जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे. गणेशाच्या स्थापनेला हजेरी लावलेल्या मेघाच्या सरींनी सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा चिंब झाला. वार्षिक सरासरीच्या 92 टक्के पावसाची शनिवार अखेर नोंद झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत त्यात लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पारनेर वगळता अन्य तालुक्‍यात जोरदार बरसत आहे. माणिकदौंडी (ता.पाथर्डी) येथे काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गेली दोन महिने खंड पडलेल्या पावसाने तूट भरून काढत पुनरागमन केले.

गणेशाच्या स्थापनेलाच काल नगर शहरासह जिल्ह्यात मूसळधार पाऊस झाला. श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, राहाता, संगमनेर, नगर तालुक्‍यात पाऊस होत आहे. या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आनंदी आहे.

जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीने शेतात पाणी साचून राहिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशीला त्याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, जून ते ऑक्‍टोबर महिन्यातील वार्षिक सरासरीच्या 92.44 टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. शनिवार अखेर 459 मीमी पाऊस झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत (338) त्यात तब्बल 25 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

नेहमीप्रमाणेच अकोल्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मात्र, कोपरगाव व पाथर्डी तालुक्‍यांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या ठिकाणी अनुक्रमे 67 व 72 मीमी पाऊस नोंदविला गेला आहे. राहाता, नेवासे, कर्जत येथे पावसाने सरासरी गाठल्याचे चित्र आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.