साईसंस्थान भक्तनिवासमधील चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ पकडले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईसंस्थानच्या भक्तनिवासमधील रूमची कुलपे तोडून साईभक्तांच्या सामानांची चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला काल रविवारी साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी रंगेहाथ पकडले. सुधाकर गौतम कांबळे (वय २५, रा. सायन, मुंबई) असे त्याचे नाव आहे.

पकडलेल्या या चोरट्याने आपणच यापूर्वी भक्तनिवासांची कुलूपे तोडून चोऱ्या केल्याची कबुली संस्थानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून साईसंस्थानच्या भक्तनिवासांमध्ये रूमची कुलूपे तोडून साईभक्तांच्या सामानाची चोरी होत असलेल्या घटनांमुळे संस्थान सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते.

शुक्रवारी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही साईभक्तांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून संस्थान व पोलीस प्रशासनाला धारेवर धरले होते. शिर्डी ग्रामस्थांनीही संताप व्यक्त करून संस्थान परिसरात व भक्तनिवासामध्ये वाढत चाललेल्या चोऱ्यांबाबत चिंता व्यक्त करून संस्थान सुरक्षा यंत्रणा व पोलीस यंत्रणेला टीकेचे लक्ष केले होते. 

या पार्श्वभूमीवर साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल गुप्ता-अग्रवाल यांनी साईआश्रम भक्तनिवासाला भेट देवून तेथील सुरक्षा विभागाला चांगलेच फैलावर घेतले होते.काल रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास साईआश्रम बी-१ इमारतीतील संस्थानच्या सुरक्षा रक्षकाला एक तरूण संशयितरित्या फिरताना आढळून आल्यावर सुरक्षा रक्षकांनी आपल्या सहकाऱ्याला याबाबत कल्पना दिली. 

या संशयित तरूणावर पाळत ठेवली गेली. त्यांनतर हातात कुलूप कापण्याचे व्हेस्क ब्लेड व कुलूप वाकवण्यासाठी लागणारे स्क्रू ड्रायव्हर घेवून एका बंद खोलीचे कुलूप तोडण्याच्या तयारीत तो असतानाच पाळतीवर असलेल्या संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. 

संस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकारी गंगावणे यांना घटनेची कल्पना दिल्यावर ते घटनास्थळी दाखल होवून त्यांनी या चोरट्याची कसून चौकशी केली असता मागील आठवड्यात आपणच साईआश्रमातील रूमची कुलूपे तोडून चोरी केल्याची कबुली या चोरट्याने दिल्याने साईसंस्थानच्या सुरक्षा विभागाने या चोरट्यास शिर्डी पोलिसांच्या हवाली केले. त्याच्यावर शिर्डी पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असन पुढील तपास पी.आय. इंगळे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.