श्रीगोंदा आणि पूर्व भागावर पाण्याचा अन्याय करणारांना आगामी विधानसभेत लोक धडा शिकविणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा परिसरातील १० व ११ नंबर चारी आणि श्रीगोंद्याच्या पूर्व भागातील १२, १३ व १४ नंबर चारीला कुकडीचे पुरेसे आवर्तन मिळू दिले जात नाही. आणि शेतक-यांवर अन्याय केला जातो. आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करून श्रीगोंद्याच्या पश्चिम भागातील चा-या फोडून कालव्याचा गेज पाडला जातो आणि १० ते १४ नंबरच्या चा-यांना कुकडीचे पाणी मिळत नाही. पडद्यामागून अशा खेळ्या करणा-या नेत्यांना पक्के ध्यानात ठेवून श्रीगोंदा परिसर आणि पूर्व भागातील शेतकरी सन २०१९ च्या आगामी विधान सभेमध्ये धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिला आहे.


प्रा. दरेकर म्हणाले, पश्चिम भागातील लोकप्रतिनिधींना पूर्व भागातील लोकांचे काहीच घेणे देणे नाही, असाच अनुभव आम्हाला सतत येत आहे. कर्जतचे सिंचन होईपर्यंत पालक मंत्र्याच्या दडपणाखाली कुकडीचे अधिकारी टेल टू हेड चे सूत्र तंतोतंत पाळतात. कर्जत तालुक्याचे सिंचन संपलेकी अधिकारी पश्चिम भागातील लोक प्रतिनिधीच्या दडपणाखाली पश्चिमेकडील चा-या खोलण्याची मूक समंती देतात व बघ्याची भूमिका घेतात. परिणामी कालव्याचा गेज पडतो व पूर्व भाग पाण्यापासून वंचित राहतो. याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संयुक्तपणे जबाबदार असल्याचा आरोप प्रा. दरेकर यांनी केला आहे.

कुकडी डाव्या कालव्याची डिझाईन १८५० क्युसेक्स क्षमतेची आहे. पुणे जिल्ह्यातील नेते आणि अधिकारी संगनमताने कालवा फुटण्याची सबब पुढे करून कालवा १४५० क्युसेक्सने पूर्वी सोडत होते. आता तर तो फक्त १३५० क्युसेक्सने सोडला जात आहे. पाणी वाचवून आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याचा तेथील नेत्यांचा डाव असतो व त्याला तेथील अधिकारी पाठबळ देतात.नगर जिल्ह्यातील एकही लोक प्रतिनिधी त्यांना जाब विचारण्याचे धाडस करीत नाही. कि.मी. ११० खाली पूर्वी ११०० क्युसेक्सने पाणी सोडले जात होते , आता ९५० क्युसेक्सने पाणी सोडले जाते.म्हणजे १५० क्युसेक्सने कालवा कमी करून पूर्व भागावर अन्याय केला जात आहे.

वास्तविक पहाता प्रति कि.मी.ला ५ क्युसेक्स प्रमाणे ५० कि.मी. अंतरातील कालव्याचे २५० क्युसेक्स पाण्याचे लॉसेस ( नुकसान ) अपेक्षित आहेत. मात्र प्रत्येक्षात ३२५ क्युसेक्स लॉसेस होतात. म्हणजे ७० ते ८० क्युसेक्स पाणी नेत्यांचे कार्यकर्ते पळवतात आणि नेते मूग गिळून बसतात.त्याचा परिणाम पूर्व भागात पाणी मिळण्यावर होतो. श्रोगोंद्याच्या पश्चिम भागात काही चा-या पहिल्या दिवसापासून चालतात हे नेत्यांना दिसत नाही का ? का आपल्या भागात झुकते माप देण्याचा उद्देश असतो ? १८ जुलैला सुटलेले पाणी २० ते २५ जुलै अखेर विसापूर मध्ये सोडले. त्यानंतर गेली २० दिवस कर्जत तालुक्यात चालू आहे. शेतक-यांची पिके जळून चालली आहेत तरी अध्याप १० ते १४ नंबर चा-यांना पाणी मिळालेले नाही. १४ ऑगस्ट १७ रोजी १४ नंबर चारी सोडली जाणार असली तरी आज कालव्याला २८० क्युसेक्सचा गेज आहे.

श्रीगोंद्याच्या पूर्व भागावर कोण कोण अन्याय करतोय ? याच्या नोंदी आम्ही ठेवलेल्या आहेत. श्रीगोंद्याच्या पूर्व भागातील आमदार असता तर आमच्यावर ही वेळ आली नसती. पण पूर्व भागात एकही कारखानदार नसल्याने आमदार होणे सोपे नाही. आम्हाला पूर्व भागातून आमदार देणे शक्य नसले तरी आमच्यावर अन्याय करणारांना धडा शिकविणे हे आमच्या हातात आहे. व आगामी निवडणुकीत आम्ही आमचा हिसका दाखविल्या शिवाय राहणार नाही. १० ते १४ नंबर चा-या खालील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव भरून दिले नाही तर आम्ही सिना धरणाकडे जाणारे व भविष्यात कर्जतला पाणी जाऊ देणार नाहीत. पूर्व भागातील सर्व शेतक-यांना संघटीत करून पाणी आडवा आणि सिंचन करा हे आंदोलन हाती घेऊ असाही इशारा प्रा. दरेकर यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.