‘देशभक्त‘ मुख्यंमंत्र्यांनी ठेवावे जबाबदारीचे भान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खायचे दात एक अन् दाखवायचे एक असल्याप्रमाणेच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे वर्तन आहे. शेतकरी आत्महत्याप्रकरणी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करणार्‍या फडणवीसांकडूनच आता शेतकर्‍यांची चेष्टा केली जात आहे. 

त्यातच देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची फॅक्टरी काढल्या सारखी त्यांनी शेतकरी आंदोलकांनाही देशद्रोही ठरविण्यात पातक माथी घेतले आहे. त्यामुळेच आमच्या ‘देशभक्त‘ मुख्यमंत्र्यांनी आता भूतकाळातील वक्तव्याचे व पदाच्या कर्तव्याचे भान ठेऊन शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी घेण्याचे आवाहन प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अजय महाराज बारस्कर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करू न देण्याची विनंती करणार्‍या शेतकरी आंदोलकांना थेट देशद्रोहाचे प्रमाणपत्र देण्याचे औदार्य दाखविले आहे. मुख्यमंत्र्यांना सत्तेची नशा चढल्यानेच त्यांना जबाबदारीचे भान उरले नसल्याचा आरोप श्री. बारस्कर महाराज यांनी केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री हा कोणत्याही पक्षाचा नूसन संपूर्ण महाराष्ट्राचा असतो, याचाच विसर फडणवीस साहेबांसह त्यांच्या सत्तांध भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवून घेणारे भाजपा कार्यकर्ते गरिब व कष्टकरी भारतीयांचे कर्दनकाळ ठरण्याची भीती समाजात आहे. तरीही लोकभावनेला पायदळी तुडवून या सर्वांनी एककल्ली सत्ता राबविण्याचा अट्टहास कायम ठेवला आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याच अहंकारातून शेतकरी सुकाणू समिती व आंदोलकांना देशद्रोही ठरविण्याचे पातक केले आहे. बेजबाबदार सरकारला सत्तेवरून खेचण्यासाठी शेतकरी आंदोलक प्रयत्नशील नाहीत. कारण सरकार कोणतेही असो शेतकरी व कष्टकर्‍यांची पिळवणूक ठरलेलीच असते. मात्र, यापूर्वीच्या नालायक काँग्रेस आघाडी सरकारऐवजी भाजपाचे कोडगे सरकार जादा शेतकरी विरोधी असल्याची भावना मागील तीन वर्षांत शेतकर्‍यांची झाली आहे. राज्यातील सर्वच पक्षांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण केले आहे. 

अन्यायाविरोधात बोलणार्‍यांना थेट देशद्रोही ठरविण्याचे धारिष्ट्य आतापर्यंत कोणीही केले नव्हते. आता फडणवीस साहेबांनी थेट मुख्यमंत्री या नात्याने शेतकरी प्रश्नासाठी लढणार्‍यांना हे बिरुद चिकटविल्याने शेतकर्‍यांत तीव्र संताप आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा, शेतकरीही याबद्दल मुख्यमंत्र्यांसह एकुण सरकारची संपूर्ण कोंडी केल्याशिवाय राहणार नाहीत, याचेही भान सरकारने ठेवावे.

भाजपा सरकार म्हणजे जीवघेणा विषाणू
प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकात म्हटले आहे की, शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार्‍या सुकाणू समितीवर टीका करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी जमिनीवर येऊन आमच्याशी खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी. शेतकरी आंदोलकांना देशद्रोही ठरवितानाच सुकाणू समितीला जीवाणू म्हणणे मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीला शोभणारे नाही. 

मुळात आतापर्यंत काँग्रेस आघाडीच्या बांडगुळांनी शेतकर्‍यांचे शोषण केलेले आहेच. पण आता सत्ताधारी भाजपाने शेतीव्यवस्थाच मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे. एकुणच भाजपाचे सरकार म्हणजेच शेतकर्‍यांसाठीची जीवघेणा विषाणू ठरला आहे. याच विषाणूला कायमची मूठमाती देण्यासाठी आता यापुढे शेतकरी विक्रमी संख्येने पुढे येतील. याचे भान ठेऊन मुख्यमंत्री महोदयांनी देशद्रोही ठरविण्याचा प्रमाणपत्र देण्याचा कारखाना बंद करून शेतकर्‍यांची जाहीर माफी मागावी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.