खड्डयांना अभिषेक घालून लाक्षणिक उपोषण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील अनेक रस्त्यांची कामे गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी करुन देखील केवळ राजकीय आकसापोटी जाणून बुजून केली जात नसल्याने कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा व प्रशासनाला बुद्धीची देवता श्री गणेशाने सद्बुद्धी द्यावी यासाठी या खड्ड्यांमध्ये नगरसेवक दिलीप नागरे यांंच्या हस्ते अभिषेक करुन लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राजू भालेराव यांनी पौरोहित्य केले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, निवडणुकीनंतर एक-दोन महिन्यांनी कामे सुरु होतील, अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती. परंतु नऊ महिने उलटल्यानंतरही कोणत्याही कामांना सुरुवात झालेली नाही. हे प्रशासन व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा या पदाची जबाबदारी झटकून केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप-प्रत्यारोपात मग्न आहे.जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला असून या संदर्भात सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

संबंधीत रस्त्यांमध्ये डॉक्टर चाटुफळे मार्ग ते जिजामाता चौक, कुंभार गल्ली ते शंकरभूवन पर्यंत, भगवान महावीर पथ ते स्टेट बँक चौक ते जिजामाता चौक या रस्त्यांच्या कामाची संबंधीत ठेकेदाराला एक वर्षापूर्वी वर्कऑर्डर देण्यात आल्या होत्या. केवळ आचारसंहिता लागल्याने संबंधीत काम तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले होते.

परंतु निवडणुका होऊन नऊ महिने उलटले असतानाही खड्ड्यांमध्ये साधा मुरुमही टाकण्यात आलेला नाही. सदरच्या रस्त्यांवर नवीन मराठी शाळा, क. जे. सोमैय्या हायस्कूल, भि. रा. खटोड कन्या विद्यालयाचे सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थी रोज ये-जा करीत असतात. याच रस्त्यांवर डॉ. मैड हॉस्पिटल, डॉ. दमाणी हॉस्पिटल, डॉ. गोराणे हॉस्पिटल असून या रुग्णालयांमध्ये अनेक महिला रुग्ण येत असतात. 

स्टेट बँक, सेंट्रल बँक, नगर अर्बन बँक, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असून या ठिकाणी देखील अनेक ज्येष्ठ नागरिक कामानिमित्त ये-जा करतात. या सगळ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे अनेकांना मणक्याचे आजार देखील जडलेले आहेत. केवळ राजकीय सुडबुद्धीने विरोधी नगरसेवकांच्या भागातील कामे करायची नाहीत, या भावनेने रस्त्यांची कामे केली जात नाहीत. त्याविरोधात हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.