ग्राउंड रिपोर्ट: यामुळे कोसळली जिल्‍हा परिषदेच्‍या निंबोडी शाळेची इमारत.

दिव्य मराठी अहमदनगर :- नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची वर्ग खोली कोसळून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जी वर्गखोली कोसळली, तिचे काम १९९७-९८ मध्ये पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे, ही वर्ग खोली ग्रामपंचायतीने बांधून दिली होती. या स्थळाची पाहणी केली असता कोसळलेल्या बांधकामात सिमेंट कमी आणि मातीच जास्त दिसत होती.

                        

फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अत्यंत निकृष्ट प्रतीच्या बांधकामामुळेच ही दुर्घटना घडली. भ्रष्टाचार किती खालपर्यंत खोलवर मुरला आहे, त्याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आपला पाल्य शाळेतूनसुद्धा सुरक्षित घरी येईल, की नाही याची शाश्वती पालकांना राहिलेली नाही. जिल्हा परिषदेनेही शाळांच्या धोकादायक इमारती पाडण्यास केलेली टाळाटाळ या घटनेला कारणीभूत आहे.

सायंकाळी शाळा सुटण्याच्या दहा मिनिटे आधी म्हणजे ४.५० ला ही दुर्घटना घडली. त्यानंतर शिक्षकांनी आरडा-ओरडा केल्याने परिसरातील ग्रामस्थ धावून आले त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यामुळे मुलांना लवकर बाहेर काढणे शक्य झाले. त्यावेळी नेमका जोरात पाऊस सुरू होता.

मुळात सिमेंटचे बांधकाम २० वर्षांत कधीच आपोआप कोसळू शकत नाही. ही वर्गखोली बांधताना अभियांत्रिकीचे कोणतेच नियम पाळले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पडलेल्या कामात वाळूपेक्षा मातीच अधिक दिसत होती. या घटनेनंतर सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांनी शाळेच्या बांधकामाची तपासणी केली. हे जर आधीच झाले असते, तर कदाचित त्या दुर्दैवी मुलांचे प्राण वाचू शकले असते. या वर्गखोलीचे काम करणारे, खोलीच्या बांधकामाला मान्यता देणारे, या सर्वांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची गरज आहे.

सायंकाळी गावात फक्त दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची खबर आली होती. नावे जाहीर झालेली नव्हती. जी मुले घरी परतली नव्हती, त्यांचे पालक चिंताग्रस्त चेहऱ्याने येऊन चौकशी करत होते. आपला पाल्य व्यवस्थित असल्याचे वृत्त ऐकून ते निश्वास सोडत असले, तरी ज्यांची मुले गंभीर जखमी होती, ते त्वरेने नगरकडे धाव घेत होते. कोणाच्याही जीवात जीव नाही, अशी स्थिती होती.

या शाळेतील जिल्हा परिषदेने बांधलेल्या बांधकामाचीही स्थिती अशीच भयानक आहे. एका ग्रामस्थाने मागील बाजूस नेऊन दोन वर्षांपूर्वी केलेल्या बांधकामाचे प्लास्टर बोट घासून काढून दाखवले. भिंतीला वरून रंग दिलेला असला, तरी त्याच्या खाली तेथे हाताला चिखल लागत होता. इमारतींच्या स्लॅबच्या खालच्या बाजूस मोठे तडे गेले होते.

मुख्याध्यापकांच्या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या पडवीच्या स्लॅबमधून पाण्याचे मोठे थेंब गळत होते. अनेक वर्गांच्या दरवाजाच्या वरच्या बाजूचे प्लास्टर पडले होते. दरवाजांची स्थितीही वाईट आहे. तेथे जमलेल्या गर्दीत जी चर्चा सुरू होती, ती फक्त ग्रामपंचायत जिल्हा परिषदेने केलेल्या बांधकामातील भ्रष्टाचाराचीच होती. ‘दिव्य मराठी’ गेल्या चार वर्षांपासून सातत्याने जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारतींबाबत लिहित आहे.

अनेकदा या इमारती पाडण्याचा निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे विषय विषय सभा बैठकांत चर्चिले गेले. प्रत्यक्षात या इमारती जागेवरच राहिल्या आहेत. त्या पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला अजून किती दुर्घटना हव्या आहेत, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.