मनपा विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोंडले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातील एका व्यक्तीने महापालिकेच्या विद्युत विभागातील सुमारे दहा कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले होते. कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणारा व्यक्ती हा नगरसेवकाचा नातेवाइक असल्याची माहिती पुढे येत आहे. 


जुन्या महापालिकेच्या मनपा गॅरेजमध्ये काल बुधवारी हा प्रकार झाला. आयुक्त घनशाम मंगळे, अतिरीक्त आयुक्त विलास वालगुडे व उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांनी घटनेची माहिती घेतली असून, पुढील कारवाई आदेशानुसार होईल, असे या विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसात विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांबरोबर ही दुसरी घटना घटली आहे. त्यामुळे कर्मचारी दहशतीखाली आहेत.

आमच्या भागातील बंद दिव्यांविषयी तक्रार करून देखील त्यावर कार्यवाही होत नाही, असा मनात राग धरून हा व्यक्ती गॅरेजमध्ये आरडाओरडा करत आला होता. माळीवाड्यातील महापालिकेच्या जुन्या गॅरेजमधील कार्यालयाचे दार लावून घेत आतमध्ये कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. सुमारे दहा कर्मचारी कार्यालयात होते, असे या विभागाकडून सांगण्यात आले. 

कामगार युनियनला ही माहिती मिळताच तेथे अनंत लोखंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. लोखंडे यांनी माहिती घेतल्यानंतर तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. कामगारांनी त्यात सहभाग घेतला. या प्रकाराची माहिती मिळताच आयुक्त घनशाम मंगळे, अतिरीक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी गॅरेजमधील कार्यालयात येऊन माहिती घेतली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच विभागातील कर्मचाऱ्याला नगरसेवकांनी दमदाटी करत मारहाण केली होती. या प्रकारावरनं कर्मचाऱ्यांना आयुक्तांची भेट घेत काम बंद करण्याचा इशारा दिला होता. तरी देखील आज बुधवारी पुन्हा प्रकार झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आयुक्त मंगळे यांनी घटनेची माहिती घेतली असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.