शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :यंदा शेवगाव तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांना चारा व पिण्याचे पाणी यामुळे शेतकरी त्रस्त असून पावसाअभावी शेतातील पिके जळून चालली आहेत. दुर्दैवाने पावसाने अशीच पाठ फिरवली तर तालुका भकास होण्याची भिती असून तालुक्यातील शेतकरी व पशुधन जगावे यासाठी शासनाने शेवगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी केली. शेवगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे सौ. काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या साडे पाच लाख खर्चाच्या जि. प. प्रा. शाळा वर्ग खोली बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी रंगनाथ ढाकणे, बाबासाहेब गोर्डे, ओमप्रकाश ढाकणे आदी उपस्थित होते. 

अध्यक्षस्थानी उत्तमराव धावणे होते. हर्षदाताई काकडे म्हणाल्या की, सासरे लोकनेते आबासाहेब काकडे , वडिल डॉ. टी. के. पुरनाळे यांचा समाजसेवेच्या विचारांचा वारसा व पती अॅड. शिवाजीराव काकडे यांचे मार्गदर्शनामुळे गोरगरीब जनतेचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे. विशेषतः पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी हे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. 

 निवडणूकीत जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करण्यास मी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. लोकांच्या कामांची उद्घाटने करण्याची काकडे घराण्याची परंपरा नाही. मी प्रयत्न करून मंजूर केलेल्या विकासकामांचीच मी उद्घाटने करीत असते. माझ्या कामात कोणीही लुडबूड करू नये. त्यांनी स्वतंत्रपणे कामे मंजूर करून आणावीत व त्यांची उद्घाटने करावीत. 

शेवगाव तालुक्याच्या पुर्वभागातील लाभार्थी गावांतील शेतीसाठी जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी वरदान ठरणारी ताजनापूर टप्पा क्र. 2 ही योजना मंजूर करण्यासाठी अॅड. शिवाजीराव काकडे व मी स्वतः शेतक-यांसह मोठा लढा उभारल्याने ती योजना मंजूर झाली. ताजनापूर टप्पा क्र. 2 व हातगाव पाणीपुरवठा या मंजूर असलेल्या दोन्ही योजना दोन वर्षात पुर्णत्वात न्याव्यात. आपण त्यांचा जाहीर सत्कार करू, असे त्या म्हणाल्या. शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेणार असल्याचे सौ. काकडे यांनी सांगीतले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.