कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी शिर्डी मतदारसंघात पाच मदतकेंद्रे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक असलेला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना भरून तो जमा करता यावा, यासाठी शिर्डी मतदारसंघात पाच मदतकेंद्रांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

राज्य शासनाने शेतक‍ऱ्यांना कर्जमाफी योजना लागू केली आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अट घालण्यात आली आहे. ग्रामीण भागात सदर अर्ज दाखल करण्यासाठी निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे सदर अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेत सहभागी होता येईल का नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ऑनलाईन पध्दतीने कर्जमाफी योजनेचे अर्ज दाखल करण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारकडे केली होती. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या सर्वच अडचणीकडे शासनाचे लक्ष वेधले. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे खोळंबू नये, शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ घेता यावा म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात एकूण पाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात आश्वी खुर्द, लोणी येथे जनसेवा संपर्क कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय कोल्हार, साईबाबा इ्स्टिटट्यूट पिंपळस राहाता आणि ना.विखे पाटील यांचे शिर्डी येथील जनसंपर्क कार्यालय याठिकाणी हे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या केंद्रात शेतकरी आपले कर्जमाफीसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे फॉर्मसह जमा करू शकतील, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

या केंद्रात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तांत्रिक सुविधा आणि फॉर्म भरण्यासाठी अनुभवी प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध देण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.