कास्ट्राईब महासंघाचा महापालिकेवर 16 ऑगस्टला लाटणे मोर्चा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य समिती महापालिका अंतर्गत लिंकवर्कर, आशा व कंत्राटी महिला कामगारांचे सप्टेंबर 2016 पासूनचे थकित मानधन व 11 महिन्याचे नियुक्ती आदेश मिळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासांठी कास्ट्राईब महासंघाच्या वतीने महापालिकेवर बुधवार दि.16 ऑगस्ट रोजी लाटणे मोर्चा काढण्याचा निर्णय नुकतेच झालेल्या बैठकित घेण्यात आला.जिल्हा परिषद येथील कास्ट्राईब महासंघाच्या कार्यालयात राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीप्रसंगी जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, कार्याध्यक्ष वसंतराव थोरात, सरचिटणीस सुहास धीवर, मुख्य संघटन सचिव गुलाबराव जावळे आदिंसह कंत्राटी कामगार महिला उपस्थित होत्या.

आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी सेविकांचे सप्टेंबर 2016 पासूनचे मानधन थकित असल्याने, या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सदर प्रश्‍न सोडविला जात नसल्याने महासंघाचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लाटणे मोर्चा घेवून महिला आयुक्तांच्या दालनात ठिय्या देणार आहे. 

संघटित झाल्याशिवाय कंत्राटी कामगार महिलांचे प्रश्‍न सुटणार नाही. अत्यंत कमी मानधनावर महापालिके कडून कंत्राटी कामगार महिलांचे शोषण चालू असल्याचा आरोप पवळे यांनी करुन, त्यांना सेवेत समावून घेण्याची मागणी बैठकी प्रसंगी केली. खुरपणी महिला कामगार व बिगारी कामगारांना देखील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या लिंकवर्कर, आशा व कंत्राटी कामगारांना कमी मानधन आहे. 

सन्माणाने जगण्यासाठी महापालिकेने त्यांच्या मानधनात वाढ करुन, थकित मानधन तात्काळ देण्याची भावना के.के. जाधव यांनी व्यक्त केली. या आंदोलनात कंत्राटी कामगारांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कास्ट्राईब महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

सप्टेंबर 2016 पासूनचे थकित मानधन देवून, 11 महिन्याचे नियुक्ती आदेश तात्काळ देण्यात यावे. सात रोगावर नियंत्रण केल्याचे विशेष मानधन द्यावे. बालक व मातांना लसीकरणासाठी घरोघरी जावून बोलविल्याचा हक्काचा मोबदला मिळावा. डेंग्यू सर्व्हेक्षणचा प्रतिदिन 150 रु. प्रमाणे 4 हजार पाचशे रुपये महिना मोबदला द्यावा. तसेच कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण अभियानाच्या अध्यक्षांना अहवाल पाठविण्याची मागणी महापालिका अंतर्गत लिंकवर्कर, आशा व कंत्राटी कामगारांची मागणी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.