सुजित झावरे पाटील यांना भाजप प्रवेशाचे आवतन.

नगर सह्याद्री अहमदनगर :- राष्ट्रवादीपासून काहीसे दुरावलेले आणि अजित पवार यांच्या टीकेनंतर अस्वस्थ झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झावरे यांच्यासाठी भाजपाने पायघड्या अंथरल्याची चर्चा झडू लागली आहे. पालकमंत्र्यांसह भाजपाचे दिग्गज झावरे यांच्या प्रवेशासाठी सरसावले असून झावरे यांनी आपल्या निवडक सहकार्यांशी या अनुषंगाने चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. 


झावरे यांचा भाजपा प्रवेश ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्याच्या शेतकरी मेळाव्यात सर्वांसमोर टीका करून सुधारण्याचा सल्ला दिला होता. ही पवारांची टीका झावरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली असून या बैठकीत विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीतील झावरेंच्या पराभवाचा पवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

त्यामुळे झावरे यांच्या आगामी उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुजित झावरे यांना भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचे आवतण धाडले असल्याची चर्चा आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही यासाठी विशेष पुढाकार घेतला असल्याची माहिती समजली. त्यामुळे आगामी विधानसभा कधीही होवो, परंतु पारनेरमध्ये राजकीय उलथापालथीच्या चर्चेला चांगलाच जोर चढू लागला आहे. 

झावरे यांचा भाजपा प्रवेश झाल्यास तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार हाही नवा विषय चर्चेत आला आहे. मात्र, तूर्तास झावरे काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. झावरे यांचे नातलग नगरचे आमदार जगताप यांचा भाजप प्रवेश चर्चेत असतानाच झावरे यांचाही भाजप प्रवेश चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.