गृहनिर्माणमंत्री मेहेता यांच्या राजीनाम्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांनी हुतात्मा स्मारक येथे जन्मसिध्द घरकुल अधिकार सत्याग्रह करुन, भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहेता यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनाच्या प्रारंभी वंचितांचे प्रश्‍न आपल्या लोककलेच्या माध्यमातून मांडणार्‍या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रशाहीरची मानवंदना देण्यात आली. 


यावेळी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, विठ्ठल सुरम, शारदा भालेकर, सखुबाई बोरगे, अंबिका नागुल, अर्चना आढाव, रंजना गायकवाड, लीलाबाई भोसले, अंबादास दरेकर आदिंसह शहर व उपनगरातील घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजना न राबविता मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पाचशे कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका असलेल्या राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहेता यांची प्रतिमा झाडाला उलटी टांगून, खालून मिर्चीचा धूर देण्यात आला. मेहेता यांच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध नोंदवून, घरकुल वंचितांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा सुर्य, हीच जमीन आणि हाच तो ढेकूण ही घोषणा देवून, ढेकूण म्हणून गृहनिर्माणमंत्री मेहेता यांना संबोधण्यात आले. 

ज्यांनी वंचितांचे प्रश्‍न न सोडविता भ्रष्टाचाराने वंचित समाजाचे रक्त शोषले. तसेच यावेळी आंदोलनातील पुरुषांनी महिलांना राख्या बांधून, सरकार कडून हक्काची घरे मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करत या संघर्षात त्यांच्या बरोबर राहण्याचा संकल्प केला. घरकुल वंचितांना एक गुंठा जमीन मिळावी, पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी राज्यात लॅण्ड बँक स्थापन करावी व महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक भारतीयाचा देशाच्या साधन संपत्तीवर जन्मसिध्द हक्क आहे. मात्र आर्थिक विषमतेमुळे देशातील साधन संपत्ती काही मोजक्या व्यक्तींकडेच एकवटली असून, घरकुल वंचित हक्काच्या घरांसाठी संघर्ष करीत आहे. मात्र वंचितांचे प्रश्‍न सोडविण्या ऐवजी गृहनिर्माण मंत्री यांनी आपलेच भले करण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप अ‍ॅड.गवळी यांनी केला. 

प्रकाश थोरात म्हणाले की, अण्णाभाऊ साठे वंचितांसाठी आपले जीवन जगले. लोकशाहीरीच्या माध्यमातून त्यांनी वंचितांचे प्रश्‍न मांडले. अशा महापुरुषांना देण्यात आलेली राष्ट्रशाहीरची मानवंदना समर्पक आहे. अशा महापुरुषांचे विचार आजच्या लोकप्रतिनिधींनी आत्मसात केल्यास विकासात्मक बदल होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कॉ.बाबा आरगडे म्हणाले की, गृहनिर्माणमंत्री मेहेता यांनी पंतप्रधान आवास योजनेबाबत गेल्या अडीच वर्षात काही काम न करता, घरकुल वंचितांच्या शोषणाचे काम केले. मंत्रीमंडळातील ढेकूण हीच त्यांची प्रतिमा झाली आहे. तसेच राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पंतप्रधान आवास योजना जिल्हास्तरीय समितीने अद्यापि काय काम केले? या संदर्भात देखील जाब विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.