गडाखांच्या घरावर रुम्हणे मोर्चा - आमदार बाळासाहेब मुरकुटे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील, सोनई, करजगावसह १८ गावच्या पाणीयोजनेचे अंतिम मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या योजनेची जबाबदारी जीवन प्राधिकरणची आहे. असे असताना माजी आमदार शंकरराव गडाख नियोजनबद्ध याप्रश्नी राजकारण करत आहेत. 
ते सतत विकासकामांमध्ये खोडा घालत असून या योजनेतील १० टक्के रक्कम कोठून भरली, हे गडाखांनी जाहीर करावे. अन्यथा आम्ही माजी आमदार गडाखांच्या घरावर रुम्हणे मोर्चा नेऊ, असा इशारा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे.

नेवाशात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मुरकुटे बोलत होते. पुढे बोलताना आमदार मुरकुटे म्हणाले, माजी आमदार गडाखांनी या अपूर्ण पाणीयोजनेचे राजकारण करण्याकरीताच उद्घाटन केले. या योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला, तेव्हा आपण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून लवकरच पाणीयोजनेचा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. 

तरीही विरोधक माझ्यावर आरोप करत आहेत. पाणीयोजना हे पुण्याचे काम आहे. या पुण्याच्या कामाला माझ्यासारख्या वारकऱ्याकडून खोडा घालण्याचे काम होणार नाही. मी खोडा घातला, हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे. आपण दोघेही एका मंचावर येऊ, जनता विचारील त्या प्रश्नांची उत्तरे देऊ, मग जनतेला समजेल, जनतेच्या प्रश्नावर राजकारण करतय कोण. गळनिंब पाणीयोजनेची वीज खंडित झाली, त्यावेळी सभापतींनी त्याची जबाबदारी घेतली होती का? असा सवालही आमदार मुरकुटे यांनी केला. 

जनतेच्या प्रश्नावर राजकारण करण्यात आम्हाला काहीच स्वारस्य नाही. नेवाशाच्या जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले, तो विश्वास जपून नेवाशाच्या विकासासाठी सदैव आमचा संघर्ष सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम सुरू केले आहे. ते विरोधकांना दिसत नाही. जनतेला दिसते. 

जनता आमचा न्याय करील. मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. विरोधकांना विधानसभेची घाई झाली आहे. त्यामुळे ते आमच्यावर चुकीचे आरोप करत आहेत. काम करणाऱ्यालाच जनता साथ देते. विरोधक म्हणतात, आम्ही काम न करता श्रेय घेत आहोत; परंतु वास्तव वेगळे आहे. विरोधकांनी नाकारले तरी जनता आमच्या विकासाचे वास्तव नाकारू शकत नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.