प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांना दहा वर्षे सक्तमजुरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वस्तिक चौक बस स्टॅण्ड येथून प्रवाशाला गाडीत बसवून गुप्तीचा धाक दाखवून त्याचे एटीएम कार्ड घेवून पासवर्ड विचारुन सुमारे ८६ हजार ५०० रुपये लुटणाऱ्या विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी, ता. नगर), सुनील फक्कड अडसरे (रा. शेडाळा, ता. आष्टी, जि. बीड) आणि गोकुळ भाऊसाहेब भालसिंग (रा. वाळकी, ता. नगर) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मोहिते यांनी दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सहकारी वकिल ॲड. अनिल ढगे यांनी काम पाहिले. 

या खटल्याची सविस्तर माहिती अशी, दि. ५ डिसेंबर २०१५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सतीश माधव पवार हे नगरच्या स्वस्तिक चौक बसस्टॅण्डचे बाहेर पुण्याला जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांचेजवळ पांढरे रंगाची पोलो कंपनीची चारचाकी गाडी येवून थांबली. पवार यांनी पुण्याला जायचे आहे, असे सांगितले. ड्रायव्हरने सांगितल्यावरुन पवार गाडीत बसले.

गाडी केडगावच्या पुढे गेल्यावर पवार यांच्या शेजारी बसलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यास गुप्ती लावली व धक्काबुक्की, दमदाटी व शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर गाडी पुन्हा माघारी केडगावकडे घेतली. गाडीतच आरोपींनी पवार यांचे मोबाईल व एटीएम कार्ड काढून घेवून एटीएमचा पासवर्ड विचारुन घेतला. 

पवार यांनी दोन्ही एटीएमकार्डचे पासवर्ड त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी एटीएम सेंटरजवळ गाडी थांबवली. परंतु त्यांना पैसे निघाले नाहीत. त्यानंतर आरोपींनी पुन्हा गाडी अरणगाव रोडने व्हीआरडीई गेटच्या जवळील एटीएम सेंटर येथे नेली आणि पवार यांच्या एटीएममधून सुमारे ८६ हजार ५०० रुपये रक्कम काढून घेतली. आणि आरोपींनी पवार यांना अरणगाव बस स्टॉपजवळ रात्री १२.३० वा. सुमारास गाडीतुन खाली उतरुन दिले. 

त्यावेळी पवार यांनी गाडीचा नंबर (एम.एच. १६ एटी ३३३८) असल्याचे पाहिले. त्याच रात्री सतीश पवार यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तलवारीचा धाक दाखवून रक्कम लुटल्याची फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे सहा. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सुरु करुन फिर्यादीच्या वर्णनावरुन त्याच रात्री वाळकी येथे विश्वजीत कासार याच्या घरी जावून झडती घेतली असता कासार फरार झाला. 

तेथे त्यांना आरोपी सुनील अडसरे आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे २३ हजार ५०० रु. एक मोबाईल मिळून आला. त्यावेळी अंधाराचा फायदा घेवून विश्वजीत कासार फरार झाला. परंतु पोलिसांनी तत्परतेने आरोपींचा शोध घेवून त्याच रात्री आरोपी विश्वजीत कासार व गोकुळ भारलसिंग यांना अटक केली. तपासा दरम्यान विश्वजीत कासार याने गुन्ह्यात वापरलेली गुप्ती व पोलो कार पोलिसांना काढून दिली.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मोहिते यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी सतीश पवार, फेडरल बॅकेचे ब्रॅंच मॅनेजर, नोडल ऑफिसर पंच, तहसीलदार शेलार, डॉ. सोनार, बबन वाघ, तपासी अधिकारी विनोद चव्हाण, पोसई गजानन करेवाड यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाने आरोपी विश्वजीत कासार, सुनील अडसरे आणि गोकुळ भालसिंग यांना दोषी धरुन भादवि. ३९४ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व दंड तसेच भादवि कलम ३९७ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रक्कमेतून फिर्यादीला सुमारे ३८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहा. फौजदार दिलीप भोसले यांनी सहकार्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.