गणेश उत्‍सव काळात शेवटचे तीन दिवस १२ वाजेपर्यन्‍त ध्‍वनीक्षेपणास परवानगी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गणेश उत्‍सव काळात शेवटचे तीन दिवस ध्‍वनीक्षेपणाच्‍या वेळेत वाढ करण्‍यास उच्‍च न्‍यायालयाने जिल्‍हा प्रशासनास परवानगी दिल्‍याने जिल्‍ह्यात शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यन्‍त ध्‍वनीक्षेपणास परवानगी देण्‍यात येणार असल्‍याची माहिती महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. 


अहमदनगर येथील पोलीस मुख्‍यालयात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्‍या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्‍न झाली. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी भानुदास पालवे, महानगर पालिका आयुक्‍त घनश्‍याम मंगळे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्‍त पोलस अधीक्षक घनश्‍याम पाटील, कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डाचे मुख्‍याधिकारी माने, निवासी उपजिल्‍हाधिकारी गोपीचंद कदम आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्‍हणाले की, गणेश उत्‍सव आणि त्‍याच बरोबर येणारे सर्व सण सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्‍यासाठी प्रशासनास शांतता कमिटीच्‍या सर्व सदस्‍यांनी सहकार्य करावे. तसेच गणेशोत्‍सव काळात गणेश उत्‍सव मंडळातील आरस व मिरवणूक पहाण्‍यास येणा-या नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी महानगर पालिकेने रस्‍त्‍यावरील खड्डे, ड्रेनेज, कचरा आदी सर्व बाबींचे योग्‍य ते नियोजन करावे. तसेच बीज मंडळाने या काळात वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जर वीज पुरवठा काही तांत्रिक कारणास्‍तव खंडीत करणे आवश्‍यक असेल तर तशी माहिती नागरिकांना द्यावी, अशी सूचना ही यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. 

प्रारंभी शांतता कमिटीचे सदस्‍य सर्वश्री ओबेद शेख, गणेश आष्‍टेकर, नलिनी गायकवाड, संजय सपकाळ, जरिना पठाण, गिरवले मामा, पंडीत खरपूडे, आशा निबांळकर आदिंनी गणेश उत्‍सव शांततामय वातावरणात पार पाडण्‍यासाठी उपयुक्‍त सूचना केल्‍या. या बैठकीस शहरातील सर्व शांतता कमिटीचे सदस्‍य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, जिल्‍हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महानगर पालिका व वीज मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.