पाणीयोजना चालू न झाल्यास अधिकाऱ्यांना हिसका दाखवू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खेडलेसह १७ गावे, चांदा योजनेतील १० गावे तसेच गळनिंब पाणीयोजना बंद झाल्यावर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना झोपेतून जाग येते व फक्त पत्र देण्याचे ते नाटक करतात. जनतेला आता त्यांच्यावर विश्वास राहिला नसून या पाणीयोजना चालू न झाल्यास अधिकाऱ्यांना हिसका दाखवू, असा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला.

सोनई येथे झालेल्या बैठकीत गडाख बोलत होते. ते म्हणाले की, आमदार मुरकुटे यांची कार्यपद्धती म्हणजे 'बैल गेला आणि झोपा केला' अशी आहे. या वीजबिलाच्या प्रश्नावरून योजना बंद झाल्यावर चर्चेची तयारी दाखवत आहेत. गळनिंब पाणीयोजनेवर लाखो रुपयांचा दुरुस्ती निधी आला. मोठा खर्च होऊनही ही पाणीयोजना बंद कशी ? नेवासा शहरात पाणी गढूळ येत आहे. मार्केट रेटपेक्षा दुप्पट रकमेच्या मोटारी बसविल्या.

गलनिंब, नेवासा योजनेचा ठेकेदार यांच्याशी निगडीत आहे. त्याच्याबरोबर चर्चा केली असती, तर बरे झाले असते. त्यात जनतेला पिण्याचे पाणी मिळाले असते. पण असा काय समझोता झाला की या ठेकेदाराला विचारण्याची हिंमत राहिली नाही ? सामाजिक प्रश्नांची चर्चा करायला यांना वेळ नाही; नेवासा शहराला गढूळ पाणी पाजणारे, गळनिंब पाणीयोजनेत मोठा गैरप्रकार करणाऱ्यांना वाचविण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत आहे. 

खेडले पाणीयोजना जिल्ह्यातील सर्वात मोठी योजना आहे. ती कुणी मंजूर करून आणली, कुणी लोकवर्गणी दिली, कशी चालू झाली, हे जनतेला माहीत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर आलेले पीकविम्याचे अनुदान कुणी लाटले, शेतकऱ्यांना पाणी तर नाहीच पण पोलिसांच्या काठ्या खाव्या लागत आहेत. सोनई, नेवासा पोलीस खात्यात तर आनागोंदी माजली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रत्येक टेंडर संबंधितांना कसे मिळते, उघड आहे. चर्चा करायची तर यावर चर्चा करा व वयक्तिक टीका करण्याऐवजी तुमचे काम लोकांना सांगा.

इरिगेशन, कर्जमाफी, कृषी खाते, पोलीस, वाळू या विरोधात तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरली, एवढे मोठे मोर्चे निघाले, तेंव्हा आमदार मुरकुटे कुठल्या महत्वाच्या कामात गुंतले होते, की ते यात सामील झाले नाहीत. कर्जमाफीचे मोर्चे चालू असताना फाट्यावरील वन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये आमदार कोणता जनता दरबार घेत होते. 

आता जनतेचा व आमचाही संयम सुटत चालला आहे. लोकप्रतिनिधींवर लोकांचा भरवसा राहिला नसल्याने या पाणी योजनेबाबत अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर कुठल्याही क्षणी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असेही गडाख यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.