लडखडणा-या पायात शक्ती आली खरी...चिंता आर्थिक रक्कम फेडण्याची.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सुमारे ४ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा जवळील तोंडे वस्तीवरून अहमदनगर चाईल्ड लाईन संस्थेच्या माध्यमातून दोन मुले..सख्खे बहिण भाऊ ..आई वडिलांचा सहारा हरपल्याने मदतीसाठी आले. त्यात बहिण अपंग असल्याने पाहणा-याचा जीव काळवंडत होता. अहमदनगर चाईल्ड लाईनने अनामप्रेमने यांची जबाबदारी स्विकारावी असे सुचवले..भाऊ सुदृढ असल्याने अनामप्रेमच्या वसतिगृहात त्याला सर्व दिव्यांग मुला-मुलीच्या सोबत कसे ठेवायचे असा सुद्धा प्रश्न त्यावेळी होता..? पण बहिण-भावांची तोड कशी करायची या भावनेने अनामप्रेमच्या कार्यकर्ते यांनी दोन्ही मुला-मुलींना हिमत-भवन वसतिगृहात प्रवेश दिला. त्यांचे नाव साक्षी आणि बंटी तोंडे. यातूनच पुढे साक्षी या मुलीच्या जिद्दीची आणि शारीरिक लढाईची कहाणी सुरु होते.साक्षी हि तिच्या माता-पित्याचे शेवटचे अपत्य. त्यात आई-वडिलांकडून ती जन्मत: एच.आय.व्ही.बाधित झालेली. आई-वडील एच.आय.व्ही. बाधित असल्याने २ वर्षांच्या फरकाने देवाघरी गेले. अज्ञान –आरोग्याचे ज्ञान नाही. त्यात ग्रामीण भागात आई-वडील असल्यावर ससेहोलपट या भावंडांची झाली. एक दिवस ३ वर्षांपूर्वी साक्षीचा शाळेला उशीर झाला म्हणून पळत जाताना अपघात झाला. ज्या वाहनाने तिला उडवले ते थांबले पण नाही.पाहणारे लोक आले.तिला उचलले.दवाखान्यात घेऊन गेले. दवाखाना सरकारी असल्याने फारशा सोई उपलब्ध तिथे नव्हत्या. यामुळे योग्य उपचार तिला मिळाले नाहीत. यातून ती एच.आय.व्ही. बाधित असल्याने फारच अडचणी उपचारादरम्यान आल्या. उजवा पाय तुटल्याने डॉक्टरांनी रॉड टाकला.उपचार झाले.पण नीटसे झाले नाहीत. यातून तिला अपंगत्व आले.

साक्षी शारीरिक कृश असल्याने हाडे ठिसूळ होणे,रॉड दुखणे, आभाळ आल्यावर फारच त्रास होणे आदी वेदना ती सहन करीत असायची. अनामप्रेममध्ये प्रवेश मिळाल्यापासून दुख-या पायाने शिकत होती. यातच एक दिवस ती चालताना तोल गेल्याने खाली पडली. रॉड निसटला. प्रचंड वेदना तिला झाल्या. जीव नकोसा झालाय अशी ती अनामप्रेमच्या आई भारती सोनावणे यांना म्हणाली. तात्काळ तिला अनामप्रेमच्या कार्यकर्ते यांनी डॉ. प्रभास पाटील यांच्या साकार हॉस्पिटल मध्ये दाखल केले.तिच्या वेदना पाहून सर्वांनी हाय खाल्ली होती.परंतु डॉ.प्रभास पाटील यांनी खूप मेहनत घेतली. आधार सर्वाना दिला. तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे त्यांनी सांगितले. रुग्ण एच.आय.व्ही. बाधित असूनही त्यांनी शत्रक्रिया करण्याची तयारी दाखवली. किमान निसटलेला रॉड व डिस्क बसवता येतील या उद्देशाने इंटरलॉक सर्जरी मा.प्रभास पाटील यांनी यशस्वीरीत्या साकार हॉस्पिटल येथे केली.

बहुतेक सर्व वैद्यकीय खर्च अत्यंत सवलतीत झाला आहे.तरीही औषधे आणि सर्जरीवेळी आवश्यक साहित्य यांचा खर्च ७५०००० पर्यंत आला आहे. आता साक्षी एवढ्या मोठ्या शत्रक्रियेनंतर स्थिरावत आहे. तिचे एवढे बिलाकरीताचा निधी कसा उभा करायचा या विचारात कार्यकर्ते आहेत. त्याच वेळी साक्षीच्या वेदना आणि लडखडणे कमी झाल्याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर आहे. वेदनेशी नाते सांगणा-या प्रत्येकाने याकामी आपली मदत द्यावी असे अनामप्रेमने आवाहन केले आहे. साक्षीच्या उपचाराकरिता आर्थिक मदतीचे धनादेश अनामप्रेम नावाने द्यावेत. तसेच अनामप्रेमचे बँक तपशील –SBI A/C NO.32144934687 SBI BRANCH IFSC CODE –SBIN0014794 आहे. मदत देण्यासाठी 9011020174 /7350013801/ 9420743219/8605919935याकरिता संपर्क साधावा.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.