निळवंडे धरणाच्या कालव्यांचा दिलेला शब्द पूर्ण होणारच - डॉ.सुजय विखे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाण्यासाठी सदैव संघर्ष कराव्या लागलेल्या जिरायती भागातील गावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका सातत्याने विखे पाटील परिवाराने घेतली. पाण्‍याच्‍या प्रश्‍नासंदर्भात अडथळे आले, तरी प्रयत्न थांबवले नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्‍यांच्‍या बाबतीतही हिच भूमिका घेऊन, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. कालव्यांचा दिलेला शब्द पूर्ण होणारच, असा विश्वास डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात रांजणगाव, खडकेवाके, पिंपळवाडी येथे आयोजित केलेल्या जलपूजन कार्यक्रमानिमित्त डॉ. सुजय विखे यांनी निळवंडे धरण कालव्यांच्‍या प्रश्‍नावर भाष्‍य केले. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देताना सांगितले की, जिरायती भागातील पाण्याचा संघर्ष खूप मोठा झाला.

या वाटचालीत जिरायती भागातील या गावांसाठी पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेसाठी आपण सातत्‍याने प्रयत्‍न केला. जलक्रांती अभियानातून गावोगावी झालेली तळी भरलेली दिसत आहेत. हे काम येवढे सोपे नव्‍हते. यामागे सर्वांची मेहनत आहे. १४ नंबर चारीतून पाणी उपलब्‍ध झाल्‍याने पिंपळवाडी येथील तळे पूर्ण क्षमतेने भरू शकले. याचे समाधान निश्चित असल्‍याचे त्‍यांनी नमुद केले.

ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे गोदावरी कालवे वाहते झाले आहेत. याचा या भागातील शेतीक्षेत्राला लाभ होईल. पाण्‍याच्‍या बाबत गांभिर्याने पाऊले उचलून या जिरायती पट्ट्यातील गावांना दुष्‍काळमुक्‍त करण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यांचा प्रश्‍न ना. विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातूनच सुटू शकेल.

साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी वर्षानिमित्‍त पंचक्रोशीतील गावांचाही विकास व्‍हावा, असा आपला प्रयत्‍न आहे. विकासाच्‍या संदर्भात कोणतीही निर्णय क्षमता नसलेली माणसं संस्‍थानमध्‍ये असल्‍यानेच मोठे अडथळे निर्माण होत असल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शिर्डी शहर असो की, संस्‍थान याबाबत निर्माण होणाऱ्या प्रत्‍येक आंदोलनात जनतेबरोबर राहण्‍याची भूमिका घेतली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेत सहभाग घेता यावा म्‍हणून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्‍याची १५ केंद्रं शिर्डी मतदारसंघात सुरू केली आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना होत असून, शेवटचा शेतकरी या योजनेचा लाभार्थी व्‍हावा, असा आपला प्रयत्‍न आहे. या परिसरातील गावांमध्‍ये गॅस वाटपाचा कार्यक्रम लवकरच घेणार असल्‍याची ग्‍वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.या प्रसंगी ग्रामस्‍थ, कार्यकर्ते, विविध संस्‍थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.