निवडणुका लागल्यावर आमदार मुरकुटे यांना गावांची आठवण - गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :फक्त निवडणुका लागल्यावर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना करजगाव पाणीयोजनेतील १६ गावांची आठवण होते. या भागाचा पाणीप्रश्न न सुटल्याने करजगाव, पानेगाव परिसरातील महिलांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठविला आहे. महिला देवगाव येथे जाऊन आमदार मुरकुटेंच्या घरावर हंडा मोर्चा काढणार आहेत. त्यात मी सहभागी होणार आहे.वास्तविक आमदार मुरकुटे यांनी आपली आमदारकी पणाला लावून या पाणीयोजनेसाठी प्रयत्न करायला हवे होते; पण दुर्दैवाने स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ते 'अशी ही बनवाबनवी'चा एकपात्री खेळ करत आहेत, असा आरोप खरवंडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गडाख यांनी म्हटले की, दोन वर्षांपासून सुमारे ६० हजार लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकायला लावण्याचे पाप लोकप्रतिनिधी करत आहेत. पाणीयोजना अपुरी राहण्यास आमदार मुरकुटे जीवन प्राधिकरणला दोष देत आहेत. हे प्राधिकरण राज्य सरकारच्या अंतर्गत आहे, हे त्यांना माहीत नाही का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सांगितले की, फुकटचे श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. 

वास्तविक दोन वर्षांपूर्वीच ही योजना सुरू होणे गरजेचे होते; परंतु ही योजना १८ गावांसाठी तयार झाली. त्याचा प्लॅनसुद्धा तसाच झाला आहे; पण राहुरी तालुक्यातील काही गावे या योजनेत समाविष्ट करण्यासाठी त्यांनी पाणीपुरवठा मंर्त्यांच्या दालनात हजेरी लावली व लेखी संमतीही दिली.

लोकवर्गणी नेवासा तालुक्यातील १८ गावांच्या जनतेची असताना यांनी कुणाला विचारून लेखी संमती दिली? या योजनेच्या अधिकाऱ्यांचा स्पष्ट विरोध होता की १८ गावे सोडून अन्य गावे यात सामील झाली, तर यात पाण्याचा दाब कमी होऊन भविष्यात योजनेला अडचण येऊ शकते; परंतु असे काय झाले, यांना काय साक्षात्कार झाला? दुसऱ्या तालुक्यातील गावांची लोकवर्गणी न घेता करजगाव, खेडले पाणीयोजनेत ही गावे समाविष्ट करून घेऊन आमदारांना काय मिळाले? 

जनतेला पिण्यासाठी पाणी मिळावे, त्या प्रश्नात तरी राजकारण करू नये, ही आमच्या संघटनेची पहिल्यापासून भूमिका आहे; पण आमदार मुरकुटे यांच्याकडे केलेले काहीच काम नसल्याने ते फक्त वैयक्तिक पातळीवर टीका करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही सुनील गडाख यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.