निंबोडी दुर्घटनेतील मुलांच्या पालकांना भेटून पालकमंत्री प्रा. शिंदे गहिवरले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी तेथे भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्घटना घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वैष्णवी पोटे, श्रेयस रहाणे आणि सुमीत भिंगारदिवे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. 


यावेळी कुटुंबियांकडून वैष्णवी, सुमीत, श्रेयसच्या आठवणी ऐकताना पालकमंत्री प्रा. शिंदेही गहिवरले. त्यांनी यावेळी कुटुंबियांना 4 लाख मदतीचा धनादेश सुपूर्त केला. या प्राथमिक शाळा दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले.

प्रा. शिंदे यांनी सकाळी नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन शाळा दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली. तसेच संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन औषधौपचार आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीतील सुधारणेबाबत माहिती घेतली. 

                         


 जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.बी. बुरुटे, उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, तहसीलदार सुधीर पाटील, जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. पोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. काठमोरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रा. शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केल्यानंतर थेट निंबोडी गाठले. सुरुवातीला त्यांनी वैष्णवीच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राज्य शासनाच्या वतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कार्यवाही करण्यात येईल. तसेच, याप्रकरणी अधिक काय करता येईल, हे पाहू, असा दिलासा त्यांनी दिला. यावेळी मदतीचा धनादेश त्यांनी प्रकाश पोटे यांच्याकडे सुपुर्त केला.

त्यानंतर श्रेयसच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. एकूलता एक मुलगा गेल्याचे दु:ख सांगताना श्रेयसच्या आईलाही रडू कोसळले. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी त्यांना समजावले आणि धीर दिला. यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदेही गहिवरले. कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असा दिलासा त्यांनी दिला. सुमीतच्या पालकांना भेटून प्रा. शिंदे यांनी त्यांना धीर दिला. शासन तुमच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

                         

दोषींवर निश्चितपणे कार्यवाही होईल
दुर्घटनाग्रस्त जागेची पाहणीही पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी केली. त्यानंतर गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, ही दुर्घटना दुर्दैवी आहे. यानंतर लगेचच शासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषींवर निश्चितपणे कार्यवाही होईल. गावकऱ्यांचे म्हणणे आणि भावना लक्षात घेऊन शाळेसंदर्भातील निर्णय लवकर घेतला जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या निधीतून शाळा वर्ग बांधकामासाठी निधी दिला जाईल. सदर निधी अपुरा असल्यास नियोजन समितीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून या बांधकामासाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

वर्गशिक्षिका पाटील यांचा राज्य शासनामार्फत उचित सन्मान 
गावकऱ्यांनी यावेळी वर्गशिक्षिका लीना पाटील या प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचा राज्य शासनामार्फत उचित सन्मान आणि गौरव करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांचा खर्च जिल्हा परिषद करणार
सर्व जखमी विद्यार्थ्यांचा खर्च जिल्हा परिषद करणार आहे. राजीव गांधी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून जखमींना मदत देण्यात येईल. तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण फंडातून मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 4 लाख मदत देण्यात आली तर जखमींना 4 हजार 300 रुपयांची तात्काळ मदत करण्यात आल्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.