वाळूतस्कर सुभाष माळीच्या मुसक्‍या आवळल्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुळा नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या तस्करांची दडपशाही सुरू आहे. बारागाव नांदूर येथील नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना वाळूतस्कर सुभाष माळी व किशोर माळी यांच्यासह 20 ते 25 जणांनी हल्ला करून मारहाण केली. दहशत पसरवून वाळूउपसा करणारे पोकलॅन मशीन व दोन ट्रॅक्‍टरसह पळून गेले. परंतु, पोलिसांनी सुभाष माळी याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली आहे.

याबाबत राहुरी पोलिसांत कामगार तलाठी संदीप नवनाथ नेहरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या दरम्यान निवासी नायब तहसीलदार जी. एस. तळेकर यांना माहिती मिळाली की, मुळा नदीपात्रातील बारागाव नांदूर शिवारात बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार तलाठी अशोक चितळकर, अशोक थोरात, कोतवाल रंगनाथ बाचकर व नालकर हे वाळूउपसा होत असलेल्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी दोन ट्रॅक्‍टर व एक नारंगी रंगाचा पोकलॅन दिसला. यावेळी सुभाष साहेबराव माळी व किशोर साहेबराव माळी याच्यासह 20 ते 25 जणांच्या जमावाने आरडाओरड करत दहशत पसरवली. यावेळी नायब तहसीलदारांनी पोलीस ठाण्याला फोन करून पोलीस प्रशासनास पाचारण केले.

दरम्यान, या जमावातील सुभाष माळी व किशोर माळी या दोघांनी पथकास दमबाजी व शिवीगाळ करत नायब तहसीलदार तळेकर यांना “तू कोण आहे? तू येथे कशाला आला? निघून जा! तुला बघून घेतो’ असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली, तर कामगार तलाठी अशोक थोरात यांचे तोंड दाबून “तू कोण?’ तसेच कोतवाल नालकर यांना लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली व “तू येथून निघ, परत या वाटेने यायचे नाही अन्यथा जिवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली.

 पथकातील सर्वांवर दहशत पसरवल्याने महसूल पथक कारवाई न करताच माघारी परतले. तहसीलदार अनिल दौंडे हे दोन दिवसांच्या रजेवर असल्याकारणाने तहसीलदार काल हजर झाल्यानंतर त्यांच्या आदेशाने या वाळूतस्करांवर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय उजे, पी. एन. मोरे, बहिर, वाघमोडे, भिसे, लाला पटेल यांनी बारागाव नांदूर परिसरातील सुभाष माळी याच्या घरी छापा मारत त्यास जेरबंद करून गजाआड करण्यात आले. 

किशोर माळी हा सध्या पसार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. किशोर माळी याच्यासह इतरांच्या मुसक्‍या आवळणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेचा तपास दत्तात्रेय उजे करत आहेत. पो.नि. प्रमोद वाघ यांनी धडाकेबाज कारवाई करत अट्टल गुन्हेगार सुभाष माळी याच्या मुसक्‍या आवळत त्याला गजाआड केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.