पर्यावरणपूरक गणपती बसवून प्रदूषण थांबवा -नगराध्यक्षा अनुराधा आदिक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दरवर्षी गणपती विसर्जनामुळे शहर व परिसरात पाण्याचे मोठे प्रदूषण होते. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. त्यामुळे शहरातील जबाबदार नागरिकांनी पर्यावरण पुरक गणपती बसवून प्रदूषण थांबवावे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.

येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ व लायन्स क्‍लब श्रीरामपूर सफायर यांच्या वतीने पर्यावरण पूरक मातीचे गणपती ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले. मुख्य रस्त्यावर आयोजित या उपक्रमाचे उद्‌घाटन बुधवारी नगराध्यक्ष आदिक यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी सुमंत मोरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, सिद्धार्थ मुरकुटे उपस्थित होते.

आदिक म्हणाल्या, गणपती हे सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. विसर्जनानंतर मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मुर्ती पाण्यातून काढल्या जातात. एकप्रकारे ती विटंबनाच होते. ते होऊ नये यासाठी मंडळांनी व घरगुती गणपती बसविणाऱ्या सर्व नागरिकांनी पर्यावरण पुरक गणेशमूर्तींची स्थापना करावी. इतर निर्माल्य व साहित्याचीही योग्य विल्हेवाट लावावी.

पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले, पत्रकार संघाने पुढाकार घेऊन शहरवासीयांना व परिसरातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणपती उपलब्ध करून दिले आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. मंडळांनी इतर मोठे गणपती बसविले तरी त्या मूर्ती विसर्जीत करू नये. विसर्जनासाठी पर्यावरण पुरक गणपतीच बसवावेत. पोलिस खात्याच्या वतीने सर्व मंडळांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.