कांद्याचे भाव पडल्याने कोपरगाव, नगरमध्ये शेतकरी रस्त्यावर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे साठवून ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर काढला. त्यानुसार कांद्याला भावदेखील मिळाला होता. परंतु, आज कोपरगाव, नगर व राहुरी तालुक्‍यातील वांबोरी येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव उतरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलावासह बाजार समिती बंद पाडली. 


                       

कोपरगावमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली, तर नगरमध्ये शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. शेतकरी आक्रमक झाल्याने व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले.

नगरमध्ये सकाळी साडेदहा वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले. लिलावात कांद्याला 1800 ते 2100 भाव मिळाल्याने शेतकरी वैतागले. त्यांनी 2400 ते 2500 भाव देण्याची विनंती केली. परंतु, व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन सुरू केले. 

तब्बल दोन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते; अखेर आमदार शिवाजीराव कर्डिले व आ. अरुण जगताप यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणेच भाव देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आज बाजार समितीमध्ये 65 हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती.

कोपरगाव बाजार समितीच्या आवारामध्ये कांदा व्यापाऱ्यांनी लिलावादरम्यान सकाळी 11ः30 वाजण्याच्या सुमारास कांद्याला कमी भाव दिल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना ज्यादा भाव देण्याची विनंती केली. मात्र, कमी भाव देत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. यावेळी शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने वातावरण तणावाचे झाले होते. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून कांदा व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला.

कोपरगाव बाजार समितीमध्ये 10 ते 12 हजार कांद्याच्या गोण्यांची आवक झाली होती. कोपरगाव तालुक्‍यासह शेजारच्या येवला, नांदगाव, वैजापूर, राहाता, राहुरी, संगमनेर या भागातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास कांद्याचे व्यापारी राजू सांगळे हे लिलाव बोलीस उभे राहिले. 

त्यांनी 1200 रुपये क्विंटल भाव घोषित करताच शेतकरी बाळासाहेब दवंगे यांनी त्यांना विरोध करीत पुण्यामध्ये 2100 ते 2300 रुपये प्रति क्विंटल भाव आहे त्याप्रमाणे कांद्याला भाव दिला पाहिजे, अशी मागणी केली. यावरून व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये तू तू-मै मै सुरू झाले.काही व्यापाऱ्यांनी 1500 ते 1800 भाव कांद्याला देण्याची तयारी दर्शवली. मात्र, वैतागलेल्या शेतकऱ्यांनी 2 हजाराच्या पुढे भाव देण्याचा आग्रह धरल्याने वाद सुरू राहिला. 

अखेर बाजार समितीचे सभापती मधुकर टेके, संचालक संभाजी रक्ताटे, माधवराव गोसावी, व्यापारी संचालक अजित लोहाडे, तेजमल धाडीवाल, बाजार समितीचे सचिव परसराम सिनगर, सहसचिव विष्णू पवार, नानासाहेब रणशूर, कांदा विभागप्रमुख मनोज थोरात, बाळासाहेब टुपके यांनी शेतकरी व कांदा व्यापारी यांच्यामध्ये मध्यस्ती करीत दुपारी 3 च्या पुढे पुन्हा कांद्याचा लिलाव सुरू केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.