ब्लॉग - आयुष्याच्या वाटेवरील एक अनमोल रत्न

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून

वेळ कधी अशी येते, सूर्य याचक बनून काजव्याजवळ छोटे प्रमाणपत्र मागू लागतो, अशीच काहीशी अवस्था मनाची झालीय. कारण अशा उत्तुंग आणि प्रगल्भ व्यक्तीमत्वाला शब्दात बंदीस्त करणे मुळातच अवघडत असते. आयुष्यात आपला अनेक व्यक्तींशी संपर्क येतो, परंतु काही व्यक्तींचा सहवास आपल्या मन:पटलावर कायमचा कोरला जातो. कधीही न पुसण्यासाठी....

होय असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्व न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पा. गत वीस बावीस वर्षांपासून मी त्यांना पाहतोय, अनुभवतोय, प्रसंग वेगवेगळे असतील... पण त्या सर्व प्रसंगातून मला न्यायमूर्ती साहेबांच्या कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती, विचारांमधला ठामपणा, सत्यता, प्रामाणिकता, प्रगल्भता, वागण्यातून आणि विचारांतून आदर्श धडा देण्याची वृत्ती, अखंड वाचन असे त्यांच्या स्वभावाचे कितीतरी गुणविशेष उलगडत गेले, आणि त्यांच्याबद्दलचा आदर दुणावत गेला. न्यायमूर्ती साहेब न्यू लॉ कॉलेजमध्ये १९७४-८४ दरम्यान अध्यापनाचे कार्य करीत होते. हे इतरांना सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो.

१९७१ साली कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे वकिली सुरू करून स्वत:च्या सखोल ज्ञान आणि कौशल्याने न्यायालयात विविध प्रकारचे स्वरुपाचे खटले चालवून पक्षकारांना न्याय मिळवून दिला.अत्यंत लहान-लहान विषयांवर ते समरसतेने काम करायचे. निवृत्तीनंतरही ते वेळोवेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात येवून ग्रंथसंपदेचा पुरेपुर वापर करीत.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विश्वस्तपती नेमणूक झाल्यानंतर सेवाभावी वृत्ती व नि:स्वार्थीपणे आणि त्यागी भूमिकेतून त्यांनी या वटवृक्षच्या संस्थापकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला व शिक्षणदानाचे अविरत कार्य सुरु ठेवले.

याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी अभ्यासमंडळाचे सदस्य, अनेक जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, आपले स्नेही जी.डी.खानदेशे, प्राचार्य भराडी यांच्या सहकार्याने स्थापन केलेली संभाजीराजे नागरी पतसंस्था अशा असंख्य संस्थाची धुरा यशस्वीपणे वाहिली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना कितीतरी 'लॅण्डमार्क' निवाडे त्यांनी दिले. निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी,जमिनीविषयक वारसा हक्क अशी अनेक उदाहरणे आहेत.

त्यांचा सामान्य जनतेला प्रत्यक्ष लाभ झाला. आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी राज्याच्या पटलावर स्वत:ची ओळख निर्माण केली. निवृत्तीनंतरही महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा आदर करीत सुरुवातीला राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्षपद आणि नंतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करीत त्यांच्या कार्यकौशल्याचा लाभ घेतला.

त्यांच्या जाण्याने विधी सेवाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनौपचारिक गप्पात आम्हा प्राध्यापकांना उत्कृष्ट शिक्षक होताना, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करताना शिक्षक कुठेही कमी पडता कामा नये, असा त्यांचा अट्टहास होता..

आयुष्याच्या पटलावर त्यांची अर्धांगिनी ॲड.दीपलक्ष्मी म्हसे पा. या प्रत्येक पावलाबरोबर त्यांच्यासमवेत दिसल्या. न्यायमूर्ती साहेबांच्या सावली म्हणून मिरविताना त्यांनी कधी अहंभाव आणि गर्व जाणवू दिला नाही. म्हसेताईंची आपुलकी आणि जिव्हाळ्याचे बोलणे हे त्यांच्यात जणूकाही उपजतच साहेबांकडून आले म्हटले तरी वावगे ठरु नये. साहेबांनी स्वत:ची ओळख निर्माण करताना कुटूंबाकडे जराही दुर्लक्ष होऊ दिले नाही. 

पत्नीस उच्चविद्याविभूषित करताना आपल्या दोन लाडक्या कन्या कु.माधवेश्वरी आणि कु.राजेश्वरी यांना अनुक्रमे वकील आणि वास्तूविशारद बनविले. आज समाजासमोर म्हसे पा.कुटुंबीयांची उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत आणि आदर्श कुटूंब अशी ओळख आहे, ती केवळ साहेबांच्या अथक परिश्रमातूनच! प्रसिद्धी आणि संपत्ती याबद्दल अहंभावाचा लवलेशही न बाळगता अत्यंत साधेपणाने ते वावरले म्हणून आपणा सर्वांना ते आपल्यातीलच एक वाटतात. माऊली संकुलात झालेले त्यांचे भाषण अखेरचे ठरले.

शेवटी एकच म्हणावेसे वाटते. 'कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिण सोडल्यावर कस्तुमृग सापडतो, हजारो शिंपे उघडल्यावर एक मोती सापडतो, आयुष्याच्या वाटेवर शेकडो माणसे भेटतात, पण साहेबांसारखे रत्न भेटणे, हे सुदैवच म्हणावे लागेल.


-प्रा.रामेश्वर दुसुंगे,.
न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.