मांडवेच्या घटनेतील आरोपी अद्यापही मोकाटच.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मांडवे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करणारा आरोपी पकडण्यात पोलिसांना सध्या तरी अपयश आले आहे. या प्रकरणातील आरोपी इतका हुशार आहे. की त्याने कोणताही पुरावा मागे सोडला नाही. अत्याचारीत मुलगी वयाने लहान असल्याने आतापर्यंत तीन वेळा आरोपीचे वेगवेगळे वर्णन सांगितले आहे. त्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले आहेत. सात ते आठ संशयीतांना पकडूनही पोलिस आरोपीपर्यंत पोहचलेले नाहीत. 

मांडवे गावातील अल्पवयीन मुलीवर २१ जुलै २०१७ रोजी अत्याचार झाला. घटना घडून सतरा दिवस झाले. पोलिसांनी तपासासाठी पाच पथके तयार केली. वरीष्ठ पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, शेवगाव नेवासा, पाथर्डीचे पोलिस आरोपीचा तपास करीत आहेत.

पाथर्डीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण तपासी अधिकारी आहेत. आरोपीने वापरलेली मोटारसायकल, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेले वर्णन यावरुन पोलिसांनी खूप प्रयत्न करीत तपास केला. आरोपीने मोबाईल वापरलेला नाही. किंवा घटनेच्या वेळी त्याला फोन आला नाही व त्यानेही कोणालाही लावला नाही, तशी नोंद आढळून येत नाही. मांडवे गाव व परिसरातील गावातील मतदार याद्यांची कसून चौकशी केली. 

मोटारसायकलचा शोध घेतला. घटनेच्या वेळी मुलगी घाबरलेली होती. ती गोंधळून गेली व तिला आरोपीचे वर्णन व्यवस्थीत सांगता आले नाही. त्यामुळे पोलिसांना तपासातही अनेक अडचणी आल्या. पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात जाहीरपणे बैठक घेवून सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आरोपी विषयी काही माहिती असली तर कळवा. दहा हजार रुपयाचे बक्षीसही जाहीर केले.

मात्र पोलिस अद्यापही आरोपीपर्यंत पोहचलेले नाहीत. तपास रेंगाळला आहे. विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनाला सामोरे जातानाही पोलिसांचा वेळ गेला आहे. पोलिस तपास करीत आहेत. आरोपी विषयी काही खास माहिती मिळाल्याचेही समजते मात्र, आरोपी अद्यापही मिळाला नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.