भूमाफियांच्या हितासाठी ‘आयटी पार्क’ला खोडा, आयटी विद्यार्थ्यांचे प्रयत्न धुळीला.


दैनिक दिव्य मराठी :एमआयडीसीचे अधिकारी आयटी उद्योगांसाठी राखीव असलेले भूखंड विकत घेणाऱ्या उद्योजकांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी नगरच्या आयटी पार्कच्या गाळ्यांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. वास्तविक आयटी उद्योजकांनी एकत्र येऊन मागणी करूनही हा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत उद्योगासाठीच्या जागेचा म्हणजेच आयटी पार्कच्या गाळ्यांचा लिलाव करण्याची तरतूद नसताना केवळ केलेली पापे झाकण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी हा ‘उद्योग’ केल्याची संतप्त प्रतिक्रिया आयटी उद्योजकांत उमटली आहे.

एमआयडीसीत उद्योजकांपेक्षा भूमाफियांचे राज्य आहे. एमआयडीसीतील निम्म्याहून अधिक प्लॉटवर एक तर उद्योगच नाहीत किंवा फक्त शेड उभ्या केलेल्या आहेत. तरीही खऱ्या उद्योजकांना मात्र उद्योग सुरू करण्यासाठी जागा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. १७ वर्षांपूर्वी आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी बांधलेले आय टी पार्कही भूमाफिया त्यांच्याशी हितसंबंध असलेले एमआयडीसीचे अधिकारी यांच्यामुळे सुरू झाले नाही.

ते सुरू होणारच नाही, याची पूर्ण ‘काळजी’ आतापर्यंतच्या एमआयडीच्या सर्व अधिकाऱ्यांनी घेतली. आताही हीच ‘काळजी’ घेत त्यांनी नगरमध्ये फारसे अस्तित्व नसणाऱ्या दोन इंग्रजी वृत्तपत्रांत नगरच्या आयटी पार्कच्या गाळ्यांच्या लिलावाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. पण, त्याची माहिती मिळाल्याने आय टी उद्योजकांत खळबळ उडाली आहे. एमआयडीसी सांगेल त्या दरात गाळे घेण्याची आयटी उद्योजकांची तयारी असताना एमआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा उद्योग केला आहे. हे गाळे दुसऱ्या उद्योजकांच्या घश्यात घालण्याचा त्यांचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.

माहिती तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी सन २००० मध्ये हे आयटी पार्क बांधण्यात आले. त्यात ४४ गाळे आहेत. पण, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आयटी उद्योजकांना ते मिळू देण्याचाच चंग बांधला आहे. त्यामुळे विविध कारणे दाखवत आयटी उद्योजकांना तेथे येण्यापासून अधिकाऱ्यांनी रोखल्याचा इतिहास आहे. एक मार्च २०१३ रोजी नगरमधील आयटी उद्योगाशी संबंधित उद्योजकांनी आधी यातील ३४ गाळे मिळण्यासाठी प्रकल्प अहवालासह प्रस्ताव नाशिकला सादर केले. त्यासोबत दोन हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्टही जोडण्यात आला होता.

प्रस्तावांत डाटा प्रोसेसिंग, वेबसाईट डेव्हलपिंग, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, डिझाईन सेंटर इतर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांचा समावेश होता. मात्र, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सहा रुपये चौरस मीटरचा दर थेट २१ हजार शंभर रुपये असा तिपटीहून अधिक वाढवून उद्योजकांना दणका दिला. त्याही दरात उद्योजक आयटी पार्कमधील गाळे घेण्याची तयारी दाखवून तशी पत्रे एमआयडीसीला दिली. 

त्यानंतर उद्योजकांना सात सप्टेंबर २०१५ रोजी मुंबईत या उद्योजकांच्या मुलाखतींचा फार्स करण्यात आला. ३४ गाळ्यांसाठी २३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, मुलाखतीचे फक्त एक पत्र असोसिएशच्या नावाने पाठवण्यात आले. तेही मुलाखतीच्या तारखेच्या दिवशी दुपारी म्हणजे मुलाखतीची वेळ टळून गेल्यावर मिळण्याची ‘व्यवस्था’ करण्यात आली.

या आधीही मानभावीपणाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ‘आयटी पार्क घेण्यास कोणताही उद्योजक तयार नाही,’ असा शेरा मारत या गाळ्यांसाठी तीन वेळा लिलावाच्या निविदाही काढल्या, पण त्यांनाही अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मुळात या लिलावांची जाहिरातही आयटी उद्योजकांच्या नजरेस येणार नाही, अशा वृत्तपत्रांत ती देण्यात येते.

आताही ती दोन इंग्रजी वृत्तपत्रांत देण्यात आली आहे. ज्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, अशा राज्याचे उद्योग विभाग जाहिराती इंग्रजी वृत्तपत्रांत का देतो, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अशा प्रकारे नगरमध्ये आयटी पार्क सुरू होणार नाही, याची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भूखंडाच्या दलालीत हितसंबंध असलेले पूर्ण ‘काळजी’ घेण्यात येत आहे.

आयटी विद्यार्थ्यांचे प्रयत्न धुळीला
आयटीपार्क सुरू व्हावे, यासाठी शहरात संगणक अभ्यासक्रम शिकणाऱ्या दोन हजार विद्यार्थ्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांंना निवेदन दिले होते. त्याच्या प्रती मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांना पाठवण्यात आल्या आहेत. त्यांनीही आयटी पार्कमधील ३४ गाळ्यांसाठी उद्योजकांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जोर लावला होता. कारण नगरमध्ये फारसा औद्योगिक विकास झाल्याने नगरमध्ये शिक्षण घेणाऱ्यांंना सध्या नोकरीसाठी मात्र बाहेर जावे लागत आहे. नगरचे आयटी पार्क सुरू झाल्यास शहरातील संगणकविषयक शिक्षण झालेल्यांना बाहेर जावे लागणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

विमानतळांचा ‘आयटी’ला लाभ
गाळे मोठ्या उद्योगांना लहान वाटत असतील, तर एमआयडीसीत आयटीसाठी वेगळ्या पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्यात. पुणे औरंगाबादला विमानतळ आहे. शिर्डीजवळ काकडीलाही विमानतळ उभारण्यात आला आहे. त्यामुळे आयटी उद्योगाला येथे मोठा वाव आहे. त्यामुळे आयटी उद्योग येण्यासाठी आता वेगळे प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे आयटी पार्कमधील गाळे लिलावाने देणे योग्य नाही. कारण ते व्यावसायिक कारणांसाठी घेतले जाण्याची भीती आहे. तसे होणे उद्योग विकासाच्या दृष्टीने चुकीचे आहे.

उद्योजकांचे ६८ हजार ‘खाल्ले’
एक मार्च २०१३ रोजी नगरमधील आयटी उद्योगाशी संबंधित उद्योजकांनी आधी यातील ३४ गाळे मिळण्यासाठी प्रकल्प अहवालासह प्रस्ताव नाशिकला सादर केले. त्यासोबत दोन हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्टही जोडण्यात आला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी लवकर काहीच निर्णय घेतला नाही. नंतर मुलाखतीचा फार्सही उरकण्यात आला. आता लिलावाचा फंडा अवलंबण्यात आला आहे. मात्र, उद्योजकांकडून आलेल्या प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या ड्राफ्टची रक्कम ६८ हजार रुपये आहे. ती रक्कम मात्र एमआयडीसीने परत करता अक्षरश: हडपली.

लिलावाची पद्धतच नाही...
एमआयडीसीत उद्योगासाठी जागा देताना लिलावाची पद्धतच नाही. जर निविदा काढली, तर ती कोणीही घेऊ शकेल. त्यामुळे आयटी पार्क उभारणीचा उद्देशच वाया जाण्याची भीती आहे. कारण एमआयडीसीत जागा घेण्याआधी उद्योगाचा प्रकल्प अहवाल द्यावा लागतो. तो मंजूर झाल्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होते. लिलावात जागा घेऊन एखाद्याने आयटी पार्क वेगळ्या कारणासाठी वापरण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या संबंधित अधिकारी नेमके हा उद्योग कोणासाठी करत आहेत, या बद्दल संशय निर्माण झाला आहे.

आयटी उद्योगाला नगरमध्ये मोठा वाव
नगरमध्ये आयटी उद्योग यायला तयार नाही, हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे नाही, तर निखालस खोटेपणाचे आहे. अनेक आयटी उद्योजक नगरमध्ये येण्यास तयार आहेत. कारण पुण्यासारख्या ठिकाणी आता त्यांना व्यवसायवृद्धी करण्यासाठी जागेची मुख्य अडचण भेडसावत आहे. त्यांना नगरचे भौगोलिक स्थान या उद्योगासाठी महत्त्वाचे वाटते. जागा पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास नगरमध्ये आयटी उद्योग झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे झपाट्याने नगरचा आर्थिक विकास होऊ शकेल. पण, काहींच्या हितसंबंधांसाठी या उद्योगाचा बळी देण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.