास बोलला, "तुम्ही आमच्या आईसारख्या आहात..."

त्या माऊलीच्या वागण्यातली तगमग काळजाच पाणी करत होती.. सगळंच हातातून गेल्यावर शून्यात गेलेली माणसं आम्ही तिथे पहिली.. काठीच्या आधारावर सावरून उभ्या असणाऱ्या दोन आजोबांच्या हातावर पण विश्वासने रक्कम ठेवली... मदत केल्याचं समाधान होते पण त्याहून त्यांची आगतिगता जीवाला व्याकूळ करत होती.. तुमच्यापर्यंत नक्कीच अधिकाधिक मदत घेऊन येऊ...हे बोलून आम्ही गाडीत बसलो...

ही भयाण परिस्थिती बघून माझ्या मनात कल्लोळ उठला होता.. माणूस म्हणून आपण सगळे नीच ठरत तर नाहीत ना? उघड्यावर पडलेल्या संसाराला बळ देण्यासाठी फक्त फुकाचेच शब्द आपण वापरतो, हे तर त्याचंच लक्षण ना? राजकारणी नेत्यांनी काहीच नाही केले म्हणून हातावर हात ठेवून हे असेच आहेत असं म्हणून त्यांच्यासमोर लोटांगण आपणच घालतो ना? माझं स्वतःच दुःख समजून मी यात कधीच उतरणार नाही का?

काय नि किती प्रश्न...
अनुत्तरित की अनपेक्षित की मनाला न रुचणारे...

पण काहीही असो... जोपर्यंत विश्वास सारखी ,संजय सरांसारखी ,प्रवीण गायकवाड सारखी जिवंत मनाची माणसे आहेत तोवर हे जमिनीत अर्ध रुतलेले समाजच चाक किमान तग धरून तरी राहील हे नक्की...

(टीप:- समाजाप्रती आपली बांधीलकी आहे, याच भान ठेवून मार्गक्रमण केल्यास प्रगती नक्की आहे...)

लेखक
प्राजक्त झावरे पाटील
प्रार्थमिक शिक्षक ठाणे

संपर्क - 8898880222



-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.